तिमेझरी येथील पाणी टाकी त्वरित सुरू करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 10, 2021 04:29 AM2021-05-10T04:29:02+5:302021-05-10T04:29:02+5:30
गोरेगाव : तालुक्यातील तिमेझरी येथे मागील एक महिन्यापासून पाणीटंचाईची समस्या आहे. पिण्याचे पाणी आणण्यासाठी गावातील महिलांना दूरवर भटकंती करावी ...
गोरेगाव : तालुक्यातील तिमेझरी येथे मागील एक महिन्यापासून पाणीटंचाईची समस्या आहे. पिण्याचे पाणी आणण्यासाठी गावातील महिलांना दूरवर भटकंती करावी लागत आहे. त्यामुळे संबंधित विभागाकडे याकडे लक्ष देऊन गावातील पाणीटाकी सुरू करून पाणीपुरवठा करण्याची मागणी आनंद पटले यांनी केली आहे.
येथील गावकऱ्यांना तीन कि.मी. अंतरावरून शेतातून पाणी आणावे लागत आहे. गावात बोअरवेलवरची गर्दी पाहता दोन दोन तास पाण्यासाठी प्रतीक्षा करावी लागत आहे तर काही नागरिकांना पाणी विकत घ्यावे लागत आहे. एवढी गंभीर समस्या गावात निर्माण झाली आहे. तिमेझरी येथे शासनाने पाणी पुरवठ्यासाठी तीन महिन्यांपूर्वीच पाणी टाकीचे बांधकाम करून दिले आहे. पाणी टाकी तयार असून पाणीपुरवठ्यासाठी पाईपलाईनसुद्धा टाकण्यात आली आहे. विद्युत विभागाकडे डिमांड भरून झाले असताना, विद्युत विभागांसह वेळोवेळी चर्चा केली आहे. मीटरची जोडणी करण्यास विलंब होत असल्याने गावकऱ्यांचे हाल होत आहे. त्यामुळे संबंधित विभागाने याकडे लक्ष देऊन पाणीटंचाईची समस्या त्वरित मार्गी लावण्याची मागणी आनंद पटले व गावकऱ्यांनी केली आहे.