उपसा सिंचन योजनेच्या कामाला सुरुवात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2018 10:29 PM2018-04-17T22:29:14+5:302018-04-17T22:29:14+5:30
जिल्हा विकास नियोजन मंडळाकडून जिल्हा परिषदेला मिळालेल्या निधीतून जि.प. सदस्य गंगाधर परशुरामकर यांनी डव्वा गावासाठी ७३ लाख रुपये खर्चाची उपसा सिंचन योजना मंजूर करुन घेतली.
लोकमत न्यूज नेटवर्क
खजरी : जिल्हा विकास नियोजन मंडळाकडून जिल्हा परिषदेला मिळालेल्या निधीतून जि.प. सदस्य गंगाधर परशुरामकर यांनी डव्वा गावासाठी ७३ लाख रुपये खर्चाची उपसा सिंचन योजना मंजूर करुन घेतली. मंगळवारी (दि.१७) योजनेचे विधिवत भूमिपूजन जि.प. सदस्य गंगाधर परशुरामकर यांच्या हस्ते, सरपंच पुष्पमाला बडोले यांच्या अध्यक्षतेत करण्यात आले.
डव्वा गावाला तत्कालीन आ. राजेंद्र जैन यांनी आमदार आदर्श गाव म्हणून दत्तक घेतले होते. तेव्हा त्यांनी या गावात उपसा सिंचन योजना प्रस्तावित केली होती. त्याचा पाठपुरावा जि.प. सदस्य परशुरामकर यांनी केला.
जिल्हा नियोजन विकास मंडळाकडून जि.प.ला मिळणाऱ्या निधीतून या योजनेस पैसे मिळावेत म्हणून परशुरामकर यांनी प्रयत्न केले. तेव्हा जि.प.ची जलसंधारण समिती, स्थायी समिती व सर्वसाधारण सभा या सर्व समित्यांनी यास मंजुरी प्रदान केली व निधी उपलब्ध होण्याचा मार्ग मोकळा झाला.
त्यानुसार मंजूर झालेल्या ७३ लाख रुपयांपैकी ५५ लाख रुपये उपसा सिंचन योजनेवर व उर्वरित १८ लाख रुपये इलेक्ट्रीकवर खर्च होणार आहेत. परंतु इलेक्ट्रीकवर असलेल्या बहुतेक योजना बंद असल्याने ही योजना सौर ऊर्जेवर करण्यात यावी, असा प्रस्ताव परशुरामकर यांनी ल.पा. विभाग जि.प. गोंदिया यांना दिले असून त्यावर कार्यवाही सुरू झालेली आहे.
सदर उपसा सिंचन मानिक घाट डव्वा येथे होणार असून तेथून उपसा झालेले पाणी सिंधी तलाव डव्वा येथे जाणार आहे. सिंधी तलावात पाण्याची साठवण करुन नंतर शेतकºयांना शेतीसाठी दिले जाणार आहे. त्यामुळे उपसा सिंचन योजना ही श्ेतकºयांसाठी वरदान ठरणार आहे.
याप्रसंगी प्रामुख्याने उपसरपंच चेतन वळगाये, आदिवासी विकास कार्यकारी संस्थेचे अध्यक्ष आनंद जोशी, गोंगलेचे सरपंच डी.यू. रहांगडाले, एफआरटी शहा, उपविभागीय अधिकारी लपा आमगाव सुभाष कापगते, उपकार्यकारी अभियंता लपा विभाग बिसेन, शाखा अभियंता मयंक माधवानी, खजरीचे उपसरपंच उमराव मांढरे, अनिल बिलीया डव्वा, पवन कटकवार, ग्रा.पं. सदस्य सचिन रहांगडाले, विजय चौधरी, अंजिरा कवरे, छाया येल्ले, सरिता प्रधान, सोहन चौधरी, विजय चौधरी, रेवालाल पटले, जितेंद्र चौधरी उपस्थित होते.