खासगी तलावातील गाळ काढण्याच्या कामाचा प्रारंभ
By admin | Published: May 5, 2017 01:43 AM2017-05-05T01:43:47+5:302017-05-05T01:43:47+5:30
जलयुक्त शिवार अभियान २०१६-१७ मध्ये करडगाव-झरपडा गावाची निवड करण्यात आली होती.
ुेबोंडगावदेवी : जलयुक्त शिवार अभियान २०१६-१७ मध्ये करडगाव-झरपडा गावाची निवड करण्यात आली होती. गावातील खासगी तलावातील गाळ काढण्याचा उपक्रम तालुका कृषी अधिकारी कार्यालयाच्या वतीने राबविण्यात येत आहे. गावातील शेतकऱ्यांच्या उपस्थितीमध्ये गाळ काढण्याच्या कामाचा प्रारंभ करण्यात आला.
महात्मा फुले जलभूमी संधारण अभियान करडगाव-झरपडा येथील खासगी तलावातील गाळ काढण्याच्या कामाच्या शुभारंभाप्रसंगी तालुका कृषी अधिकारी डी.एल. तुमडाम, मंडळ कृषी अधिकारी एन.एच. मुनेश्वर, कृषी पर्यवेक्षक आर.के. चांदेवार, करडगावचे सरपंच आनंदराव मेश्राम, झरपडाचे सरपंच नामदेव परशुरामकर, बोळदेचे सरपंच उदाराम मुंगमोळे, प्रगतीशील शेतकरी सुदाम डोंगरवार, विनायक मस्के, डॉ. गजाान डोंगरवार, दुर्वास मस्के, बन्सीधर लंजे, माधोराव मस्के, गुलाब लंजे, दिगंबर मस्के आदी शेतकरी उपस्थित होते.
तालुका कृषी अधिकारी कार्यालयाच्या वतीने खासगी तलावातील जेसीपी व ट्रॅक्टरच्या सहाय्याने लोकसहभागातून गाळ काढण्याचा कार्यक्रम घेण्यात आला. जलयुक्त शिवार अभियानांतर्गत गावामध्ये कृषी विभागाच्या वतीने पाण्याचा संचित साठा मोठ्या प्रमाणात वाढावा म्हणून विविध शेतकरी हिताच्या कामाला मोठ्या प्रमाणात गती देण्यात आली. यंत्राच्या सहाय्याने तलावातील काढलेला गाळ शेतकरी आपापल्या शेतामध्ये नेवून भात खाचराची कामे झालेल्या बांध्यामध्ये पसरवित आहेत. तलावातील निघालेला गाळ जमिनीमध्ये काही प्रमाणात सुपिकता वाढवितो. तलावातील निघालेला गाळ पाळ मजबुतीकरण करण्यासाठी टाकल्या जातो. पाळीवर माती टाकल्यामुळे तलावामध्ये पाण्याचा अतिरिक्त साठा वाढून जलसिंचन क्षेत्रात २५ टक्के वाढ होण्याचा मनोदय तालुका कृषी अधिकारी धनराज तुमडाम यांनी उपस्थित शेतकऱ्यांशी हितगुज साधताना व्यक्त केला. तलावातील गाळ काढण्याच्या उपक्रमात करडगाव-झरपडा येथील शेतकरी बांधव मोठ्या तळमळतेने सदर कामात सहभागी होत आहेत. जलयुक्त शिवार अभियानामुळे गावात हरितक्रांतीची लाट पसरेल, अशी भावना गावकऱ्यांनी व्यक्त केली. संचालन कृषी सहाय्यक अविनाश हुकरे यांनी केले. (वार्ताहर)