खड्डे बुजविण्याच्या कामाला सुरुवात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 24, 2018 09:17 PM2018-12-24T21:17:17+5:302018-12-24T21:17:31+5:30
निद्रिस्त प्रशासनाला जागे करण्यासाठी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसद्वारे वडसा-अर्जुनी-कोहमारा राज्य महामार्गावरील खड्ड्यात बेशरमचे झाड लावून शासन व प्रशासनाचा निषेध नोंदविण्यात आला होता. यामुळे सार्वजनिक बांधकाम विभाग कामाला लागले असून अखेर खड्डे बुजविण्याचे काम सुरू केले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
अर्जुनी मोरगाव : निद्रिस्त प्रशासनाला जागे करण्यासाठी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसद्वारे वडसा-अर्जुनी-कोहमारा राज्य महामार्गावरील खड्ड्यात बेशरमचे झाड लावून शासन व प्रशासनाचा निषेध नोंदविण्यात आला होता. यामुळे सार्वजनिक बांधकाम विभाग कामाला लागले असून अखेर खड्डे बुजविण्याचे काम सुरू केले आहे.
राज्यमार्गावरील इटखेडा, इसापूर, खामखुर्रा ते सिमेपर्यंतच्या गौरनगरपर्यंत अख्खा राज्यमार्ग खड्यात गेला आहे. येथील सार्वजनिक बांधकाम उपविभागाद्वारे याकडे दुर्लक्ष केले जात होते. परिसरामधील जनतेचे यावर होणारे अपघात तसेच विद्यार्थ्यांची शाळा-महाविद्यालयात येण्यासाठीची कसरत जिवघेणी ठरली होती. त्यातच नागमोडी वळणावर ट्रकचे अपघात बघता दिशादर्शक फलक, रिफ्लेक्टर, वळणाचे रुंदीकरण करण्यात यावे यासाठी १८ डिसेंबर रोजी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसद्वारे खड्यात बेशरमची झाडे लावून तिव्र निषेध नोंदविण्यात आला होता.
सार्वजनिक बांधकाम विभागाकडून सदर आंदोलनाची दखल घेवून राष्ट्रवादी विद्यार्थी कॉँग्रेसचे तालुकाध्यक्ष निप्पल बरैय्या यांना तात्काळ काम सुरु करण्यासंदर्भात नुकतेच पत्र दिले असून त्यासंदर्भात खड्डे भरण्याचे काम सुद्धा सुरु झाले आहे. परंतु नागमोडी मार्गाचे रुंदीकरण, दिशादर्शक फलकाची रंगरंगोटी, रिफ्लेक्टर लावणे तसेच कडेची गवत व झाडेझुडपे काढावी अन्यथा तिव्र आंदोलन करणार असल्याचा इशारा बरैय्या, युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष योगेश नाकाडे, उद्धव मेहंदळे, नितीन धोटे, संजय राऊत, प्रमोद राऊत, केशव उके, शरद मिसार, उद्धव मुंगमोडे, मोरेश्वर संग्रामे, क्रिष्णा पारधी, मिलिंद येलपुरे, राजेंद्र मिसार, सन्नी पालीवाल, संदेश नेवारे, सचिन बरैय्या, मनोहर सोनवाने, चंद्रशेखर ठाकरे, कमलेश राऊत, मेघशाम भावे, संतोष कोरडे, रमेश मानकर, होमेश्वर संग्रामे, देवराम दुनेदार व इतरांनी दिला आहे.