अतिक्रमणीत जागेच्या मोजणीला सुरूवात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 28, 2017 10:37 PM2017-11-28T22:37:09+5:302017-11-28T22:37:53+5:30
शहर अतिक्रमण मुक्त करण्यासाठी राबविण्यात येणाºया मोहिमेच्या पहिल्या टप्यात अतिक्रमणीत जागा मोजणीच्या कामाला मंगळवार (दि.२८) सुरूवात झाली.
आॅनलाईन लोकमत
गोंदिया : शहर अतिक्रमण मुक्त करण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या मोहिमेच्या पहिल्या टप्यात अतिक्रमणीत जागा मोजणीच्या कामाला मंगळवार (दि.२८) सुरूवात झाली. शहरातील कुडवा नाका येथून मोजणीचे काम सुरू करण्यात आले आहे. सुरूवातीला एन.एम.डी.कॉलेज पर्यंत मोजणी केली जाणार आहे. त्यानंतर मग टप्प्याटप्प्याने मोजणीचे हे काम पुढे वाढणार आहे.
शहरातील वाढते अतिक्रमण शहरवासीयांसह प्रशासनासाठीही डोकेदुखीचे ठरत आहे. काही नागरिकांनी नियमांना धाब्यावर बसवून केलेल्या अवैध बांधकामामुळे शहराचे विदु्रपीकरण होत होते. वाढत्या अतिक्रमणामुळे शहरात वाहतुकीची कोंडी होत होती. ही समस्या कायमस्वरुपी मार्गी लावण्यासाठी अतिक्रमण हटाव मोहिम राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासाठी नगर परिषद प्रशासन व जिल्हा प्रशासनाकडून यासाठी कारवाई केली जात आहे. यांतर्गत अतिक्रमण हटविण्यासाठी राबविण्यात येणाºया मोहिमेचा पहिला टप्पा म्हणजेच मोजणीचे काम आजपासून (दि.२८) सुरू झाले. शहरातील कुडवा नाक्यापासून मोजणीला सुरूवात करण्यात आली. अगोदर एन. एम. डी. कॉलेज पर्यंत ही मोजणी केली जाणार आहे. मोजणी व मार्कींग झाल्यानंतर पुढे रस्त्याची मोजणी केली जाणार असल्याची माहिती आहे. मंगळवारी सुरू करण्यात आलेल्या मोजणीच्या कामात या मार्गावरील मालमत्ता धारकांची कागदपत्रे बघून जागेची मोजणी करण्यात आली. याप्रसंगी नगर परिषद मुख्याधिकारी चंदन पाटील, अप्पर तहसीलदार के.डी.मेश्राम, भूमी अभिलेख विभागाचे उप अधीक्षक सतीश पवार, मंडळ अधिकारी भेंडारकर, तलाठी राठोड, नगर परिषद नगर रचना विभागाचे लाडेकर व सलाम, नझूल सर्वेक्षक ठवळे व ताराम यांच्यासह अन्य कर्मचारी उपस्थित होते. विशेष म्हणजे, मोजणीच्या या कामाला संबंधीत अन्य विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित असतानाच बांधकाम विभागाचे अधिकारी व कर्मचारी कुणीही फिरकले नाही.
कॉलेज रोड १८ मीटरचा
कुडवा नाका ते पाल चौक हा रस्ता १८ मीटरचा असावा असे बांधकाम विभागाने सुचविले आहे. सध्या स्थितीत हा रस्ता केवळ अर्ध्याच रुंदीचा आहे. परिणामी या रस्त्याच्या रूंदीकरणासाठी मोजणी केली जात आहे. आता मार्कींग करून त्यात कुणाचे अतिक्रमण येते हे बघायचे आहे. यानंतर अतिक्रमणधारकांना नोटीस दिले जाणार आहे. अतिक्रमण स्वत:हुन काढण्यासाठी आठवडाभराची मुदतही दिली जाणार आहे.
असे आहे मार्कींगचे नियोजन
अतिक्रमणाच्या या विषयाला घेऊन नगर परिषद, भूमी अभिलेख, बांधकाम विभाग व संबंधीत विभागांनी मार्कींगचे नियोजन केले आहे. यानुसार, मंगळवारी (दि.२८) कुडवा नाका ते एन.एम.डी. महाविद्यालय, २ डिसेंबर रोजी जयस्तंभ चौक ते सिंधी कॉलनी, ५ डिसेंबर रोजी रेल्वे स्टेशन पुढचा रस्ता, ८ डिसेंरबर रोजी मोदी पेट्रोल पंपच्या मागच्या रस्त्याने सिंधी शाळे पर्यंत, १२ डिसेंबर रोजी नेहरू चौक ते दुर्गा मंदिर व त्यानंतर शेवटी गांधी प्रतिमा ते श्री टॉकीज चौक पर्यंतची मार्कींग करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.