स्वयंसेवी संस्थांच्या सहभागाने पर्यावरण सप्ताहाला सुरूवात
By admin | Published: June 5, 2016 01:35 AM2016-06-05T01:35:32+5:302016-06-05T01:35:32+5:30
गोपीनाथ मुंडे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ पर्यावरण सप्ताह ३ ते ९ जूनपर्यंत साजरा करण्यात येत आहे.
गोंदिया : गोपीनाथ मुंडे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ पर्यावरण सप्ताह ३ ते ९ जूनपर्यंत साजरा करण्यात येत आहे. या अनुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालय गोंदिया येथे पर्यावरण सप्ताहाच्या प्रथम दिवशी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी डॉ.विजय सूर्यवंशी, अतिथी म्हणून शिंदे, युवराज कुंभलकर, डॉ. राजेंद्र जन, सुनील धोटे उपस्थितीत होते. जिल्हाधिकारी यांना सप्तपर्णीचे रोप देऊन सुनील धोटे यांनी स्वागत केले. डॉ. विजय सूर्यवंशी यांनी पर्यावरणाचे रक्षण ही सर्वाची जवाबदारी आहे. यासाठी शासन वेळोवेळी विविध उपाय योजना करीत असते. स्वयंसेवी संस्था, पर्यावरणप्रेमी, वृक्षप्रेमी व सामाजिक कार्यकर्ते यांचा सहभाग लाभल्यास यशस्वी वृक्ष लागवड करता येईल. त्याकरिता उपस्थित सर्व स्वयंसेवी संस्थांच्या पदाधिकाऱ्यांना पर्यावरण सप्ताहात सहकार्य करण्याचे आवाहन केले. ग्रामीण क्षेत्रासोबतच शहरेसुध्दा हिरवीगार झाली पाहिजेत. वृक्ष लागवड ही लोकचळवळ होणे काळाची गरज आहे, असे म्हणाले. युवराज कुंभलकर, सामाजिक वनीकरण यांनी राज्यात ५ जून पर्यावरण दिन साजरा होणार असल्याने त्यानिमित्ताने वृक्षारोपण, वृक्षसंगोपन, पर्यावरण प्रबोधन, प्रदूषण नियंत्रण इ. संदर्भात स्वयंसेवी संस्थांनी कार्यक्रम हाती घेण्याची विनंती केली.
पर्यावरण सप्ताह कार्यक्रमास रुपेश निंबार्ते, हिरवळ संस्था, सुनील धोटे, नागझिरा फाऊंडेशन, लता वाजपेयी, सीमा वैसुले, सुजाता बहेकार, आधार महिला स्वयंसेवी संस्था, भावना दीपक कदम, नगरसेविका व लायन्स क्लब सिव्हील सदस्य, उमेंद्र भेलावे, अशोक पडोले, गोंदिया निसर्ग मंडळ, आर.जी. राय, गायत्री परिवार, युवा संयोजक, विवेककुमार बैस, अजय जायसवाल, राजेंद्र बग्गा, नीलम बग्गा, अतुल गुप्ता, पुरूषोत्तम मोदी, ए.एम. अघ, कुर्मराज चौव्हाण इत्यादी सवयंसेवी संस्थाचे पदाधिकारी उपस्थित होते. सुनील धोटे यांनी सुचविल्याप्रमाणे गोंदिया येथे कुडवा या स्थळी स्मृतिवन निर्मिती व्हावी. करिता जिल्हाधिकारी यांना विनंती केली आहे. उपस्थित स्वयंसेवी संस्थांच्या पदाधिकाऱ्यांसमक्ष डॉ. विजय सूर्यवंशी यांचे हस्ते सप्तपर्णीचे एक रोप लावण्यात आले. कार्यक्रमाचे संचालन व आभार प्रदर्शन युवराज कुंभलकर यांनी केले. (तालुका प्रतिनिधी)