Coronavirus in Maharashtra; राज्य सरकारी कर्मचारी एक दिवसाचे वेतन शासनाला देणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 6, 2021 04:09 PM2021-05-06T16:09:37+5:302021-05-06T16:10:06+5:30
Gondia News कोरोना महामारी रोखण्यासाठी मुख्यमंत्री साहाय्यता निधीत राज्यातील ९ लाख सरकारी व निमसरकारी कर्मचारी एक दिवसाच्या वेतनापोटी सुमारे ३५० कोटी रुपये आर्थिक साहाय्य देणार असल्याची घोषणा राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना महाराष्ट्र राज्याच्या वतीने करण्यात आली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : कोरोना महामारी रोखण्यासाठी मुख्यमंत्री साहाय्यता निधीत राज्यातील ९ लाख सरकारी व निमसरकारी कर्मचारी एक दिवसाच्या वेतनापोटी सुमारे ३५० कोटी रुपये आर्थिक साहाय्य देणार असल्याची घोषणा राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना महाराष्ट्र राज्याच्या वतीने करण्यात आली आहे.
कुशल संयमित कारकीर्दीत गेल्या वर्षी आलेली पहिली लाट रोखण्यास राज्य शासनाला यश आले. या आपत्तीच्या निवारणार्थ राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनी त्यावेळी १ दिवसाचे वेतन मुख्यमंत्री साहाय्यता निधीत देऊन कर्तव्याची पूर्ती केली होती. कोरोनाची दुसरी लाट पहिल्या लाटेपेक्षा अधिक प्राणघात ठरत आहे. राज्य शासन आरोग्य व अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांच्या साथीने या संकटावर मात करण्यासाठी शर्तीचे प्रयत्न करीत आहे. या शिवाय संचारबंदीही आहे. यामुळे राज्याच्या आर्थिक गाळा मतिमंद झाला आहे. अशा वेळी आर्थिक साहाय्याची निकड असतेे. राज्य सरकारी कर्मचारी हा शासनाचा अविभाज्य घटक आहे.
राज्यातील सर्व सरकारी व निमसरकारी, जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांनी माहे मे २०२१ च्या वेतनातून एक दिवसाचे वेतन मुख्यमंत्री साहाय्यता निधीत देण्याचा निर्णय घेऊन एक सामााजिक कर्तव्याची पूर्तता केली आहे. तसेच कर्मचारी अडचणीच्या काळात शासनाच्या पाठीशी उभे राहणार असल्याचा विश्वासही संघटनेचे सरचिटणीस व निमंत्रक विश्वास काटकर व आशिष रामटेके यांनी मुख्यमंत्री यांना दिलेल्या निवदेनाच्या माध्यमातून व्यक्त केला आहे.