नवाटोला वन समितीला राज्यस्तरीय पुरस्कार

By admin | Published: July 5, 2017 12:37 AM2017-07-05T00:37:03+5:302017-07-05T00:37:03+5:30

तालुक्यातील प्रसिद्ध नैसर्गिक पर्यटनस्थळाचा समावेश असलेल्या नवाटोला परिसरात काम करणाऱ्या ...

State Level Award for Navratola One Committee | नवाटोला वन समितीला राज्यस्तरीय पुरस्कार

नवाटोला वन समितीला राज्यस्तरीय पुरस्कार

Next

वनमंत्र्यांच्या हस्ते सत्कार : ना.फडणवीस व गडकरींकडून गौरवोद्गार
लोकमत न्यूज नेटवर्क
सालेकसा : तालुक्यातील प्रसिद्ध नैसर्गिक पर्यटनस्थळाचा समावेश असलेल्या नवाटोला परिसरात काम करणाऱ्या संयुक्त वन व्यवस्थापन समितीला वन संरक्षण आणि संवर्धनाच्या क्षेत्रात मोलाची कामगिरी बजावल्याबद्दल मुंबई येथील वन महोत्सवात राज्यस्तरीय पुरस्काराने सम्मानित करण्यात आले. राज्य स्तरीय पुरस्कार प्राप्त करणारी नवाटोला येथील संयुक्त वन व्यवस्थापन समिती ही या पुरस्काराची मानकरी ठरणारी जिल्ह्यातील प्रथमच समिती ठरली आहे.
२०१५-१६ या वर्षात मोलाची कामगिरी केल्याबद्दल नवाटोला वन समितीने जिल्हा पातळीवरील प्रथम क्रमांक पटकावला होता. त्यावेळी जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या हस्ते समितीला ५१ हजार रुपयाचे प्रथम बक्षीस देऊन सत्कार करण्यात आला होता. त्यानंतर समितीने आपल्या कामगिरीत उत्साहपूर्वक वृद्धी करीत वनांची कत्तल थांबविणे, वृक्षारोपण करने, वनांचे सौंदर्य वाढविणे, अतिक्रमण हटविणे इत्यादी बाबतीत अनेक उल्लेखनीय कामे केली होती. या कामांचा आढावा घेण्यासाठी संत तुकाराम वन ग्राम योजनेंतर्गत राज्यस्तरीय तपासणी चमूने नवाटोला वन परिसराची प्रत्यक्ष पाहणी केली व समितीने केलेल्या कामांचे मूल्यांकन केले. तपासणी चमूमध्ये विभाग व राज्यस्तरावरील वनविभागात कामे करणारी व्यक्ती व वरिष्ठ अधिकाऱ्यांचा समावेश होता. यावेळी त्यांनी संयुक्त वन व्यवस्थापन समितीचे कार्य पाहून कौतूक केले होते. त्यावेळी सकारात्मक प्रतिसाद मिळाले होते. त्यावेळी पुरुष वन व्यवस्थापन समितीसह महिला दक्षता समितीनेही आपल्या कामगिरीची माहिती सादर केलेली होती.
राज्यात चार कोटी वृक्ष लागवड कार्यक्रमाला शुभारंभ आणि वन महोत्सवाचे औचित्य साधून मुंबई येथे कांडलवन संधारण केंद्रात आयोजित पुरस्कार सोहळ्यात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय भुपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या प्रमुख उपस्थितीत राज्याचे वन व वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते संयुक्त वन व्यवस्थापन समिती नवाटोलाच्या अध्यक्ष, सचिव आणि सदस्यांना दीड लाखांचा राज्यस्तरावरील तृतीय पुरस्कार स्मृतीचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. यावेळी सत्कार सोहळ्यात ईशा फाऊंडेशनचे सचिव विकास खरगे, राज्य शासनातील वरिष्ठ अधिकारी, वन विभागातील मान्यवर आणि वन संवर्धन आणि संरक्षणाच्या क्षेत्रात मोलाची कामगिरी बजावणारे अनेक मान्यवर आणि स्वयंसेवी व्यक्ती उपस्थित होते.
मुंबई येथील सत्कार सोहळ्यात बक्षीस स्विकारण्यासाठी संयुक्त वन व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष रामदीन उईके, सचिव (वनरक्षक) सुरेश रहांगडाले, सदस्य रेवल उईके, ओमकार दसरिया, रामसिंग मडावी असे पाच लोक मुंबईला गेले होते. त्यांना १ जुलै रोजी १ ते ७ जुलैच्या वन महोत्सव कार्यक्रमाच्या शुभारंभप्रसंगी गौरविण्यात आले. पुरस्कार मिळाल्याबद्दल जिल्ह्याचे उपवनसंरक्षक एस. युवराज, तालुक्याचे वनपरिक्षेत्राधिकारी सदानंद अवगान यांच्यासह अनेकांनी आनंद व्यक्त करित गौरवोद्गार काढले.

समितीने मानले ‘लोकमत’चे आधार
हाजराफॉल नैसर्गिक पर्यटन स्थळाबद्दल ‘लोकमत’ वर्तमानपत्राने वेळोवेळी बातम्या आणि फोटो प्रसिद्ध करुन हाजराफॉल पर्यटन स्थळाला सतत प्रकाश झोतात ठेवले. त्याचबरोबर चित्रफितीच्या माध्यमातून सुद्धा ‘लोकमत’ने हाजराफॉल’ला देश विदेशात ओळख मिळवून दिली. एवढेच नाही तर हाजराफॉल परिसरात सतत मेहनत घेणाऱ्या युवक-युवतींनी करीत असलेल्या कामाची सुद्धा दखल घेत त्यांना सतत प्रसिद्धी दिली. त्यामुळे हाजराफॉल आणि वन व्यवस्थापन समितीचे कार्य पर्यटकांबरोबरच शासन-प्रशासनाच्या दरबारी गेले. याची दखल सुद्धा घेण्यात आली. ‘लोकमत’मध्ये सतत बातम्या आणि फोटो प्रकाशित केल्याबद्दल समितीचे अध्यक्ष रामदीन उईके, सचिव सुरेश रहांगडाले आणि समितीचे सदस्य युवक-युवतींनी ‘लोकमत’ वर्तमानपत्र आणि लोकमतचे सालेकसा तालुका प्रतिनिधी विजय मानकर यांचे आभार मानले.

Web Title: State Level Award for Navratola One Committee

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.