संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानात सिरेगावबांध ग्रामपंचायतीला राज्यस्तरीय पुरस्कार 

By अंकुश गुंडावार | Published: February 24, 2024 03:37 PM2024-02-24T15:37:51+5:302024-02-24T15:37:59+5:30

5 मार्च रोजी नाशिक येथे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्र्यांच्या हस्ते होणार सत्कार

State level award to Siregaonbandh Gram Panchayat in Sant Gadgebaba Village Swachhta Abhiyan | संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानात सिरेगावबांध ग्रामपंचायतीला राज्यस्तरीय पुरस्कार 

संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानात सिरेगावबांध ग्रामपंचायतीला राज्यस्तरीय पुरस्कार 

गोंदिया - संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान सन 2018-19 अंतर्गत राबविण्यात आलेल्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्वच्छ ग्राम स्पर्धेच्या राज्यस्तरीय पुरस्कारासाठी गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव तालुक्यातील सिरेगावबांध ग्रामपंचायत पात्र ठरली आहे.  या स्पर्धेचे पुरस्कार वितरण सोहळा नाशिक येथे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री यांच्या अध्यक्षतेखाली 5 मार्च रोजी आयोजित करण्यात आले आहे.

सन 2018-19 या वर्षासाठी राबविण्यात आलेल्या संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान अंतर्गत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्वच्छ ग्राम स्पर्धेसाठी जिल्हा परिषद गटातून पात्र ठरलेल्या सिरेगावबांध या ग्रामपंचायतीची जिल्हास्तरीय तपासणी समिती कडून तपासणी करण्यात आली. यात जिल्हास्तरावर देवरी तालुक्यातील भागी/सि प्रथम तर अर्जुनी मोरगाव तालुक्यातील सिरेगावबांध ग्रामपंचायतीने द्वितीय क्रमांक पटकावत दोन्ही ग्रामपंचायती विभागीय पुरस्कारासाठी पात्र ठरल्या होत्या.

विभागीय स्पर्धेत या दोन्ही ग्रामपंचायतींनी संयुक्तपणे द्वितीय क्रमांक पटकावत राज्यस्तरीय स्पर्धेसाठी पात्र ठरल्या होत्या. या ग्रामपंचायतींची राज्यस्तरीय तपासणी 6 नोव्हेंबर 2022 ते 8 नोव्हेंबर 2022 दरम्यान समिती अध्यक्षांचे प्रतिनिधी तसेच अवर सचिव पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्रालय मुंबई चंद्रकांत मोरे, समिती सदस्य तसेच कक्ष अधिकारी बाळासाहेब हजारे, सहायक कक्ष अधिकारी पात्रे यांनी केली होती. राज्यस्तरीय स्पर्धेत कोकण, पुणे, नाशिक, छत्रपती संभाजी नगर (औरंगाबाद), नागपूर व अमरावती या सहा विभागातून १४ ग्रामपंचायती राज्यस्तरीय स्पर्धेसाठी पात्र ठरल्या होत्या.

पुरस्कार वितरण सोहळ्यात सहभागी होण्यासाठी संबंधित ग्रामपंचायतींचे अभियान कालावधीतील तसेच विद्यमान सरपंच/उपसरपंच/सदस्य/ग्रामसेवक तसेच विद्यमान पंचायत समिती सभापती/उपसभापती, जिल्हा परिषद अध्यक्ष/उपाध्यक्ष, पुरस्कार प्राप्त ग्रामपंचायत ज्या गणात येते त्या गणाचे पंचायत समिती सदस्य, जिल्हा परिषद सदस्य, विधानसभा सदस्य, विधान परिषद सदस्य, लोकसभा सदस्य,  मुख्य कार्यकारी अधिकारी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी पाणी व स्वच्छता, गटविकास अधिकारी यांना उपस्थित राहण्याबाबत निमंत्रित करण्यात आले आहे. राज्यस्तरीय पुरस्कारासाठी निवड झाल्याबद्दल सिरेगावबांध ग्रामपंचायतीचे जिल्हा परिषद अध्यक्ष पंकज रहांगडाले, मुख्य कार्यकारी अधिकारी एम.मुरुगानंथम तसेच उपमुख्य कार्यकारी अधिकारी पाणी व स्वच्छता आनंदराव पिंगळे यांनी अभिनंदन केले आहे.

जिल्ह्यासाठी अभिमानाची बाब - जि. प. अध्यक्ष पंकज रहांगडाले

-अनेक वर्षानंतर संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानात गोंदिया जिल्ह्यातील ग्रामपंचायत राज्यस्तरीय पुरस्कारासाठी पात्र ठरली असल्याने निश्चितच जिल्ह्यासाठी कौतुकास्पद व अभिमानाची बाब आहे. लोकप्रतिनिधींनी पुढाकार घेऊन गावाचा विकास साधा, असे आवाहन जिल्हा परिषद अध्यक्ष पंकज रहांगडाले यांनी केले आहे.

इतर ग्रामपंचायतींनीही आदर्श घेत विकास करावा- मुकाअ एम. मुरुगानंथम 

सिरेगावबांध सारखी छोटीशी ग्रामपंचायत आपल्या कार्य कर्तृत्वाच्या जोरावर राज्यस्तरावर जाऊन पुरस्कार प्राप्त करते हे कौतुकास्पद आहे. जिल्ह्यातील इतर ग्रामपंचायतींनीही या ग्रामपंचायतीचा आदर्श घेत आप आपली गावे आदर्श करण्यावर भर देत विकास साधावा असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एम. मुरुगानंथम यांनी केले आहे.

Web Title: State level award to Siregaonbandh Gram Panchayat in Sant Gadgebaba Village Swachhta Abhiyan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.