दिवाळीच्या खरेदीला जाताय? मोबाइल, दुचाकी सांभाळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 27, 2021 01:46 PM2021-10-27T13:46:19+5:302021-10-27T14:08:58+5:30

दिवाळीच्या खरेदीसाठी बाजारपेठेत गर्दी वाढल्याचा फायदा चोरटे घेताना दिसत आहेत. गर्दीचा फायदा घेऊन मोबाइलदेखील चोरीला जात असून बसस्थानक, रेल्वेस्थानक, रुग्णालय, बाजार परिसरातून मोठ्या प्रमाणात वाहने चोरीला गेली आहेत.

stay alert while going for diwali shopping | दिवाळीच्या खरेदीला जाताय? मोबाइल, दुचाकी सांभाळा

दिवाळीच्या खरेदीला जाताय? मोबाइल, दुचाकी सांभाळा

Next
ठळक मुद्देचोरीच्या घटना राेखण्यासाठी पोलिसांनी गस्त वाढविली दुकानदारांनीही लावले सीसीटीव्ही कॅमेरे

गोंदिया : दिवाळी आठ दिवसांवर आली असून, बाजारात गर्दी वाढू लागली आहे. दिवाळीच्या खरेदीसाठी बाजारपेठेत गर्दी वाढल्याने त्याचा गैरफायदा चोरटे घेत आहेत. गर्दीत उभी असलेल्या मोटारसायकल, तर गर्दीचा फायदा घेऊन लोकांचे मोबाइलही चोरटे पळवीत आहेत.

दुचाकी चोरीच्या घटनांमध्ये हल्ली वाढ झाली आहे. गर्दीच्या ठिकाणांना चोरटे लक्ष्य करीत आहेत. बसस्थानक, रेल्वेस्थानक, रुग्णालय, बाजार परिसरातून मोठ्या प्रमाणात वाहने चोरीला गेली आहेत. रात्रीच्या वेळी घराबाहेर असलेली वाहनेही चोरीला जात आहेत. गर्दीचा फायदा घेऊन मोबाइलदेखील चोरीला जात आहे. शहरात दररोज आठ ते दहा मोबाइल चोरीला जात आहेत. मोबाइल चोरीच्या तक्रारींना पाहून पोलिसांनाही कंटाळा आला आहे. त्यासाठी चोरीला गेलेल्या मोबाइलची तक्रार हरवली, अशीच करावी लागत आहे. चोरीला जाणाऱ्या मोबाइलची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने ते मोबाइल मिळणार कसे, मोबाइल मिळविण्यासाठी पोलिसांकडे वेळ आहे का, असे एक ना अनेक प्रश्न आहेत. गर्दीत जाताना लोकांनी आपले व मोबाइल सांभाळणे आवश्यक आहे.

ही घ्या काळजी -

मोबाइल : बाजारात किंवा कुठेही मोबाइल चोरी झाला तर सर्वांत आधी त्यातील सीमकार्ड बंद करण्यासंदर्भात मोबाइल कंपनीशी संपर्क करावा. शक्यतो वरच्या किंवा मागील खिशात मोबाइल ठेवू नये, महिलांनी पर्समध्ये मोबाइल ठेवला तर पर्स हातातच ठेवावी. पर्स लटकवू नये. मोबाइलचा ईएमआय क्रमांक असलेले खोके किंवा बिल सांभाळून ठेवावे. मोबाइल चोरी होताच बिल घेऊन पोलीस ठाणे गाठावे.

दुचाकी : आपली दुचाकी बाजारात गर्दीच्या ठिकाणी उभी करीत असा तर ते वाहन सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या खालीच उभे राहील अशा ठिकाणी उभे करा. दुचाकीला दोन लॉक ठेवावेत. बनावट चाबीने लॉक उघडून दुचाकी चोरीला जात आहेत. सर्वांत आधी दुचाकीचा विमा असावा. मुदत संपली तर लगेच नूतनीकरण करावे. दुचाकीची चोरी झाली तर लगेच जवळच्या पोलीस ठाण्यात जावे.

दुचाकीचे सुटे पार्ट काढून विक्री

चोरलेली दुचाकींची भंगारात विक्री केली जाते. किंवा त्यांचे पार्ट वेगळे करून विक्री केले जातात. काही चोरटे आदिवासी ग्रामीण भागात कमी किमतीत दुचाकी विक्री करतात. कागदपत्र नंतर देतो बाकीची रक्कम द्या, असे सांगून मिळेल ती रक्कम घेऊन दुचाकी विक्री करतात. शेतात जाण्यासाठी चोरी केलेल्या दुचाकींचा वापर केला जाताे. बऱ्याचदा नंबरदेखील बदलविला जातो.

चोरी गेलेला मोबाइल विसरलेलाच बरा

एकदा चोरीला गेलेला मोबाइल परत मिळणे अत्यंत कठीण आहे. मोबाइल ही छोटी वस्तू असल्यामुळे त्या मोबाइलच्या तपासासाठी पोलीस लागत नाही. एका ठिकाणातून चोरी गेलेल्या मोबाइलचे लोकेशन दुसऱ्या राज्यात दिसले तरी त्या मोबाइलपर्यंत पोहोचण्यासाठी पोलिसांकडे पुरेसे मनुष्यबळ नाही. त्या ठिकाणी जायला वरिष्ठ अधिकारी परवानगीही देत नाहीत. त्यामुळे चोरीला गेलेला मोबाइल विसरलेलाच बरा.

Web Title: stay alert while going for diwali shopping

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.