घरात राहून लहान मुले झाली ‘गोलमटोल’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 5, 2021 04:18 AM2021-07-05T04:18:33+5:302021-07-05T04:18:33+5:30

गोंदिया : मागील वर्षी मार्च महिन्यापासून कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू झाला, तेव्हापासून शाळा बंद असून लहान मुलांचा मुक्काम फक्त घरातच ...

Staying at home makes kids 'chubby' | घरात राहून लहान मुले झाली ‘गोलमटोल’

घरात राहून लहान मुले झाली ‘गोलमटोल’

Next

गोंदिया : मागील वर्षी मार्च महिन्यापासून कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू झाला, तेव्हापासून शाळा बंद असून लहान मुलांचा मुक्काम फक्त घरातच आहे. कोरोनाला घाबरून पालकांनी लहान मुलांना घराच्या फटकाबाहेर जाण्यासही मनाई केली आहे. त्यामुळे आता मुलांना फक्त घरात राहणे भाग पडले असून आपले मन रमविण्यासाठी त्यांना टीव्ही, मोबाइल, कॉम्प्युटर यांचीच साथ उरली आहे. घराबाहेर जाता येत नसल्याने लहान मुलांचे खेळ सुटले असून यामुळे त्यांची शारीरिक धावपळ बंद पडली आहे. घरात राहा व नाश्ता-जेवण एवढीच त्यांची दिनचर्या झाली आहे. परिणामी, काही लहान मुलांचे वजन वाढत चालले असून ते ‘गोलमटोल’ बनले आहेत. एवढ्या लहान वयात वजन वाढणे चांगले नसल्याने आता त्यांच्या आई-वडिलांचे यामुळे टेन्शन वाढत आहे. अशात आता त्यांच्याकडून लहान मुलांना हे करा-हे करू नका, अशा टिप्स दिल्या जात आहेत. मात्र, हे वय धावपळ करण्याचे, खेळण्याचे असून लहान मुलांना मात्र आता सुमारे दीड वर्षांपासून कोंडून राहावे लागत असल्याने त्यांनाही नकोसे झाले आहे. मात्र, कोरोनामुळे उपाय नसल्याने ही लहान मुले टीव्ही व मोबाइलमध्ये गुंतून आपला वेळ घालवीत आहेत.

----------------------------

वजन वाढले कारण...

- घराबाहेर पडून लहान मुलांना मित्रांसोबत मैदानी खेळ खेळता येत नाहीत. घरात राहून बैठे खेळ खेळावे लागत आहेत.

- सायकलिंग हा सर्वांत चांगला व्यायाम आहे. मात्र, कोरोना प्रादुर्भावामुळे लहान मुलांना घराचे फाटक ओलांडण्यासही मनाई असून त्यांची सायकलिंगही बंद आहे.

- घरात फक्त मोबाइल, टीव्ही व कॉम्प्युटरमध्ये गुंतून आपला वेळ घालविण्याची वेळ लहान मुलांवर आली आहे. यामुळे शारीरिक मेहनतीची काहीच कामे त्यांच्याकडून होत नसल्यानेही वजन वाढत आहे.

- नाश्ता-जेवण व घरात राहणे एवढीच लहान मुलांची दिनचर्या झाली आहे. त्यात पॅकेज फूड, चायनीज आदी खाद्य पदार्थांमुळे त्यांची अधिकची भर पडते.

-----------------------------

वजन कमी करण्यासाठी ही घ्या काळजी

१) घरात राहूनच लहान मुलांना सुलभ असे योगासन व व्यायाम करवून घ्यावा. त्यामुळे लहान मुलांची शारीरिक हालचाल होणार व वजन नियंत्रणात राहणार.

२) लहान मुलांना पॉकीट फूड, पनीर, तूप आदी पदार्थ देऊ नये. जेवणात फळांचा समावेश करावा जेणेकरून त्यांना पौष्टिक आहार मिळणार व त्यामुळे वजन वाढणार नाही.

३) ५ वर्षांपेक्षा आत वयातील मुलांना मोबाइल व कॉम्प्युटरपासून दूरच ठेवावे. तसेच ५ वर्षांपेक्षा वरील मुलांना जास्तीत जास्त २ तासांपोक्षा जास्त वेळ मोबाइल, टीव्ही, कॉम्प्युटर चालवू देऊ नये.

----------------------------

मोबाइल व टीव्हीचे फॅड

आजच्या लहान मुलांना टीव्हीवरील कार्टून आणि मोबाइल गेम्सचे फॅड लागले आहे. सकाळी उठल्यापासून त्यांना मोबाइल घेऊन बसण्याची तसेच टीव्हीवर फक्त कार्टून बघण्याची सवय लागली आहे. आता घराबाहेर जाता येत नसल्यानेही त्यांचे ऐकावे लागते. मात्र, यात त्यांची सवय अधिकच बिघडत चालली आहे.

- विवेक जगताप

--------------------------

आता शाळा नसल्याने लहान मुलांना विरंगुळा म्हणून टीव्ही व मोबाइल हेच साधन उरले आहे. मात्र, आता त्यांना मागील दीड वर्षांपासून याची सवयच लागून गेली आहे. सकाळी उठल्यापासूनच ते मोबाइल मागून बसून राहतात. मोबाइल नाही मिळाला तर टीव्हीसमोर बसून असतात. यामुळे त्यांची शारीरिक हालचाल बंदच झाली आहे.

- अशोक वाढई

----------------------------------

लहान मुलांचे डॉक्टर म्हणतात...

लहान मुलांना मोबाइल व टीव्हीसमोर जास्त वेळ बसू देऊ नये. त्यांच्याकडून व्यायाम व योगासन करवून घ्यावीत. जंक फूड व जास्त तैलीय पदार्थ खावयास देऊ नये. घराबाहेर जाता येत नसले तरीही घरा राहूनही कामे करून आपला वेळ घालविता येतो. फक्त एका जागी बसून राहू देऊ नका.

- डॉ. पीयूष जायस्वाल, बालरोगतज्ज्ञ, गोंदिया

-----------------------------

घरात राहून फक्त खाणे-पिणे व बसून राहणे यामुळे लहान मुलांची दिनचर्या तशीच झाली आहे. अशात त्यांना घरातच योगासन व व्यायाम करण्यास सांगावे. जेवणात फळांचा समावेश करावा तैलीय पदार्थ व पॉकीट फूड टाळावे. शिवाय मोबाइल व टीव्हीसमोर सातत्याने बसून राहू देऊ नका. त्यांच्याकडून शारीरिक हालचाल होत राहील, अशी कामे करवून घ्यावी.

- डॉ. आरती पटले, बालरोगतज्ज्ञ, गोंदिया.

--------------------

- जास्त वेळ टीव्ही बघणे.

- मोबाइल घेऊन बसणे.

- जंक फूड खाणे.

- शारीरिक हालचाल नाही.

- व्यायाम न करणे.

Web Title: Staying at home makes kids 'chubby'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.