चोरी करा अन् कनेक्शन घ्या

By admin | Published: April 20, 2015 01:04 AM2015-04-20T01:04:57+5:302015-04-20T01:04:57+5:30

विद्युत वितरण कंपनीची कार्यालये नेहमीच या ना त्या कारणाने नेहमीच चर्चेत असतात.

Steal and take connections | चोरी करा अन् कनेक्शन घ्या

चोरी करा अन् कनेक्शन घ्या

Next


नवेगावबांध : विद्युत वितरण कंपनीची कार्यालये नेहमीच या ना त्या कारणाने नेहमीच चर्चेत असतात. नुकतेच नवेगावबांध उपकेंद्रांतर्गत येणाऱ्या जांभळी (येलोडी) येथील शेतकऱ्याला त्यांच्या शेतात वीज जोडणी देण्यासाठी वीज वितरण कंपनीच्याच अभियंत्याने त्याला वीज चोरी करण्यास भाग पाडले. त्याशिवाय वीज वितरण कंपनी जोडणी देत नसल्याचेही विद्युत विभागाच्या अधिकृत सूत्रांनी सांगितले. यावरुन ‘चोरी करा व कनेक्शन घ्या’, अशी प्रचितीच शेतकऱ्याला आलेली आहे.
प्राप्त माहितीनुसार, नवेगावबांध येथील वीज वितरण कंपनी उपकेंद्रांतर्गत येणाऱ्या जांभळी (येलोडी) येथील बोरकर नामक शेतकऱ्याने त्यांच्या शेतातील विहिरीवर वीज जोडणी घेण्यासाठी वीज वितरण कंपनीच्या नवेगावबांध येथील कार्यालयात अधिकृत अर्ज सादर केला. त्यानुसार येथील अभियंता कांबळे यांनी बोरकर यास डिमांड पाठवून पैसे भरण्यास सांगितले. सदर शेतकऱ्याने जानेवारीच्या पहिल्याच आठवड्यात रितसर चालनद्वारे पैशाचा भरणादेखील केला व अभियंत्यास भेटून मला केवळ एका विद्युत पोलची गरज असून उन्हाळी धानपीक घेण्यासाठी तातडीने कनेक्शन देण्याची विनंती केली. त्यावेळी आपण धानाचे पऱ्हे लावा, आम्ही लगेच कनेक्शन देतो, असे अभियंत्याकडून आश्वस्त करण्यात आले.
वीज कंपनीच्या अभियंत्याच्या शब्दावर विश्वास ठेवून शेतकऱ्याने पऱ्हे भरले. परंतु तीन महिन्यांचा कालावधी लोटूनही गरजू शेतकऱ्याला कनेक्शन देण्यात आले नाही. शेवटी धानाचे पऱ्हे वाळू नयेत म्हणून सदर शेतकऱ्याने शेताजवळून जाणाऱ्या विद्युत तारांवरुन वायर घालून शेतातील धानाचे पीक जगविण्यास सुरुवात केली. सदर बाब उपकेंद्रात माहीत होताच बान्ते नावाच्या लाईनमनला पाठवून विनापरवानगीने विद्युत चोरी केल्याबद्दल सदर शेतकऱ्यास सात हजाराचा दंड ठोठावण्यात आला. त्यावेळी शेतकऱ्यांनी भरलेल्या डिमांडची पावती दाखवून स्वत:च्या शेतातील पऱ्हे जगविण्यासाठी असे करावे लागल्याचे सांगितले. परंतु चिरीमिरीची चटक लागलेल्या कोणत्याही कर्मचाऱ्यांनी शेतकऱ्यांचे म्हणणे ऐकून घेण्याचे औचित्य दाखविले नाही.
वास्तविकपणे शेतकऱ्यांनी विद्युत जोडणी मिळण्यासाठी सर्व औपचारिकता पूर्ण केल्या होत्या. अभियंत्याच्या आश्वासनामुळे त्यांनी धानाची पऱ्हे लावली. केवळ एकाच पोलची गरज असल्यामुळे सदर शेतकऱ्याला वीज जोडणी देणे काही कठीण बाब नव्हती. आणि जोडणी द्यायचीच नव्हती तर डिमांड भरण्यास सांगण्याची गरज नव्हती. परंतु केवळ चिरीमिरीसाठी कनेक्शन देण्यास टाळाटाळ करीत असल्याचा शेतकऱ्याचा आरोपात तथ्य आहे. याच शेतकऱ्याने जर संबंधितांचे खिसे गरम केले असते तर त्वरित विद्युत जोडणी मिळाली असती व सात हजाराचा दंडही कदाचित भरावा लागला नसता.
विशेष म्हणजे याच परिसरात अनेक शेतकरी व गावामध्ये अवैधरित्या खुलेआम तारांवरुन वीज चोरी करण्याचे प्रकार सुरू आहेत. त्याला आळा घालण्यासाठी वीज वितरण कंपनीचे अभियंते व कर्मचारी यांनी कधीच पुढाकार घेतल्याचे दिसून येत नाही. परंतु एका गरीब शेतकऱ्याच्या इमानदारीचे फळ म्हणून मात्र सात हजार रुपये दंड भरावा लागला. एखाद्या शेतकऱ्याच्या इमानदारीचे फळ वीज वितरण कंपनीचे कर्मचारी मात्र अशाप्रकारे चुकते करतात, यावर आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.
एका वीज वितरण कंपनीच्याच कर्मचाऱ्याने सांगितले की, जर एखाद्या शेतकऱ्याला एक ते पाच विद्युत पोलची गरज असेल तर तो जोपर्यंत वीज चोरी करीत नाही व त्याच्यावर आर्थिक दंड होत नाही तोपर्यंत त्याला कनेक्शन दिले जात नाही. याचा अर्थ असा ‘चोरी करा व कनेक्शन घ्या’ हेच तर वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांना यातून सुचवायचे नाही ना? परंतु या अधिकाऱ्यांना जाब कोण विचारणार, हाच खरा प्रश्न आहे. (वार्ताहर)

Web Title: Steal and take connections

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.