बापरे! अजूनही सरासरी १२८.४ मिमी पावसाची तूट; आता उरले सहा दिवस

By कपिल केकत | Published: September 24, 2023 08:04 PM2023-09-24T20:04:10+5:302023-09-24T20:04:28+5:30

अपेक्षित पाऊस गाठणे दिसते कठीण

still an average rainfall deficit of 128 4mm in gondia six days left now | बापरे! अजूनही सरासरी १२८.४ मिमी पावसाची तूट; आता उरले सहा दिवस

बापरे! अजूनही सरासरी १२८.४ मिमी पावसाची तूट; आता उरले सहा दिवस

googlenewsNext

कपिल केकत, गोंदिया : मागील वर्षी रेकॉर्ड ब्रेक पाऊस बरसल्यानंतर यंदा मात्र पावसाने सुरुवातीपासूनच जिल्हावासीयांना रडवून सोडले आहे. यंदा कसा तरी सरासरी १०९१.९ मिमी. पाऊस झाला असून त्याची ९२.५ एवढी टक्केवारी आहे. जिल्ह्यात सरासरी १२२०.३ मिमी अपेक्षित पाऊस असून यामुळे आता उरलेल्या सहा दिवसांत सरासरी १२८.४ मिमी पावसाची तूट भरून काढणे गरजेचे आहे. शनिवारपासून पावसाने उघाड दिली असल्यामुळे यात मात्र शंकाच वाटत आहे.

यंदा जून महिन्यापासूनच पावसाने साथ दिली नाही. जुलै व ऑगस्ट महिन्यातील पावसाने शेतकऱ्यांना हिंमत आली व त्यांनी कशीबशी रोवणी आटोपून टाकली. मात्र त्यांनतरही जिल्ह्याला पावसाची गरज होतीच. अशात सप्टेंबर महिन्यात पावसाने एंट्री मारली व थोडा धीर आला. त्यातही २१ व २२ तारखेला बरसलेल्या संततधार पावसामुळे जिल्हा चांगलाच पाणीदार झाला. यानंतर आता जिल्ह्यात सरासरी १०९१.९ मिमी पावसाची नोंद घेण्यात आली आहे. तर जिल्ह्यात सप्टेंबर महिन्यापर्यंत सरासरी १२२०.३ मिमी पाऊस अपेक्षित आहे. म्हणजेच, आता २४ सप्टेंबर होऊनही जिल्ह्यात सरासरी १२८.४ मीमी पावसाची तूट कायम आहे. आता सप्टेंबर महिन्यातील सहा दिवस शिल्लक असून अपेक्षित सरासरी गाठण्यासाठी जिल्ह्याला सहा दिवसांत सरासरी १२८.४ मिमी पावसाची गरज आहे.

आणखी दोन दिवस येलो अलर्ट

- हवामान खात्याने जिल्ह्याला सोमवारी व मंगळवारी येलो अलर्ट दिला आहे. तर दुसरीकडे शनिवारपासूनच पावसाने दडी मारली आहे. रविवारी तर अवघा दिवस पावसाचा थेंबही पडला नाही. अशात सहा दिवसांत सरासरी १२८.४ मिमी पावसाची जिल्ह्याला गरज आहे. कारण, पावसाची ही सरासरी गाठल्यानंतरच वर्षभरासाठी पाण्याची सोय होते. अन्यथा पुढील वर्षी पाण्याचे संकट उद्भवणार याची शक्यता नाकारता येत नाही.

मागील वर्षी होता सरासरी १६२४.७ मिमी पाऊस

मागील वर्षी जिल्ह्यात बम्पर पाऊस बरसला होता. २४ सप्टेंबरपर्यंत मागील वर्षी सरासरी १६२४.७ मिमी पावसाची नोंद घेण्यात आली होती. एवढेच नव्हे तर नवरात्रीतही पावसाने पार झोडपून काढले होते. यंदा मात्र सुरुवातीपासूनच पावसाचा खेळ काही समजून येत नसल्याची स्थिती आहे. यंदा तर अपेक्षित सरासरीच पावसाने गाठलेली नाही.

तालुकानिहाय पावसाची आकडेवारी

तालुका- पडलेला - अपेक्षित (मिमी)
गोंदिया- ११७१.३- १२०८.७

आमगाव- १००२.२- १४२५.६
तिरोडा- ९७९- ११५१.६

गोरेगाव- ९०२.१- १०२५.९
सालेकसा - १०९८.८-११५८

देवरी- ११८२.२- १२९१.६
अर्जुनी-मोरगाव- ११९१.८-१३१६.१

सडक-अर्जुनी-१०९१.६-१३३०.९
सरासरी- १०९१.९-१२२०.३

Web Title: still an average rainfall deficit of 128 4mm in gondia six days left now

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.