अजूनही वीज व पाण्याच्या सोयीचा अभाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 7, 2019 09:16 PM2019-02-07T21:16:44+5:302019-02-07T21:18:28+5:30
मागील काही वर्षात कचारगड धनेगाव परिसरात बऱ्याच काही सोयी उपलब्ध करुन देण्याचा प्रयत्न झाला. यात वीज व पाणी उपलब्ध करुन देण्यासाठी कामे करण्यात आली. परंतु आजही या सुविधा अपूर्ण अवस्थेत आहे.
विजय मानकर ।
लोकमत न्यूज नेटवर्क
सालेकसा : मागील काही वर्षात कचारगड धनेगाव परिसरात बऱ्याच काही सोयी उपलब्ध करुन देण्याचा प्रयत्न झाला. यात वीज व पाणी उपलब्ध करुन देण्यासाठी कामे करण्यात आली. परंतु आजही या सुविधा अपूर्ण अवस्थेत आहे. त्यामुळे कचारगड यात्रेत सहभागी होणाºया विविध प्रांतातील भाविकांना याचा त्रास सहन करावा लागतो.त्यामुळे शासन स्तरावरुनच ठोस उपाय योजना होण्याची गरज आहे.
धनेगाव येथे संमेलन परिसरात जि.प.च्या पाणी पुरवठा योजने अंतर्गत नळ योजना तयार करण्यात आली. विहिरीत १०-१० एचपीचे दोन मोटारपंप लावण्यात आले आहेत. त्याद्वारे पाण्याची टाकी भरुन पाणी पुरवठा केला जातो. परंतु कचारगड गुफा परिसरात पिण्याच्या पाण्याची व्यवस्था अद्यापही करण्यात आली नाही. त्यामुळे छोट्या आणि मोठ्या गुफा परिसरात भ्रमण करताना व देवी देवतांच्या दर्शनाकरिता पहाड चढावे लागत असल्याने भाविकांना सतत पिण्याच्या पाण्याची सारखी गरज पडते. अशात या परिसरात पिण्याचे शुद्ध पाणी मिळत नाही.
भाविकांनी सोबत नेलेले पाणी सुध्दा पुरत नाही. अशात गुफा परिसरात पिण्याच्या पाण्याची सोय असणे आवश्यक आहे. तसेच धनेगाव ते कचारगड तीन कि.मी.चा खडतर प्रवास पायी स्वरुपात पूर्ण करीत असताना सुद्धा पिण्याच्या पाण्याची गरज भासत असते. रस्त्यावर ठिकठिकाणी नळांची व्यवस्था करण्यात यावी अशी मागणी सुध्दा कचारगड समितीने शासनाकडे केली आहे.
यापूर्वी रस्त्यावर मधात एका ठिकाणी बोअरवेल खोदण्यात आली होती. परंतु त्या बोअरवेलचे पाणी दूषित असल्याने ते पिण्या योग्य नाही. अशात धनेगाव येथील शुद्ध पाणी पहाड परिसरापर्यंत पाणी पोहोचविण्याची व्यवस्था होणे आवश्यक आहे.त्याचबरोबर ठिकठिकाणी नळाचे स्टॅन्ड लावून रस्त्यावर पिण्याच्या पाण्याची व्यवस्था झाली पाहिजे.धनेगाव ते कचारगड मार्गावर पथदिवे लावल्यास रस्त्यावरून ये-जा करणे सोपे होईल.
धनेगाव येथे पाणी पुरवठा योजनेअंतर्गत पुरेशी पाण्याची सोय झाली आहे. परंतु कचारगड गुफेपर्यंत पाणी पोहोचविण्याचा प्रयत्न केला असता जवळपास १५० फुट उंच पहाडी असून त्या उंचीपर्यंत पाणी चढत नाही. म्हणून तिथे पाणी पुरवठा विभागातर्फे पाणी उपलब्ध करता येऊ शकत नाही. शासन स्तरावर ठोस उपाय राबविण्यास उंच पहाडीपर्यंत गुफा परिसरात पिण्याचे पाणी उपलब्ध होऊ शकते.ही समस्या तात्पुरती मार्गी लावण्यासाठी पहिल्या गेटपर्यंत धनेगाव गावावरुन पाईप लाईनद्वारे पाणी पुरवठा करण्याचा प्रयत्न आहे.
- आशिष अडमे
कनिष्ठ अभियंता ग्रामीण पाणी पुरवठा विभाग.
धनेगावच्या संमेलन परिसरात भोजन व्यवस्था आणि माँ काली कंकाली ठाण्यात हॉयमास्ट लाईटची व्यवस्था शासनाने करुन द्यावी जेणेकरुन रात्रीचे कार्यक्रम व दर्शन घेणे सोयीचे होईल.
- बारेलाल वरकडे
कोषाध्यक्ष कचारगड समिती
गुफा परिसरात काही ठिकाणी खांबावर दिवे लावण्यात येतील.यासाठी तयारी करण्यात येत आहे. हॉयमास्ट लाईटची व्यवस्था शासनाकडून झाल्यास विद्युत विभाग त्याला वीज जोडणी करुन देईल.
-व्ही.पी.गजभिये
कनिष्ठ अभियंता महावितरण.