रुग्णाच्या पत्नीची डॉक्टरकडून छेडछाड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 13, 2018 10:24 PM2018-12-13T22:24:31+5:302018-12-13T22:25:04+5:30
स्थानिक ग्रामीण रुग्णालयात भरती असलेल्या रुग्णाच्या पत्नीचा डॉक्टरने गाल व हात पकडून विनयभंग केला. तो एवढ्यावरच थांबला नाही तर त्याने रुग्ण व रुग्णाच्या पत्नीला मारहाण केली. वैद्यकीय क्षेत्राला काळीमा फासणारी संतापजनक घटना बुधवारी (दि.१२) मध्यरात्री घडली.
लोकमत न्यूज नेटवर्क
अर्जुनी मोरगाव : स्थानिक ग्रामीण रुग्णालयात भरती असलेल्या रुग्णाच्या पत्नीचा डॉक्टरने गाल व हात पकडून विनयभंग केला. तो एवढ्यावरच थांबला नाही तर त्याने रुग्ण व रुग्णाच्या पत्नीला मारहाण केली. वैद्यकीय क्षेत्राला काळीमा फासणारी संतापजनक घटना बुधवारी (दि.१२) मध्यरात्री घडली. या घटनेने महिला रुग्ण व महिला कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. तक्रारीवरुन डॉ.नेपालसिंग बघेले यांच्यावर अर्जुनी मोरगाव पोलिसांनी विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे.
प्राप्त माहितीनुसार बरडटोली येथील एका रुग्णाला भोवळ येत असल्याने त्याला बुधवारी दुपारी सुमारे ३ वाजता स्थानिक ग्रामीण रुग्णालयात भरती केले. राष्ट्रीय बालस्वास्थ कार्यक्रमांतर्गत कार्यरत असलेले डॉ. नेपालसिंग बघेले हे रात्रपाळीत कर्तव्यावर होते. रुग्णासह त्याची पत्नी ही सुश्रृषेसाठी रुग्णालयातच होती. रात्री ११ वाजतादरम्यान डॉक्टरने मी काही मदत करु काय अशी विचारणा रुग्णाच्या पत्नीला केली. तीने मदतीची आवश्यकता नसल्याचे सांगितले. डॉ. बघेले यांनी रुग्णाची तपासणी केली व रक्ताची कमतरता असल्याचे सांगितले. डॉक्टरने रात्री ११.३० वाजताच्या सुमारास रुग्णाचे पत्नीला बाहेर येण्यास सांगितले. तिचे नाव गावाविषयी तिला विचारणा केली व जवळ ये असे म्हणाला. रुग्णालयाबाहेर सामसूम असल्याने तिला भिती वाटली. त्यामुळे ती थेट वार्डात पतीच्या बिछाण्यावर आली व झोपी गेली. ती झोपली असताना डॉ. बघेले तिच्याजवळ आले व तिचे गाल पकडले. ती जोरात ओरडली. तेव्हा डॉ. तिचे पतीचे बेडकडे गेला व त्याला हात लावला. तो घाबरुन उठला. तेव्हा डॉक्टरने रुग्णाच्या थोबाडीत हाणले. रुग्णालयातील कर्मचारी तिचेजवळ गोळा झाले व डॉक्टरची समजूत घातली. डॉक्टर ऐकत नव्हते.त्यांनी आपला मोर्चा रुग्णाच्या पत्नीकडे वळविला व तिच्याही गालपटावर लगावले असा संतापजनक व तेवढाच वैद्यकीय पेशाला अशोभनिय असा प्रकार येथे घडला आहे.
गुरुवारी (दि.१३) सकाळी याची माहिती मिळताच शिवसैनिकांनी रुग्णालयावर धावा बोलला. डॉक्टरला आमचे समोर हजर करा व त्याचेवर कारवाई करण्याची मागणी त्यांनी वैद्यकीय अधीक्षक डॉ.अकिनवार यांचेकडे केली.डॉ. बघेले यांना रुग्णालयातील कर्मचाºयांनीच पळून जाण्याची सवड दिल्याचा आरोप शिवसैनिकांनी केला. यापूर्वी सुद्धा याच डॉक्टरचे किस्से गाजले आहेत. त्या डॉक्टराला या रुग्णालयात ठेवणार नसल्याचे आश्वासन डॉ.अकिनकर यांनी दिले. रुग्णाच्या पत्नीच्या लेखी तक्रारीवरुन अर्जुनी मोरगाव पोलिस ठाण्यात डॉ. नेपालसिंग बघेले यांच्याविरुद्ध भादंवि ३५४ अ, ३२३ कलमान्वये गुन्हा नोंदविण्यात आला असून त्याला ताब्यात घेण्यात आले आहे. पोलीस निरीक्षक शिवराम कुंभरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस उपनिरीक्षक मनोहर बुराडे हे तपास करीत आहेत.
हकालपट्टी करण्याची शिवसैनिकांची मागणी
स्थानिक ग्रामीण रुग्णालय हे सदैव चर्चेत असते. अनेकदा कुठला ना कुठला तरी प्रकार येथे घडतच असतात. वैद्यकीय अधीक्षक डॉ. अकिनवार हे आठवड्यातून एखादे दिवशी येतात अशी तक्रार नित्याचीच आहे. या घटनेच्या निमित्ताने महिला रुग्ण व महिला कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आहे. या रुग्णालयात संगणक आॅपरेटर म्हणून धिरज शेंडे हे कार्यरत आहेत. ते रुग्ण व त्यांचे नातेवाईकांशी असभ्य वर्तणूक करतात. कोणत्याही कामासाठी गेले असता अरेरावीने बोलणे व कामाविषयी टाळाटाळ करीत असल्याचा आरोप शिवसैनिकांनी केला असून त्याची तातडीने हकालपट्टी करण्याची मागणी केली आहे.
ग्रामीण रुग्णालयाने केली तक्रार
रुग्णालयात दाखल असलेल्या रुग्ण त्याची पत्नी यांनी स्थानिक पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविल्यानंतर स्थानिक ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. अकिनकर यांनीही याप्रकरणी चौकशी करण्याचे पत्र पोलीस निरीक्षकांच्या नावे दिले आहे. यात डॉ. बघेले हे रुग्णालयात नेहमी मद्यप्राशन करुन कार्यरत कर्मचाºयांसोबत गैरवर्तणूक करीत असल्याची तक्रार केली आहे.