संतप्त पालकांनी केले पाल्यांना शाळेत पाठविणे बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 15, 2018 09:34 PM2018-10-15T21:34:51+5:302018-10-15T21:35:06+5:30
गोरेगाव तालुक्याअंतर्गत येणारी जि.प.वरिष्ठ प्राथमिक डिजीटल शाळा निंबा येथे शिक्षण विभागाने सहा महिन्याचा कालावधी लोटूनही शिक्षकांची नियुक्ती केली नाही. त्यामुळे संतप्त पालकांनी सोमवार (दि.१५) पासून आपल्या पाल्यांना शाळेत पाठविणे बंद केले. तसेच जोपर्यंत शिक्षकाची नियुक्ती होत नाही तोपर्यंत पाल्यांना शाळेत न पाठविण्याचा निर्णय घेतला.
लोकमत न्यूज नेटवर्क
निंबा-तेढा : गोरेगाव तालुक्याअंतर्गत येणारी जि.प.वरिष्ठ प्राथमिक डिजीटल शाळा निंबा येथे शिक्षण विभागाने सहा महिन्याचा कालावधी लोटूनही शिक्षकांची नियुक्ती केली नाही. त्यामुळे संतप्त पालकांनी सोमवार (दि.१५) पासून आपल्या पाल्यांना शाळेत पाठविणे बंद केले. तसेच जोपर्यंत शिक्षकाची नियुक्ती होत नाही तोपर्यंत पाल्यांना शाळेत न पाठविण्याचा निर्णय घेतला.
त्यामुळे शाळा सुरू असूनही विद्यार्थ्यांना अभावी बंद असल्याचे चित्र होते. प्राप्त माहितीनुसार निंबा येथील जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक डिजीटल शाळेत वर्ग १ ते ७ असून शिक्षकांची सहा पदे मंजूर आहेत. मात्र मागील सहा ते सात महिन्यापासून शिक्षकाची तीन पदे रिक्त आहेत. परिणामी विद्यार्थ्याचे शैक्षणिक नुकसान होत आहे. शिक्षकांची रिक्त पदे भरण्यात यावी अशी मागणी पालकांनी वांरवार केली. मात्र जि.प.शिक्षणाधिकारी व गटशिक्षणाधिकारी यांनी याची अद्यापही दखल घेतली नाही.
त्यामुळे पालकांमध्ये रोष व्याप्त होता. विशेष म्हणजे यापूर्वी सुध्दा शिक्षकांची नियुक्ती न करण्यात आल्याने पालकांनी १७ सप्टेंबरला शाळेला कुलूप ठोकले होते. तेव्हा गटशिक्षणाधिकाऱ्यांनी दोन दिवसात शिक्षकांची नियुक्ती करण्याचे आश्वासन भ्रमणध्वनीद्वारे दिले होते. मात्र आता महिन्याभराचा कालावधी लोटूनही शिक्षकांची नियुक्ती करण्यात आली नाही. शिक्षक न नसल्यामुळे विद्यार्थ्याचे नुकसान होत आहे. त्यामुळे पालकांनी सोमवारपासून (दि. १५)आपल्या पाल्यांना शाळेत पाठविणे बंद केले. जोपर्यंत शिक्षकाची नियुक्ती होत नाही. तोपर्यंत पाल्यांना शाळेत पाठविणार नाही. अशी भूमिका पालकांनी घेतली आहे. येथील शाळेत एकूण १२२ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. या संपूर्ण विद्यार्थ्याची जबाबदारी केवळ तीन शिक्षकांवर अवलंबून आहे. यातून मुख्याध्यापकांचा अर्धा वेळ दस्तावेज अद्ययावत ठेवण्यामध्ये जातो. परिणामी विद्यार्थ्याना शिकविण्यात अडचण जात आहे. या शाळेत तीन शिक्षक कार्यरत असून पुन्हा तीन शिक्षकांची पदे रिक्त आहेत. दरम्यान पालकांनी घेतलेल्या आक्रमक भूमिकेनंतर याप्रकरणी शिक्षण विभाग नेमकी काय भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
वाय.एस.कटरे या शिक्षकाची जि.प.शाळा निंबा येथे तात्पुरती नियुक्ती केली होती. परंतु त्यानी निंबा शाळेत नियुक्ती घेतली नाही म्हणून आज पंचायत समिती गोरेगाव येथील मासीक सभेत ठराव पारीत केला. यावरुन उद्या एका शिक्षकांची तात्पुरती व्यवस्था करण्यात येणार आहे. संच मान्यतेनंतर स्थायी स्वरुपात शिक्षकाची नियुक्ती केली जाईल.
एम.बी.लाडे, गटशिक्षणाधिकारी, पं.स.गोरेगाव.