तिरोडा रेल्वे स्थानकावरील पुलाचे बांधकाम थांबवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2018 11:38 PM2018-01-13T23:38:03+5:302018-01-13T23:38:19+5:30

‘पॉवर सिटी’ म्हणून प्रसिद्ध झालेल्या तिरोडा शहरातील रेल्वे स्टेशन सोयी सुविधांच्या बाबतीत अद्यापही मागासले आहे. ट्रॅक ओलांडून जाणाच्या प्रकारामुळे कधी जीवितहानी होण्याचा धोका नाकारता येत नाही.

Stop the construction of the bridge at Tiroda Railway Station | तिरोडा रेल्वे स्थानकावरील पुलाचे बांधकाम थांबवा

तिरोडा रेल्वे स्थानकावरील पुलाचे बांधकाम थांबवा

Next
ठळक मुद्देप्रस्तावित जागेला विरोध : मालगोदामाजवळ नवीन पादचारी पूल तयार करा

लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : ‘पॉवर सिटी’ म्हणून प्रसिद्ध झालेल्या तिरोडा शहरातील रेल्वे स्टेशन सोयी सुविधांच्या बाबतीत अद्यापही मागासले आहे. ट्रॅक ओलांडून जाणाच्या प्रकारामुळे कधी जीवितहानी होण्याचा धोका नाकारता येत नाही. मागील अनेक वर्षांपासून मालगोदामाजवळ नवीन पादचारी पुलाचे बांधकाम करण्यात यावे, अशी नागरिकांची मागणी होती. मात्र रेल्वे प्रशासनाने तेथे नवीन पुलाचे बांधकाम न करता बेलाटी गावाच्या दिशेकडे पुलाचे बांधकाम सुरू करून प्रवाशी व नागरिकांच्या सुविधांकडेच दुर्लक्ष केल्याने नागरिकांमध्ये रोष व्याप्त आहे.
‘ट्रॅक ओलांडून जाणे’ व ‘ट्रॅक ओलांडून येणे’ ही तिरोडा रेल्वे स्थानकाच्या प्रमुख समस्यांपैकी एक समस्या आहे. तिरोडा रेल्वे स्थानकात एका प्लॅटफॉर्मवरून दुसऱ्या प्लॅटफॉर्मवर ये-जा करण्यासाठी बेलाटी गावाच्या दिशेने बुकिंग आॅफिसजवळ जुने पूल आहे. परंतु तिरोडा शहरातून येणारे प्रवासी या पुलाचा उपयोग फार कमी करतात. ते सरळ मालगोदामाजवळील पायवाटेने रेल्वे मार्ग ओलांडून प्लॅटफॉर्म-१ वर जातात. तर प्लॅटफॉर्म-१ वर उतरलेले प्रवासी शहरात जाण्यासाठी पुन्हा रेल्वे ट्रॅक ओलांडून याच पायवाटेने शहराकडे जातात. या प्रकारामुळे अपघाताची नाकारता येत नाही. प्लॅटफॉर्म-१ वर असलेल्या पाणी टाकीच्या समोरच्या बाजूने सरळ तिरोडा शहराकडे जाणाऱ्या रस्त्याच्या दिशेने एका नवीन पुलाची गरज आहे. मात्र लोकप्रतिनिधी व रेल्वे प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष असल्याने प्रवाशांना जीव धोक्यात घालावा लागत आहे.मागील अनेक वर्षांपासून मालगोदामाजवळ प्रवाशांच्या सुविधांच्या दृष्टीने नवीन पूल व तिकीट घराची मागणी केली जात होती. मात्र रेल्वे प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष करून दुसरीकडे शहरापासून दूर बेलाटी रोडवर नवीन पुलाचे बांधकाम सुरू केले आहे. बेलाटी रोडवर आधीच एक जुने पूल आहे. त्यामुळे गरज नसताना परत त्याच ठिकाणी पूल तयार केले जात असल्याने याला प्रवाशी व नागरिकांनी विरोध केला आहे.
रेल्वे विभागाकडून तिसरी लाईन टाकण्याचे काम सुरु आहे. हे काम दुर्ग रेल्वे स्थानकापर्यंत पूर्ण झाले आहे. तिसºया लाईनच्या दृष्टीने सध्याचे पूल व तिकीट घर तोडणे गरजेचे आहे. ही बाब लक्षात घेवून रेल्वे प्रशासन नवीन पूल व तिकीट घराचे बांधकाम करीत आहे. या कामावर कोट्यवधी रूपये खर्च होणार आहेत. मात्र प्रवाशांच्या सुविधेच्या दृष्टीने हे सुविधायोग्य नसल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
लोकप्रतिनिधी अनभिज्ञ
आवश्यक सुविधा पुरविण्यात रेल्वे प्रशासन कमी पडले आहे. तिरोडा स्थानकाच्या विकासासाठी आमदार व इतर लोकप्रतिनिधींकडूनही अद्याप गांर्भियाने पुढाकार घेण्यात आला नाही. अदानी पॉवरसारखा मेगाप्रोजेक्ट तिरोड्यात आल्यानंतर तिरोडा शहराच्या आणि तालुक्यासाठी विकासाची दारे उघडल्या गेली. मात्र रेल्वे स्थानकावर विविध सोयीसुविधांची अजूनही कमतरता आहे. नागरिकांच्या मागण्या व पुलाची गरज कुठे आहे, ही बाब लोकप्रतिनिधीना माहीत आहे.
इलेक्ट्रॉनिक उद्घोषणा तीन वर्षांपासून डबाबंद
तिरोडा रेल्वे स्थानकावर मागील तीन वर्षांपूर्वीच इलेक्ट्रॉनिक अनाऊंस सिस्टिम उपलब्ध झाले आहे. मात्र लाखोचे हे उपकरण बुकींग कार्यालयात मागील तीन वर्षांपासून धूळखात पडून आहे. त्याचे संचालन अद्यापही करण्यात आले नाही. त्यासाठी मनुष्य बळ कमी असल्याचे कारण सांगितले जात आहे. यंत्र मिळाले मग ते संचालित करण्यासाठी तीन वर्षांचा कालावधी लोटूनही एकाही कर्मचाºयाची नियुक्ती का करण्यात आली.

नवीन पादचारी पुलाचे बांधकाम चुकीच्या ठिकाणी होत असून प्रवाशांची गैरसोय होणार आहे. ही गैरसोय टाळण्यासाठी नवीन पुलाचे बांधकाम व तिकीट घरही मालगोदामाजवळ किंवा हनुमान मंदिराजवळ करावे.
-नितीन लारोकर, तिरोडा
बेलाटी रोडवर आधीच पूल असून तिकडेच दुसरे पूल बनविणे अयोग्य आहे. नवीन पुलाचे बांधकाम मालगोदामाजवळ करण्यात यावे. हनुमान मंदिराजवळ पादचारी प्रवासी मार्ग तयार करण्यात यावे.
-अतुल गजभिये, तिरोडा
उड्डाण पुलासाठी रेल्वे प्रस्तावितं केलेली जागा चुकीची असून प्रवाशांच्या दृष्टीने गैरसोयीचे आहे. त्यामुळे या पुलाचा उपयोग होणार नसून कोट्यवधी रुपयांचा खर्च व्यर्थ ठरेल.
- नरेश वत्यानी, व्यापारी, तिरोडा
मागील अनेक वर्षांपासून मालगोदामाजवळ तिरोडावासीयांची पुलाची मागणी होती. रेल्वे प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष करून प्रवासी व नागरिकांचे हित व सुविधांकडे पाठ फिरवली आहे.
प्रा. लेखानंद राऊत, तिरोडा
मालगोदामाजवळच नवीन पुलाचे बांधकाम करण्यात यावे. अन्यथा रेल्वे ट्रॅक आणखी किती जणांचा बळी घेईल, ते सांगता येत नाही.
-महेंद्र नखाते, तिरोडा.
९५ टक्के प्रवासी मालगोदामाजवळूनच रेल्वे स्थानकात ये-जा करतात. त्यामुळे बेलाटीच्या दिशेने पूल बनविणे अत्यंत चुकीचे आहे. पूल व बुकिंग आॅफिस मालगोदामाजवळच तयार करण्यात यावे.
-सुनील येरपुडे,
अध्यक्ष, सराफा असोसिएशन, तिरोडा
तयार होणारे नवीन पूल जनतेसाठी असुविधाजनक आहे. त्यामुळे शासनाने पुनर्विचार करून सदर पुलाचे बांधकाम थांबवावे व मालगोदामाजवळच नवीन पुलाचे बांधकाम करावे.
-अजय गौर, माजी नगराध्यक्ष, तिरोडा
तिरोडा शहराची ९० टक्के वसाहत मालगोदामाकडील भागात आहे. मालगोदाम बेवारस स्थितीत आहे. ते पाडून बुकिंक आॅफिस व तेथेच पूल तयार करण्यात यावे. बेलाटीकडे पूल बनविणे अयोग्य असून नागरिकांसाठी त्रासदायक ठरेल. तसेच त्यावरील खर्चसुद्धा व्यर्थ ठरेल.
-ओमप्रकाश (बाळू) येरपुडे, माजी नगरसेवक, तिरोडा.
सध्याच्या पुलाच्या होणाºया बांधकामाकडे एसटी बस किंवा चारचाकी वाहन पोहचू शकत नाही. त्यामुळे ते बांधकाम थांबवून मालगोदामाजवळ बुकिंग आॅफिस व पुलाचे बांधकाम करावे. तेव्हाच एसटी बस रेल्वे स्थानकापर्यंत पोहचू शकेल व प्रवाशांना पाच, दहा रूपयांची एसटी तिकीट घेवून रेल्वे स्थानक-शहर-रेल्वेस्थानक-बसस्थानक असा प्रवास करण्याची सुविधा मिळू शकेल.
-मोहन ज्ञानचंदानी, सामाजिक कार्यकर्ते, तिरोडा

Web Title: Stop the construction of the bridge at Tiroda Railway Station

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.