रेल्वे फलाटावरील मद्यप्राशन बंद
By admin | Published: January 15, 2015 10:53 PM2015-01-15T22:53:23+5:302015-01-15T22:53:23+5:30
‘रेल्वे स्थानक की खुले मदिरालय’ अशी बातमी लोकमतमध्ये प्रकाशित होताच दुसऱ्या दिवसापासून पासिंग रस्त्यावर रेल्वे पोलिसांनी रात्रीच्या वेळी गस्त सुरू केली. तसेच पार्सल पासिंग रस्त्याची
उशिरा सुचले शहाणपण : सर्व जबाबदारी पोलिसांचीच काय?
गोंदिया : ‘रेल्वे स्थानक की खुले मदिरालय’ अशी बातमी लोकमतमध्ये प्रकाशित होताच दुसऱ्या दिवसापासून पासिंग रस्त्यावर रेल्वे पोलिसांनी रात्रीच्या वेळी गस्त सुरू केली. तसेच पार्सल पासिंग रस्त्याची स्वच्छताही होत आहे. त्यामुळे आता होम फलाटावर दारूचे रिकामे पव्वे व बियरच्या खाली बाटल्या दिसून येत नाही.
विशेष म्हणजे या प्रकाराबाबत रेल्वे पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक एस.यू. सिंग यांना विचारणा केल्यावर ते म्हणाले की, रेल्वेच्या फलाटावर दारू प्राशन करणे चुकीचे असून त्यातून अनेक प्रवाशांची गैरसोय होते. मात्र त्यावर आळा घालण्याची जबाबदारी केवळ पोलीस प्रशासनाचीच आहे काय? इतर सुज्ज्ञ प्रवाशी, रेल्वेचे स्वच्छता कर्मचारी किंवा रेल्वेच्या इतर कर्मचाऱ्यांना हा प्रकार आढळत असल्यास त्यांनी पुढाकार घेवून पोलिसांना कळविणे आवश्यक आहे. मात्र कुणीही या प्रकाराबाबत आम्हाला कळवित नाही. असे प्रकार फलाटावर दिसून आल्यास दूरध्वनीवरून पोलिसांना माहिती द्यावी, असे आवाहनसुद्धा त्यांनी केले.
विलंबाने धावणाऱ्या रेल्वे गाड्यांच्या प्रतीक्षेत काही प्रवाशी रेल्वे स्थानकाच्या होम प्लॅटफार्मजवळ असलेल्या पार्सल पासिंग रस्त्यावरच मद्य प्राशन करून दारूचे रिकामे पव्वे व बियरच्या खाली बाटल्या भिंतीशेजारी ठेवून द्यायचे. हा प्रकार रेल्वेच्या स्वच्छता कर्मचाऱ्यांना नक्कीच माहीत असेल. याचे कारण म्हणजे सकाळी स्वच्छता करतेवेळी हे रिकामे पव्वे त्यांना आढळतात. परंतु त्यांच्यापैकी कुणीही ही बाब पोलिसांच्या निदर्शनास आणून देण्यासाठी पुढे आले नाही. त्यामुळे हा प्रकार राजरोसपणे सुरू होता.
लोकमतने हा प्रकार रेल्वे पोलिसांच्या निदर्शनास आणून दिला. त्यामुळे पोलिसांनीसुद्धा होम प्लॅटफॉर्मवरील पार्सल पासिंग रस्त्याकडे आपले लक्ष केंद्रीत केले असून फलाटावर होणाऱ्या या गैरप्रकाराला सध्यातरी आळा बसल्याचे चित्र दिसून येत आहे. (प्रतिनिधी)