कोर्टाच्या आदेशापर्यंत निवडणूक प्रक्रिया थांबवा
By admin | Published: June 23, 2017 01:13 AM2017-06-23T01:13:02+5:302017-06-23T01:13:02+5:30
ग्रामपंचायत आमगाव खुर्दला सालेकसा नगर पंचायतमध्ये समाविष्ट करावे की नाही याबाबतचे प्रकरण मुंबई उच्च न्यायालयाच्या...
ग्रा.पं. आमगावखूर्दचे तहसीलदारांना निवेदन : बहिष्कार घालण्याचा प्रस्ताव पारित
लोकमत न्यूज नेटवर्क
सालेकसा : ग्रामपंचायत आमगाव खुर्दला सालेकसा नगर पंचायतमध्ये समाविष्ट करावे की नाही याबाबतचे प्रकरण मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंड पिठात प्रलंबित असून उच्च न्यायालयाचा निकाल येईपर्यंत आमगाव खुर्द ग्रामपंचायत निवडणुकीची कोणतीही प्रक्रिया करण्यात येऊ नये अशा आशयाचे प्रस्ताव ग्रामपंचायत आमगाव खुर्द ने पारित करुन तसे निवेदन सालेकसाचे निवडणूक अधिकारी व तहसीलदार प्रशांत सांगळे यांना सादर करण्यात आले आहे.
अडीच वर्षांपूर्वी सालेकसा ग्रामपंचायतला नगर पंचायत घोषित करण्यात आले. परंतु आमगाव खुर्द सुद्धा सालेकसाचा एक महत्वपूर्ण भाग असून दोन्ही ग्रामपंचायती मिळून एक सालेकसा नगर पंचायत बनविण्यात यावी जेणेकरुन येथील सालेकसा नगराला व नगरवासीयांना न्याय मिळेल, अशी अपेक्षा सालेकसा नगरवासी करीत आहेत. परंतु मुळात सालेकसा नगर हे आमगाव खुर्द ग्रामपंचायतमध्ये मोडत असल्याने मोठी तांत्रिक अडचण निर्माण झाली आहे. ही बाब शासनातील आणि प्रशासनातील वर बसलेल्या पदाधिकारी व अधिकाऱ्यांना सहज कळत नाही असे दिसत आहे. त्यामुळे या ग्रामपंचायतीचा तिढा कायम आहे.
मागील वर्षी राज्यात सर्वत्र नवनिर्मित नगर पंचायतीच्या निवडणुका लागल्या. तेव्हा सालेकसानगर पंचायतची सुद्धा निवडणूक प्रक्रिया सुरू झाली. परंतु लगेच आमगाव खुर्द वासीयांनी उच्च न्यायालयात धाव घेतली व नगर पंचायत निवडणुकीवर स्थगिती आणत आमगाव खुर्दला समाविष्ट करण्याची मागणी केली. मागील दीड वर्षापासून प्रकरण न्यायालयात प्रलंबित आहे. तर दुसरीकडे येत्या काही महिन्यात राज्यात ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुका होणार असून त्यासाठी प्रभाग रचना व प्रभाग आरक्षण प्रक्रिया सुरू झालेली आहे. अशात शासनाच्या आदेशाप्रमाणे व निवडणूक आयोगाच्या निर्देशनुसार स्थानिक निवडणूक अधिकाऱ्यांनी आमगाव खुर्द ग्रामपंचायतमध्ये सुद्धा प्रभाग रचना आणि आरक्षणाचा कार्यक्रम सुरू केला आहे.
यावर आमगाव खुर्द ग्रामपंचायतच्या कमिटीने एकमताने या निवडणूक प्रक्रियेवर बहिष्कार घालण्याचा प्रस्ताव पारीत केला आहे. तसेच सालेकसाचे तहसीलदार व नगर पंचायत प्रशासक आणि निवडणूक अधिकारी सांगळे यांना निवेदन सादर करीत निवडणूक प्रक्रिया थांबविण्याची मागणी केली. त्या मार्फत शासनाला निवेदन करीत न्यायालयाच्या आदेशापर्यंत जैसे थे परिस्थिती राहू द्यावी असा आग्रह केला.
निवेदन देणाऱ्यांमध्ये सरपंच योगेश राऊत, उपसरपंच हरजीत कौर भाटीया, सदस्य ब्रजभूषण बैस, अजय डोये, संदीप डेकाटे, वासुदेव चुटे, कुलतारसिंह भाटीया, सुरेश प्रजापती, हर्षलात शर्मा, रमेश फुंडे, प्रेमलता बन्सोड, दिलीप तिवारी, धनंजय बंडीवार, महेश खोकले, विनय शर्मा, विजय फुंडे, अनिल शेंदरे, शशी फुंडे, सुरेश दोनोडे, अभिषेक चुटे, भिमराव भास्कर, मोनालिषा ब्राम्हणकर, सुजित बन्सोड यांच्यासह इतर नगरवासी उपस्थित होते.