सौंदड येथील रेल्वे स्थानकावर लांब पल्ल्याच्या गाड्यांना थांबा द्या ()
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 8, 2021 04:19 AM2021-07-08T04:19:44+5:302021-07-08T04:19:44+5:30
गोंदिया : जिल्ह्यातील रेल्वे विभागाशी संबंधित विविध प्रश्न आणि अडचणींसंदर्भात मंगळवारी खा. सुनील मेंढे यांनी रेल्वेचे विभागीय व्यवस्थापक मनिंदर ...
गोंदिया : जिल्ह्यातील रेल्वे विभागाशी संबंधित विविध प्रश्न आणि अडचणींसंदर्भात मंगळवारी खा. सुनील मेंढे यांनी रेल्वेचे विभागीय व्यवस्थापक मनिंदर उत्पल यांची भेट घेत विस्तृत चर्चा केली. सौंदड येथील रेल्वे स्थानकावर लांब पल्ल्यांच्या गाड्यांना थांबा देण्यात यावा तसेच तेथील आरक्षण केंद्र सुरू राहावे, या दृष्टीनेही सूचना केल्या. तिसऱ्या रेल्वे मार्गाच्या निर्मिती कामाचा आढावा घेताना विविध विषयांना खासदारांनी स्पर्श केला. या कामादरम्यान गोंदिया शहर आणि परिसरात काही अडचणी येत आहेत. त्या सोडविण्याच्या दृष्टीने स्वतंत्र बैठक लवकरच घेण्याचे विभागीय व्यवस्थापक यांनी सांगितले. काही अपवाद वगळता तिसऱ्या रेल्वे मार्गाचे काम पुढील वर्षभरात पूर्णत्वाच्या दिशेने जाईल, असे सांगितले. रेल्वे मार्गावरील स्थापत्य बांधकामाच्या संदर्भातही यावेळी चर्चा झाली. भुयारी मार्ग, उडान पुलाच्या सुरू असलेल्या कामाची चर्चा सुरू असताना, हिरडामाली आणि पिंडकेपार येथील रेल्वे स्थानकाजवळील बांधकामांकडे विशेष लक्ष देण्याचे खासदारांनी सांगितले. बिरसोला येथील बांधकाम संथ गतीने सुरू असल्याने कामाची गती वाढण्याच्या दृष्टीने खासदारांच्या सूचनेनंतर विभागीय व्यवस्थापकांनी संबंधित अधिकाऱ्यांना दूरध्वनी वरून निर्देश दिले. गोंदिया येथील तयार स्थितीत असलेल्या शॉपिंग कॉम्प्लेक्सच्यासंदर्भात नवीन निविदा काढून येत असलेल्या अडचणी दूर करण्याच्या संदर्भात चर्चा झाली.