पुलासाठी ग्रामस्थांचा रास्ता रोको
By admin | Published: February 13, 2016 01:13 AM2016-02-13T01:13:25+5:302016-02-13T01:13:25+5:30
विहीरगाव-बुराड्या ते भुगाव-मेंढा दरम्यानच्या चुलबंद नदीवर चार वर्षापुर्वी पूलाचे बांधकाम पूर्ण झाले.
व्यथा विहीरगाव-भूगाव मार्गाची : जिल्हा परिषद अध्यक्षांची आंदोलनात हजेरी
सानगडी : विहीरगाव-बुराड्या ते भुगाव-मेंढा दरम्यानच्या चुलबंद नदीवर चार वर्षापुर्वी पूलाचे बांधकाम पूर्ण झाले. पूलाच्या दोन्ही बाजूला शेती आहे. संबंधित शेतकऱ्यांना त्यांच्या शेतीच्या संबंधाने समाधानकारक मोबदल्याची शासनाची भूमिका न दिल्याने सदर शेती पोच मार्गासाठी अधिग्रहीत झाली नाही. चार वर्षांपूर्वी तयार झालेला पूल पोच मार्गाविना असल्याने शोभेची वास्तू म्हणून उभी आहे. संतप्त झालेल्या नागरिकांनी आज रास्ता रोको आंदोलन केले.
दोन्ही तिरावर पोच मार्ग तयार न झाल्याने ऐलतिरावरून पैलतिरावर पायी अथवा वाहनाने पूलावरून परिसरातील नागरिकांना आवागमन करता येत नाही. भुगाव-मेंढा, विहीरगाव, कोलारी, मुरमाडी आदी गावातील नागरिकांनी कित्येकदा पोचमार्ग तयार करण्यासाठी संबंधित अधिकारी, आमदार, खासदार यांना प्रत्यक्षात निवेदन दिले. तब्बल चार वर्षाचा कालावधी लोटला पण याबाबत काहीच कार्यवाही झाली नाही. परिणामी परिसरातील नागरिकांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करून रास्ता रोको आंदोलन केले.
सध्या ऐलतिरावरून पैलतिरावरील गावाकडे जाण्यासाठी पूल तयार आहे. पण पुलापर्यंत जाण्यासाठी पोच मार्ग नाही. तात्पुरती हंगामी सोय म्हणून नदीतून कच्चा रपटा मार्ग तयार करून आवागमन करावे लागत आहे. या मार्गावरील विहीरगाव बुराड्या गोपालपूरी म्हणून तर भुगाव मेंढा विदर्भातील पंढरपूर म्हणून प्रसिद्ध आहेत. दरवर्षी भुगाव, पंढरपुरला भव्यदिव्य संत सोहळा भरत असून लाखो लोकांची उपस्थिती असते. हा मार्ग सानगडी-विहीरगाव, भुगाव-मुरमाडी, पिंपळगाव-लाखनी-भंडारा असा जोडलेला आहे.
या मार्गावरील नागरिकांचे भविष्यातील सोई सुविधा विचारात घेवून तत्कालीन केंद्रीय मंत्री प्रफुल्ल पटेल यांच्या प्रयत्नाने चुलबंद नदीवरील पुलाचे बांधकाम झाले. त्यानंतर निवडणुका झाल्या. सत्ता परिवर्तन झाले. पूर्वसत्तेतील पुलासंबंधीच्या उर्वरित कामाला पूर्णत्व देण्यासाठी सध्याचे सत्तेमधील सरकार अपयशी ठरत आहे. परिणामी परिसरातील जनता स्वहिताचा लढा लढण्यासाठी रस्त्यावर उतरून रास्ता रोको आंदोलनास प्रवृत्त झाले.
या आंदोलनात राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अविनाश ब्राम्हणकर, जिल्हा परिषद अध्यक्ष भाग्यश्री गिलोरकर, जिल्हा परिषद सदस्य रेखा वासनिक, विहीरगावचे सरपंच हरीभाऊ बनकर, भुगावचे सरपंच दुधराम बारस्कर, तंमुस अध्यक्ष श्रीराम राऊत, तंमुस अध्यक्ष मनोहर ईटवले, अशोक शहारे, आनंदराव बारस्कर, बाळकृष्ण सावरकर, दुर्याेधन बारस्कर, हंसराज बारस्कर, तेजराम कोचे, मनोहर नगरकर, सुभाष सावकर, मुरली बनकर, उपसरपंच माया चौबे, वैशाली सिंदीमेश्राम, वासुदेव सिंदीमेश्राम, प्रभू खंडाळकर, भुगाव व विहीरगाव येथील ग्रामपंचायत सदस्यगण व परिसरातील बहुसंख्य नागरिकांनी नेतृत्व केले.
आंदोलनाला साकोली येथील नायब तहसीलदार खोत, लाखनी येथील नायब तहसीलदार मारवाडे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता राऊत यांनी भेट देवून एक ते दीड महिन्यात पावसाळ्यापूर्वी या पोचमार्गाचे बांधकाम पूर्ण करू, असे आश्वासन दिले. यावेळी शांतता, सुव्यवस्था राखण्यासाठी घटनास्थळी पालांदूरचे सहायक पोलीस निरीक्षक एच.एम. सय्यद व साकोलीचे पोलीस निरीक्षक घुसर यांचे सहकारी उपस्थित होते. (वार्ताहर)