मुंडीपारवासीयांचे ‘रास्ता रोको’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 2, 2017 09:14 PM2017-08-02T21:14:33+5:302017-08-02T21:15:40+5:30
तिरोडा तहसील कार्यालय ते घाटकुरोडा रस्ता पूर्णत: उखडला असून मोठमोठे खड्डे रस्त्यावर पडले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : तिरोडा तहसील कार्यालय ते घाटकुरोडा रस्ता पूर्णत: उखडला असून मोठमोठे खड्डे रस्त्यावर पडले आहे. त्या खड्ड्यांत पावसाचे पाणी साचून संपूर्ण रस्त्यावर चिखल पसरले आहे. त्यामुळे दुचाकी, चारचाकी वाहने चालविणे कठिण झाले असून पायी चालण्यासाठीसुद्धा मोठीच कसरत करावी लागत आहे. सदर रस्त्याचे संपूर्ण नवीन बांधकाम करण्यात यावे, या मागणीला घेवून जिल्हा परिषद सदस्य मनोज डोंगरे यांच्या नेतृत्वात मुंडीपारवासीयांनी रास्ता रोको आंदोलन केले.
तब्बल ११ वर्षांपूर्वी दिलीप बन्सोड हे तिरोडा-गोरेगाव विधानसभा क्षेत्राचे आमदार असताना सदर रस्त्याचे बांधकाम करण्यात आले होते. तेव्हापासून या रस्त्याची साधी डागडुजीसुद्धा करण्यात आली नाही. या मार्गावर बेलाटी बु., मुंडीपार, मांडवी, सालेबर्डी, बिरोली, चांदोरी बु., घाटकुरोडा, घोगरा व एलोरा या नऊ गावांचा समावेश आहे. एलोरा पेपर मिलपर्यंत संपूर्ण रस्ता खराब झालेला आहे. यावर्षी मुंडीपार गावाजवळ या रस्त्यावर मुरूम न घालता शेतातील माती घालण्यात आली. त्यामुळे संपूर्ण रस्ता चिखलमय झाला आहे. रेतीघाटावरून धावणाºया अवजड वाहनांमुळेच सदर रस्त्याची दुरवस्था झाल्याचे नागरिकांनी सांगितले आहे.
बेलाटी, मुंडीपार, मांडवी, सालेबर्डी, बिरोली, चांदोरी व घोगरा या गावातील मुले शिक्षण घेण्यासाठी तिरोडा येथे जातात. मात्र सदर रस्त्याच्या दुरवस्थेमुळे एसटी महामंडळाची स्कूल बस मागील महिनाभरापासून बंद आहे. त्यामुळे या मार्गावरील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक कार्यात अडचणी निर्माण झाल्या आहेत.
सदर रस्त्याची समस्या त्वरित सोडविण्यात यावी. जर तिरोडा-घाटकुरोडा मार्गाचे नवीन बांधकाम मंजूर करून कामाला सुरूवात करण्यात आले नाही तर येत्या आठ दिवसांत बेलाटी, मुंडीपार, मांडवी, घाटकुरोडा, घोगरा, चांदोरी व बिरोली येथील सरपंच, ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थांसह पुन्हा आंदोलन करण्यात येईल, असा इशारा जिल्हा परिषद सदस्य मनोज डोंगरे यांनी दिला आहे.
सदर आंदोलनस्थळी माजी आमदार दिलीप बन्सोड, सहायक पोलीस निरीक्षक पवार, नायब तहसीलदार रमेश कुंभरे आदींनी भेट दिली. सदर आंदोलनात संजय साठवणे, मुनिश्वर चौधरी, वासुदेव हरिणखेडे, रंगलाल रहांगडाले, सुनील गाढवे, चितुलाल पटले, चंपालाल साठवणे, ओमप्रकाश चौधरी, समीर बन्सोड, प्रल्हाद मारबदे, मुन्ना पटले, रॉकी कटरे, विनोद हरिणखेडे व इतर गावकरी सहभागी होते.
घरकूल, शौचालय व विद्युत समस्या
मुंडीपार गावात घरकूल व शौचालयांचा लाभ योग्य लाभार्थ्यांना देण्यात आला नाही. ज्यांच्या घरी सुविधा आहेत त्यांचीच नावे यादीत आहेत व जे रस्त्यावर शौचास बसतात त्यांना योजनेच्या लाभापासून वंचित ठेवण्यात आले, असा आरोप मुंडीपारवासीयांनी केला आहे. गावातील विद्युत समस्यासुद्धा कायम आहे. एकदा पुरवठा खंडित झाला की मग रात्रभर वीज पुरवठा होत नाही. अनेकदा रात्रभर अंधारात राहण्याची पाळी मुंडीपारवासीयांवर आली आहे. शिवाय लोंबणाºया विद्युत तारांची समस्यासुद्धा आवासून उभी आहे. उन्हाळ्यात वीज पुरवठा खंडित होत नव्हता, मात्र आता वारंवार बत्ती गुल होत असून अंधारात राहण्याची पाळी उद्भवत आहे. गावातील पथदिवेसुद्धा बंदच असल्याचे मुंडीपारवासीयांनी सांगितले.
अंतर्गत रस्ते व
नाल्यांची समस्या
मुंडीपार गावातील अंतर्गत रस्तेसुद्धा उखडले आहेत. सांडपाणी किंवा पावसाचे पाणी वाहून नेणाºया नाल्या नाहीत. थोड्याफार प्रमाणात ज्या आहेत त्या नाल्या तुटलेल्या आहेत. त्या केरकचºयाने तुंबल्या आहेत. गावात ज्या ठिकाणी रस्ते तयार करणे गरजेचे आहे, त्या ठिकाणी रस्ते तयार न करता जेथे गरज नाही तेथे रस्ते तयार केले जातात, असेही नागरिकांनी सांगितले आहे.