तिसरी लाट रोखण्यासाठी प्रशासन म्हणतो है तयार हम !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2021 04:27 AM2021-05-15T04:27:27+5:302021-05-15T04:27:27+5:30
गोंदिया : आरोग्य क्षेत्रातील तज्ज्ञांकडून लवकरच कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता वर्तविली जात आहे. तिसऱ्या लाटेत प्रामुख्याने बालकांमध्ये संसर्ग ...
गोंदिया : आरोग्य क्षेत्रातील तज्ज्ञांकडून लवकरच कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता वर्तविली जात आहे. तिसऱ्या लाटेत प्रामुख्याने बालकांमध्ये संसर्ग वाढण्याची शक्यता वर्तविली जात असून रुग्णसंख्येत सुद्धा दुप्पट वाढ होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. त्यामुळे शासनाने आरोग्य आणि जिल्हा प्रशासनाला गाफील न राहता तिसऱ्या लाटेच्या धर्तीवर तयार राहण्याच्या सूचना केल्या आहे. यासाठी जिल्हा प्रशासनाने ऑक्सिजन, बेड, औषध साठा आणि आरोग्य कर्मचाऱ्यांचे मनुष्यबळ यांचे नियोजन करुन ठेवण्यास सुरुवात केली आहे. कोरोनाच्या दुसऱ्या आरोग्य यंत्रणा गाफील राहिल्याने मोठ्या प्रमाणात रुग्णांची गैरसोय झाली. तर ऑक्सिजन आणि बेडची सुद्धा समस्या निर्माण झाली. त्यामुळे अनेक रुग्णांचा ऑक्सिजन आणि बेड न मिळाल्याने त्यांचा मृत्यू झाला. त्यामुळे तिसऱ्या लाटेत या सर्व गैरसोयी निर्माण होऊ नये म्हणून ७०० बेड वाढविण्यास चार ऑक्सिजन प्लांट तसेच पाच ते सहा दिवसांचा ऑक्सिजनचा साठा स्टॉक ठेवण्याचे नियोजन जिल्हा प्रशासन आणि आरोग्य विभागाने केले आहे.
............
प्रशासकीय यंत्रणा आहे तयार
ऑक्सिजन
कोरोनाची तिसरी लाट अधिक तीव्र राहण्याची शक्यता वर्तविली जात आहे. यासाठी केटीएस जिल्हा सामान्य रुग्णालय, क्रीडा संकुल, पाॅलिटेक्निक कॉलेज येथे ऑक्सिजन प्लांट उभारण्यात येणार आहे. यामुळे जवळपास २६ केएल ऑक्सिजनचा अतिरिक्त साठा ठेवण्यास मदत होणार आहे. तसेच जम्बो ऑक्सिजन सिलिंडरचे रिफिलिंग प्लांट तयार करुन ठेवण्यात आले आहे. यामुळे तिसऱ्या लाटेत ऑक्सिजनची समस्या निर्माण होणार नाही.
...........
ऑक्सिजन बेड
येथील केटीएस जिल्हा सामान्य रुग्णालयात २०० खाटांचे ऑक्सिजन बेड तयार असून यात पुन्हा शंभर बेड वाढविण्यात येणार आहे. तसेच शहरातील सर्व खासगी रुग्णालयांना ५० ऑक्सिजन बेडची व्यवस्था करण्याचे निर्देश देण्यात आले. अतिरिक्त जम्बो ऑक्सिजन सिलिंडर आणि ऑक्सिजन प्लांट उभारण्याच्या सूचना केल्या आहेत. यामुळे जवळपास ५०० ऑक्सिजन बेडची व्यवस्था होणार आहे. तर जिल्हा क्रीडा संकुलात सुद्धा २५० खाटांचे ऑक्सिजन युक्त बेड तयार ठेवण्यात आले आहे.
............
कोविड केअर सेंटर
सध्या स्थितीत जिल्ह्यात १७ कोविड केअर सेंटर असून आता प्रत्येक तालुका स्तरावरील कोविड केअर सेंटरची संख्या वाढविण्यात येणार आहे. तसेच काही कोविड केअर सेंटरमधील खाटांची संख्या वाढविण्यात येणार आहे. तर ग्रामीण रुग्णालयात सुद्धा ऑक्सिजन प्लांट उभारण्यास मंजुरी देण्यात आली आहे. या अंतर्गत तिरोडा उपजिल्हा रुग्णालय, सडक अर्जुनी आणि अर्जुनी मोरगाव येथे सुद्धा ऑक्सिजन प्लांट उभारण्यात येणार असून तेथील कोविड केअर सेंटरमधील खाटांची संख्या वाढविण्यात येणार आहे.
........
औषधांचा साठा
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत कोविड वरील औषधांचा आणि रेमडेसिविर इंजेक्शनचा तुटवडा निर्माण झाला होता. त्यामुळे रुग्णांचे प्रचंड हाल झाले होते. पुन्हा हीच परिस्थिती निर्माण हाेऊ नये यासाठी रेमडेसिविर इंजेक्शन सह इतर औषधांचा साठा वाढविण्याच्या सूचना करण्यात आल्या आहे. शासकीय रुग्णालय, ग्रामीण रुग्णालयात सुद्धा अतिरिक्त औषध साठा उपलब्ध करुन दिला जाणार आहे.
..........
कोठे किती बेड वाढविण्याची तयारी
गोंदिया : ३००
तिरोडा : १००
अर्जुनी मोरगाव : १००
सडक अर्जुनी : १००
आमगाव : १०००
...........................
कोट
कोरोनाची संभाव्य तिसरी लाट लक्षात घेऊन जिल्हा व आरोग्य विभागाने समन्वय साधून याचे योग्य नियाेजन केले आहे. तिसऱ्या लाटेत बालकांमध्ये कोरोनाचा संसर्ग वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे यासाठी बालरोग तज्ज्ञांचा टास्क फोर्स तयार करण्यात आला आहे. कोविड केअर सेंटर, बेड, ऑक्सिजन आणि औषध साठ्याचे सुद्धा नियोजन करण्यात आले आहे.
दीपक कुमार मीना, जिल्हाधिकारी.
..........