सारस गणना सुरू, २२ सारसांची झाली नोंद

By ऑनलाइन लोकमत | Published: June 24, 2024 07:09 PM2024-06-24T19:09:26+5:302024-06-24T19:09:38+5:30

काही ठिकाणी गणना होणे शिल्लक : गेल्यावर्षी २९ सारसांची झाली नोंद

Stork counting started, 22 storks were recorded | सारस गणना सुरू, २२ सारसांची झाली नोंद

सारस गणना सुरू, २२ सारसांची झाली नोंद

गोंदिया : जिल्ह्यात २३ जूनपासून वनविभाग व जिल्ह्यातील विविध अशासकीय संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने सारस प्रगणना सुरू करण्यात आली आहे. सारस पक्ष्यांचे अधिवास असलेल्या गोंदिया, तिरोडा व आमगाव तालुक्यांतर्गत एकूण ७० वेगवेगळ्या ठिकाणी जिल्ह्यातील अशासकीय स्वयंसेवी संस्थेचे स्वयंसेवक, सारस मित्र, शेतकरी व गोंदिया वनविभागाचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी ही गणना सकाळी ५ ते ९ या कालावधीत केली. सारस पक्षी प्रगणनेमध्ये एकूण २२ सारस पक्ष्यांची नोंद झालेली आहे. पण गेल्यावर्षीच्या तुलनेत पहिल्याच टप्प्यात कमी सारस आढळल्याने चिंता व्यक्त केली जात आहे.

सारसांचा अधिवास असलेल्या काही स्थळांवर अपेक्षित असणारे सारस पक्ष्यांची जोडपी निदर्शनास न आल्याने सदर ठराविक स्थळांवर पुन्हा चमू ३ ते ४ दिवस भेट देऊन गणना करणार आहे. सदर गणना पूर्ण झाल्यानंतरच नेमकी सारस पक्ष्यांची संख्या कळेल. सारस पक्ष्यांची प्रगणना करण्यासाठी एकूण ३९ चमू तयार करण्यात आले होते. प्रत्येक चमूमध्ये स्वयंसेवी संस्थेचे स्वयंसेवक, सारस मित्र, स्थानिक प्रतिनिधी, शेतकरी, वनविभागातील वनपाल, वनरक्षक असे एकूण ५ ते ६ व्यक्तींचा सहभाग होता. सारस पक्षी प्रगणनेकरिता जिल्ह्यातील सेवा संस्था व इतर अशासकीय संस्थेचे स्वयंसेवक, सारस मित्र, शेतकरी व वनविभागातील कर्मचाऱ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवून सारस पक्ष्यांचे अधिवास असलेले पाणथळ जागा, नद्या, शेतांमध्ये, तलावांजवळ जाऊन पाहणी करून सारस पक्ष्यांची प्रगणना केली.

जिल्ह्यात आढळतात सर्वाधिक सारस

संपूर्ण महाराष्ट्रात प्रेमाचे प्रतीक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सारस पक्ष्यांची सर्वाधिक संख्या गोंदिया जिल्ह्यात आहे. त्यामुळे सारसांचा जिल्हा अशी ओळखसुद्धा जिल्ह्याला प्राप्त होऊ लागली आहे. मात्र सारस संवर्धनाकडे शासन आणि प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याने त्यांच्या संख्येत घट होत असल्याने यावर मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठानेसुध्दा नाराजी व्यक्त केली होती. गेल्यावर्षी सारस गणनेत जिल्ह्यात २९ सारसांची नोंद झाली होती. तर पहिल्या टप्प्यात झालेल्या गणनेत २२ सारसांची नोंद झाली आहे. सारस पक्ष्यांच्या संख्येत नेमकी घट झाली की वाढ हे गणना पूर्ण झाल्यानंतरच कळेल, असे सेवा संस्थेचे अध्यक्ष सावन बहेकार यांनी लोकमतशी बोलताना सांगितले

Web Title: Stork counting started, 22 storks were recorded

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.