प्रश्नमंजूषेच्या माध्यमातून ग्रामीण विद्यार्थी शिक्षणाच्या प्रवाहात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2021 04:33 AM2021-08-21T04:33:19+5:302021-08-21T04:33:19+5:30
गोंदिया : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत लागलेल्या लॉकडाऊनमुळे इयत्ता ५ वीपासून सुरू झालेल्या शाळा पुन्हा बंद पडल्या व सर्वांसोबतच शाळेत ...
गोंदिया : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत लागलेल्या लॉकडाऊनमुळे इयत्ता ५ वीपासून सुरू झालेल्या शाळा पुन्हा बंद पडल्या व सर्वांसोबतच शाळेत शिकणारे विद्यार्थी सुद्धा घरातच बंदिस्त झाले. विद्यार्थ्यांवर या घरबंदीचे अनिष्ट परिणाम होत असल्याचे अनेक अभ्यासातून पुढे आले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना दिवसातील काही वेळ तरी व्यस्त ठेवावे, मोबाइल तंत्रज्ञानाचा सदुपयोग व्हावा व त्यासोबतच त्यांना ज्ञान मिळावे, स्पर्धा परीक्षेची आवड लागावी, तसेच शिक्षक-पालकांचे सामान्यज्ञान अद्ययावत व्हावे, या हेतूने जिल्ह्यातील देवरी तालुक्यातील ग्राम टेकरी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील उपक्रमशील शिक्षक महेंद्र रहांगडाले यांनी १७ एप्रिलपासून ऑनलाइन प्रश्नमंजूषा सुरू केली.
यासाठी त्यांनी विशेष ब्लाॅगची निर्मिती केली असून प्रथम २५ भाग हे जिल्ह्यातील प्रश्नांवर होते. यातून जिल्ह्यातील ज्या माहितीपासून विद्यार्थ्यांसह अनेक जण अनभिज्ञ होते. शासनाच्या विविध वेबसाइट व कागदपत्रांचा अभ्यास करून विद्यार्थ्यांकरिता या माध्यमातून उपलब्ध करण्यात आली. या ऑनलाइन प्रश्नमंजूषेला विद्यार्थी व शिक्षकांपर्यंत पोहोचविण्याचे कार्य ग्राम ढोडरा येथील जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक व शिक्षक सहकारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष सुरेंद्र गौतम उपक्रमाच्या सुरुवातीपासूनच करीत आहेत. जिल्ह्याविषयी २५० प्रश्नांची मालिका संपल्यानंतर ‘महाराष्ट्राचा भूगोल’ या घटकावर ५० प्रश्नमंजूषा व सध्या शालेय अभ्यासक्रमावर आधारित प्रश्नमंजूषा या उपक्रमांतर्गत सुरू आहे.
---------------------------
प्रश्नमंजूषेचे १२४ भाग झाले पूर्ण
गोंदिया जिल्हा प्रश्नमंजूषा या मालिकेला विद्यार्थी, पालक, शिक्षक व स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या १०,००० पेक्षा जास्त विद्यार्थ्यांचा प्रतिसाद मिळाला व स्वतःचे ज्ञानवर्धन केले. प्रत्येक प्रश्नमंजूषा दररोज २००-३०० विद्यार्थी, पालक व शिक्षक सोडवत आहेत. या ऑनलाइन प्रश्नमंजूषेत उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना ऑटोमेटेड प्रमाणपत्र दिले जाते. तसेच दैनिक संदेशातून कोरोना व लसीकरणाविषयी जनजागृतीही केली जाते. या प्रश्नमंजूषेचे सर्व भाग ब्लॉगवर सोडवण्यासाठी नेहमीकरिता उपलब्ध आहेत. जिल्ह्यातील हा असा ऑनलाइन स्वरूपाचा व विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेची गोडी लावणारा पहिलाच उपक्रम आहे. या उपक्रमासाठी प्रश्न संकलन व संपादनाच्या कार्याला संतोष पारधी व तुषार सिंगनजुडे हे सहकार्य करीत आहेत.