चिरेखनी येथील पाणीपुरवठा योजना सुरळीत करा ()
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 5, 2021 04:26 AM2021-04-05T04:26:06+5:302021-04-05T04:26:06+5:30
तिरोडा : तालुक्यातील चिरेखनी येथील प्रादेशिक पाणीपुरवठा योजना मागील १५ वर्षांपासून बंद आहे. ही योजना त्वरित सुरू करण्यात यावी. ...
तिरोडा : तालुक्यातील चिरेखनी येथील प्रादेशिक पाणीपुरवठा योजना मागील १५ वर्षांपासून बंद आहे. ही योजना त्वरित सुरू करण्यात यावी. तिरोडा-खैरलांजी मार्गावरील चिरेखनीचे प्रवेशद्वार ते तिरोडा तहसील कार्यालयापर्यंतचा रस्ता पूर्णपणे उखडला आहे. त्यामुळे या रस्त्याचे त्वरित बांधकाम करण्यात यावे अशी मागणी गावकऱ्यांनी खा. सुनील मेंढे यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.
यावेळी दिलेल्या निवेदनातून ग्रामपंचायत चिरेखनी येथील प्रादेशिक पाणीपुरवठा योजना तब्बल १५ वर्षांपासून बंद आहे. काचेवानी, खैरबोडी, पालडोंगरी, जमुनिया, चिरेखनी या चार गावांसाठी ही योजना तयार करण्यात आली. या गावांसाठी पिण्याचा पाण्याचा स्रोत म्हणून ही एकमेव योजना आहे. पण, ही योजना बंद असल्याने गावकऱ्यांना पाण्यासाठी दूरवर भटकंती करावी लागत आहे. तसेच तिरोडा-खैरलांजी मार्गाची सुद्धा अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे. या मार्गावर सर्वाधिक वर्दळ असून, रस्ता खराब असल्याने अपघातांच्या संख्येतसुद्धा वाढ झाली आहे. रस्त्याची दुरुस्ती करण्यात यावी यासाठी गावकऱ्यांनी अनेकदा पंचायत समिती व जिल्हा परिषद सदस्यांच्या निदर्शनास ही बाब आणून दिली. पण, त्यांनी अद्यापही याची दखल घेतली नाही. त्यामुळे संतापलेल्या गावकऱ्यांनी या रस्त्याचा व्हिडिओ तयार करून सोशल माध्यमांवर टाकला. चिरेखनी येथील गावकऱ्यांनी रस्ता रोको आंदोलन करून प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला होता. तरी अद्याप रस्त्याची दुरुस्ती करण्यात आली नाही. त्यामुळे या दोन्ही समस्या मार्गी लावण्याची मागणी गावकऱ्यांनी निवेदनातून केली आहे. शिष्टमंडळात ग्रामपंचायत सदस्य घनश्याम पारधी, नितेश कटरे, संजू पारधी यांचा समावेश होता.
.........
दूषित पाण्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात
चिरेखनी येथील विहिरी, बोअरवेल, आदी संपूर्ण जलस्रोतामधून खारट पाणी येत असून, ते पाणी पिण्यायोग्य नाही. पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांना गावाबाहेर १ ते २ कि.मी. पायी जावे लागते. गावामध्ये पाणी टाकी असूनही पिण्याच्या शुद्ध पाण्यापासून वंचित राहावे लागत असल्यामुळे गावकऱ्यांमध्ये रोष आहे, तर दूषित पाण्यामुळे गावकऱ्यांचे आराेग्य धोक्यात आले आहे.
....