शहरातील रस्त्यांना मलम्याचा मुलामा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2019 09:33 PM2019-08-19T21:33:46+5:302019-08-19T21:34:26+5:30

अवघ्या शहरातीलच रस्त्यांची दुर्गत झाली असून त्यावर मोठाले खड्डे पडले आहेत. यामुळे शहरवासी चांगलेच त्रस्त आहेत. विशेष म्हणजे, त्यांचा त्रास कमी व्हावा यासाठी या खड्डयांत मलमा टाकला जात आहे. हा प्रयोग मात्र शहरवासीयांच्या त्रासात भर घालणारा ठरत आहे.

The streets of the city are covered with rubble | शहरातील रस्त्यांना मलम्याचा मुलामा

शहरातील रस्त्यांना मलम्याचा मुलामा

Next
ठळक मुद्देखड्डे भरण्यासाठी प्रयोग : शहरवासीयांच्या त्रासात भर

लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : अवघ्या शहरातीलच रस्त्यांची दुर्गत झाली असून त्यावर मोठाले खड्डे पडले आहेत. यामुळे शहरवासी चांगलेच त्रस्त आहेत. विशेष म्हणजे, त्यांचा त्रास कमी व्हावा यासाठी या खड्डयांत मलमा टाकला जात आहे. हा प्रयोग मात्र शहरवासीयांच्या त्रासात भर घालणारा ठरत आहे. मलम्यामुळे रस्त्यांची स्थिती अधिकच खराब झाली असून त्यावरून वाहतूक करणे अधिकच धोकादायक ठरत आहे.
शहरातील रस्त्यांना ग्रहण लागले असून अवघ्या शहरातीलच रस्त्यांची स्थिती गंभीर आहे. एखाद्या गावातील रस्त्यांपेक्षाही दयनीय अवस्था शहरातील रस्त्यांची झाली आहे. अवघे रस्तेच उखडल्याचे दिसत असताना कित्येक रस्त्यांवर मोठाले खड्डे पडले आहेत. रस्त्यांच्या दुर्गतीमुळे पावसाळ््यात तर शहरवासीयांना आपला जीव मुठीत घेऊनच घराबाहेर निघावे लागते अशी स्थिती निर्माण झाली आहे. मात्र उपाय नसल्यामुळे शहरवासीयांना आहे त्या स्थितीशी जुळवून घ्यावे लागत आहे.
रस्त्यांवरील या खड्ड्यांना भरण्यासाठी रस्त्यांची दुरूस्ती करण्याचे सोडून सध्या त्यावर मलम्याचा मुलामा चढविला जात आहे. गिट्टीचा कच्चा मसाला तयार करून उखडलेल्या रस्त्यांवर टाकणे किंवा एखाद्या बांधकामातील मलमा खड्यांत टाकून त्यांना भरण्याचे काम नगर परिषद करून आपले सौजन्य दाखविते. शहरवासीयांचा त्रास कमी होणार हा यामागचा हेतू दिसून येतो. मात्र या प्रयोगामुळे शहरवासीयांचा त्रास जास्तच वाढला आहे. या मलम्यातील विटांचे तुकडे किंवा कॉंक्रीटमुळे जास्तच झटके खात ये-जा करावी लागत असल्याची स्थिती निर्माण झाली आहे.
विशेष म्हणजे, काही ठिकाणी तर मसाल्यामुळे चिखल झाला असून तेथून वाहन काढणेही जिकरीचे झाले आहे. रस्त्यांमुळे झटके खात शहरवासीयांचे आता कंबरडे मोडण्याची पाळी आली आहे. मात्र येथील नेतेमंडळी शहर बदलत चालल्याचे बोलत आहेत. एखाद्या खेड्याच्या तुलनेत गोंदिया शहरातील रस्त्यांची दयनीय अवस्था झाली आहे. मात्र यावर तोडगा काढणे सोडून मलमा टाकून हात वर करण्याचे प्रकार दरवर्षी केले जात आहेत.
तेवढ्या पैशांत एखादा रस्ता तयार करा
शहरातील रस्त्यांवरील खड्डे भरण्याच्या कामावर नगर परिषद व सार्वजनिक बांधकाम विभाग लहान-सहान कामे काढून पैसा ओततो. काही दिवसांनी समस्या तशीच होते. यात पैसा मात्र वाया जातो. त्यामुळे खड्डे भरण्याच्या कामावर पैसा खर्च करण्यापेक्षा तेवढ्याच पैशांत एखादा रस्ताच तयार करून टाका अशा प्रतिक्रीया आता शहरवासी देत आहेत.
मामा चौकात झटकेच झटके
शहरातील मामा चौक ते विवेकानंद कॉलनीच्या रस्त्यावरून वाहन चालविणे आज अत्यंत कठीण काम झाले आहे. मोठाल्या खड्यांमुळे येथे लोक पडत आहेत तसेच झटक्यांनी त्रस्त झाले आहेत. अशात नगर परिषदेने खड्डे भरण्यासाठी मलमा टाकला आहे. काही दिवस या मलम्याचे मोठे ढिगारच रस्त्यावर पडून होते. आता मलमा खड्यात टाकण्यात आला असून त्यामुळेच आणखीच डोकेदुखी वाढली आहे.

Web Title: The streets of the city are covered with rubble

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.