जनसामान्यांपर्यंत पक्षाचे कार्य पोहोचवून पक्षसंघटन बळकट करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2021 04:20 AM2021-06-24T04:20:33+5:302021-06-24T04:20:33+5:30
देवरी : कार्यकर्ता हा पक्षाचा कणा असून पक्षसंघटन मजबूत करण्यासाठी कार्यकर्ता सक्षम असणे आवश्यक आहे. पक्षाचा विस्तार करण्यासाठी गावागावांत ...
देवरी : कार्यकर्ता हा पक्षाचा कणा असून पक्षसंघटन मजबूत करण्यासाठी कार्यकर्ता सक्षम असणे आवश्यक आहे. पक्षाचा विस्तार करण्यासाठी गावागावांत बूथ कमिटी स्थापन करा. राष्ट्रवादी काँग्रेस हा सर्वसामान्य व गोरगरीब जनतेचा पक्ष आहे. यामुळे लोकांच्या मनावर बिंबविण्यासाठी पक्षाचे कार्य त्यांच्यापर्यंत पोहोचवून पक्षसंघटन मजबूत करा, असे प्रतिपादन माजी आमदार राजेंद्र जैन यांनी केले.
येथील सरस्वती शिशू मंदिर सभागृहात आयोजित पक्ष पदाधिकारी व कार्यकर्ता बैठकीत ते बोलत होते. बैठकीला जिल्हाध्यक्ष विजय शिवणकर उपस्थित होते. माजी आमदार राजेंद्र जैन यांनी, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सदैव शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे. शेतकऱ्यांच्या मालाला योग्य भाव मिळण्यासाठी खासदार प्रफुल्ल पटेल यांनी नेहमी शेतकऱ्यांच्या न्याय देण्याचे काम केले आहे. केंद्र सरकारने धानाला ७२ रुपये हमीभाव देऊन शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसण्याचे काम केले आहे. शेतकऱ्यांची पिळवणूक करीत पेट्रोल व डिझेलच्या किमतीत भरमसाट वाढ केल्याने शेतकऱ्यांचा मशागतीचा व बी-बियाण्यांचा खर्च दुपटीने वाढला आहे. शेतकरी, कष्टकरीविरोधी केंद्र सरकारला धडा शिकविण्याची वेळ आली आहे. केंद्र सरकारच्या जुलमी धोरणांना सामान्य जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य कार्यकर्त्यांनी करावे असे त्यांनी सांगितले. शिवणकर यांच्यासह अन्य वरिष्ठ मान्यवरांनी संघटन मजबुतीचे कार्य करण्यासोबतच बूथपातळीवर पक्ष संघटनाबाबत चर्चा व मार्गदर्शन केले. याप्रसंगी आमदार मनोहर चंद्रिकापुरे, नरेश महेश्वरी, रमेश ताराम, सी. के. बिसेन, गोपाळ तिवारी, शर्मिला टेंभुर्णीकर, पारबता चांदेवार, सुमन बिसेन, भैयालाल चांदेवार, मनोहर राऊत, भास्कर धरमशहरे, बबलू भाटिया, उषा तिवारी, खेलन नागपुरे, अमरदास सोनभुईर, सुजित अग्रवाल, डॉ. जे. के. गयेन, गुरमितसिंग भाटिया उपस्थित होते.