सुदृढ आरोग्यासाठी मन बळकट हवे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2018 10:12 PM2018-01-25T22:12:45+5:302018-01-25T22:13:00+5:30
अभ्यासक्रम व शालेय जीवनातील विविध समस्या यामुळे आज तरुण पिढीमध्ये नैराश्य येवून आत्महत्येचे प्रमाण वाढत चालले आहे. सुदृढ आरोग्यासाठी मनाने बळकट व्हायला पाहिजे, असे समुपदेशन केटीएस जिल्हा सामान्य रूग्णालयाचे मानसोपचार तज्ज्ञ डॉ. अमित वालदे यांनी केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
अर्जुनी-मोरगाव : अभ्यासक्रम व शालेय जीवनातील विविध समस्या यामुळे आज तरुण पिढीमध्ये नैराश्य येवून आत्महत्येचे प्रमाण वाढत चालले आहे. सुदृढ आरोग्यासाठी मनाने बळकट व्हायला पाहिजे, असे समुपदेशन केटीएस जिल्हा सामान्य रूग्णालयाचे मानसोपचार तज्ज्ञ डॉ. अमित वालदे यांनी केले.
जिल्हा मानसिक आरोग्य कार्यक्रमांतर्गत गोंदिया येथील के. टी. एस. रुग्णालयाच्यावतीने शालेय मानसिक आरोग्य कार्यक्रम सरस्वती विद्यालयात इयत्ता ८ ते १० वीच्या विद्यार्थ्यांसाठी घेण्यात आला. यात विद्यार्थ्यांना मानसिक आरोग्य, समस्या व उपाय यावर समुपदेशन करताना ते बोलत होते.
अध्यक्षस्थानी पर्यवेक्षिका वीणा नानोटी होत्या. या वेळी प्रामुख्याने के. टी. एस. रुग्णालयातील मानसिक आरोग्यतज्ज्ञ डॉ. मीना रेवतकर उपस्थित होत्या.
डॉ. वालदे पुढे म्हणाले, मित्रांचा सहवास, वाईट सवयी, मित्रांचे दडपण, रॅगिंग इत्यादीमुळे ताणतणाव वाढते. कुमारवयात लैगिंक गोष्टींचे आकर्षण वाढत जाते. त्यामुळे भावभावना वाढतात. अशावेळी आपली वागणूक चांगली ठेवा. याच वयात लैगिंक भावनांमुळे आपले पाऊल चुकीच्या दिशेकडे वळते. परिणामी फार गंभीर समस्या निर्माण होतात. मोबाईलचा चांगल्या कामासाठी उपयोग करा. आज मोठ्या प्रमाणात सायबर क्राईम घडत आहे. विद्यार्थी जीवनात मोठ्या प्रमाणात व्यसनाधिनता वाढली आहे. मोबाईल, धुम्रपान, मद्यप्राशन, टी.वी., व्हॉट्सअॅप, फेसबुकच्या अतिवापरामुळे ताणतणाव वाढला आहे. यावर नियंत्रण ठेवावे, असे त्यांनी सांगितले.
तर डॉ. रेवतकर यांनी, आज मुलांना आई-वडिलांची घातलेली बंधने जाचक वाटतात. या वयात विद्यार्थ्यांच्या मनाचा पुरेसा विकास झालेला नसतो. आपल्यावर परकीय संस्कृतीचा परिणाम झाला आहे. व्यक्तिगत व्यक्तिमत्व काय, हे ओळखता यायला हवे, असे मार्गदर्शन त्यांनी केले. कार्यक्रमाला ५५० विद्यार्थ्यांची उपस्थिती होती. संचालन छाया घाटे यांनी केले. कार्यक्रमासाठी माधुरी पिलारे, शिवचरण रार्घोते, संजयकुमार बंगळे, के.के. लोथे, प्रा. तारका रुखमोडे, सुरेश बर्गे आदिंनी सहकार्य केले.