पोलिसांना तणावमुक्तीचा कानमंत्र
By admin | Published: May 15, 2017 12:17 AM2017-05-15T00:17:52+5:302017-05-15T00:17:52+5:30
जिल्हा पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी ताणतणाव व्यवस्थापन विषयावरील कार्यशाळा उपमुख्यालय देवरी,
ताणतणाव व्यवस्थापन कार्यशाळा : पोलीस कर्मचाऱ्यांची मोठ्या संख्येत हजेरी
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : जिल्हा पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी ताणतणाव व्यवस्थापन विषयावरील कार्यशाळा उपमुख्यालय देवरी, पोलीस अधीक्षक कार्यालयातील मंथन सभागृह तसेच पोलीस मुख्यालयाच्या प्रेरणा सभागृहात घेण्यात आली. कार्यशाळेत यशदा पुणेचे मानद व्याख्याते अशोक देशमुख यांनी पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांना तणावातून मुक्त कसे राहता येईल, याचा कानमंत्र दिला.
कार्यशाळेचे उद्घाटन जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. दिलीप पाटील भुजबळ यांच्या हस्ते करण्यात आले. मार्गदर्शक म्हणून यशदा पुणेचे मानद व्याख्याते अशोक देशमुख उपस्थित होते. पोलीस अधिकारी, कर्मचारी कर्तव्य बजावित असताना शिस्त, गस्त व बंदोबस्त यात नेहमीच मग्न राहतात. यावेळी येणारा ताण, वेळी व अवेळी खाणे, अपूरी झोप त्यामुळे त्यांना मधूमेह, उच्च रक्तदाब अशा प्रकारचे आजार जडतात. मानसिक आजारपण आणि मानसिक ताणतणाव यामुळे आयुष्यातील आनंद हिरावून जातो. असे सांगत देशमुख यांनी आरोग्य निरोगी रहावे याकरिता दररोज सकाळी उठून ४० मिनिटे पायी चालावे, नियमित व्यायाम, वेळेवर जेवण व झोप घ्यावी, बालपण, संस्कार, विचार, भावना, कृती यात तारतम्य असावे, योग्य वेळी, योग्य ठिकाणी बोलल्यास अडचण येत नाही. दिवसभर काम केल्याचे समाधान मिळाले पाहिजे. त्यामुळे सुखाची झोप लागून मानसिक आरोग्य चांगले राहील, असे सांगितले. कार्यशाळेत उपमुख्यालय देवरी येथे १७५ पोलीस अधिकारी व कर्मचारी, पोलीस अधीक्षक कार्यालय येथील मंथन सभागृहात ९० ते १०० पोलीस अधिकारी, कर्मचारी व मंत्रालयीन कर्मचारी तसेच प्रेरणा सभागृह पोलीस मुख्यालय कारंजा येथे २८० ते ३०० पोलीस अधिकारी सहभागी झाले होते. कार्यशाळेच्यासाठी पोलीस उपअधीक्षक (गृह) मनोहर दाभाडे, सुनील बांडेकर, किशोर चौरे यांच्यासह कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.