वीज बिलाची थकबाकी, नगर परिषद शाळांची केली ‘बत्ती गूल’
By कपिल केकत | Published: September 11, 2023 04:46 PM2023-09-11T16:46:58+5:302023-09-11T16:48:37+5:30
दोन शाळा अंधारात
गोंदिया : महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीकडून वीज बिल न भरणाऱ्यांवर कठोर कारवाई करीत त्यांची वीज जोडणी कापली जात आहे. याचाच फटका येथील नगर परिषद संचालित दोन शाळांना सोमवारी (दि.११) बसला. दोन शाळांची वीज जोडणी महावितरणने कापल्याने मात्र नगर परिषदेत चांगलीच तारांबळ उडाली होती.
महावितरणकडून वीज बिलाचा भरणा करणाऱ्यांना आता दणका देत त्यांची वीज जोडणी कापण्याची मोहीम राबविली जात आहे. यांतर्गत महावितरणचे पथक आता मैदानात उतरले असून कुणाचीही गय न करता थेट वीज जोडणी कापली जात आहे. महावितरणच्या या मोहिमेपासून नगर परिषद शाळाही सुटू शकल्या नाहीत. महावितरणकडून राबविण्यात येत असलेल्या मोहिमेंतर्गत पथक सोमवारी (दि.११) शाळेत धडकले व त्यांनी नगर परिषद संचालित गणेश नगर शाळा व छोटा गोंदिया परिसरातील छोटा गोंदिया हिंदी व मराठी शाळांची वीज जोडणी कापून टाकली.
परिणामी या शाळांमध्ये अंधार होता. घडलेल्या प्रकारानंतर या शाळांच्या मुख्याध्यापकांनी नगर परिषद कार्यालय गाठून घडलेला प्रकार संबंधितांना सांगितला. यातील गणेशनगर शाळेचे ७०६० रुपयांचे बिल थकलेले असून छोटा गोंदिया शाळेचे १२६४० रुपयांचे वीज बिल थकले आहे. मात्र महावितरणच्या पथकाने यानंतरही वीज जोडणी कापून टाकली.