शेतकऱ्यांचे ठिय्या आंदोलन : कनिष्ठ अभियंता बिसेन व अन्य अधिकाऱ्यांच्या बदलीची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 17, 2018 12:55 AM2018-10-17T00:55:54+5:302018-10-17T00:57:14+5:30
मागील महिनाभरापासून पावसाने पाठ फिरविल्याने धानपिक संकटात आली आहे. पिक वाचविण्यासाठी शेतकऱ्यांची केविलवाणी धडपड सुरू आहे. मात्र यानंतरही पाटबंधारे विभाग जलाशयाचे पाणी सोडत नसल्याने शेतकऱ्यांमध्ये रोष व्याप्त आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
तिरोडा : मागील महिनाभरापासून पावसाने पाठ फिरविल्याने धानपिक संकटात आली आहे. पिक वाचविण्यासाठी शेतकऱ्यांची केविलवाणी धडपड सुरू आहे. मात्र यानंतरही पाटबंधारे विभाग जलाशयाचे पाणी सोडत नसल्याने शेतकऱ्यांमध्ये रोष व्याप्त आहे. तालुक्यातील संग्रामपूर जलाशयाचे पाणी पिकांसाठी सोडण्यात यावे. या मागणीला घेवून जिल्हा परिषद आरोग्य व शिक्षण सभापती यांच्या नेतृत्त्वात येथील पाटबंधारे कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केले.
संग्रामपूर जलाशयाचे पाणी यापूर्वी सोडण्यात आले होते. मात्र मध्येच पाणी बंद केल्याने सर्वच शेतकऱ्यांना पाणी मिळाले नाही. त्यामुळे धानपिक संकटात आले आहे. याची माहिती पाटबंधारे विभागाला देण्यात आली. विशेष म्हणजे, यावर्षी संग्रामपूर जलाशय शंभर टक्के भरले होते. त्यामुळे खरीपासह रब्बीला देखील पाणी मिळेल अशी आशा शेतकऱ्यांत निर्माण झाली होती. मात्र पाटबंधारे विभागाच्या दुर्लक्षीत धोरणामुळे कालव्यातील पाणी वाहून गेले.
त्यामुळे खरीपासह रब्बीचा हंगाम सुद्धा संकटात आला आल्याचे चिन्ह निर्माण झाले आहे. पिकांना पाण्याची गरज असून पावसाअभावी धानपिक वाळत असल्याने शेतकऱ्यांवर दुष्काळाचे संकट अधिक गडद होत आहे. त्यामुळे पिकांची स्थिती लक्षात घेता जलाशयाचे पाणी सोडण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली. मात्र विभागाकडून पाणी सोडण्यात आले नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी पाटबंधारे विभागाच्या कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करून कनिष्ठ अभियंता बिसेन व संबंधित अधिकाऱ्यांची बदली करण्याची मागणी केली.