आदिवासींचे वास्तव जगापुढे आणण्याची धडपड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 1, 2018 10:20 PM2018-04-01T22:20:52+5:302018-04-01T22:20:52+5:30
एकीकडे सरकार डिजीटल इंडियाचा नारा लावत अत्याधुनिक सोयी सुविधा देशातील नागरिकांना देण्याचा गवगवा करीत आहे. असे असताना मात्र भारत देशात राहणारे मूळ निवासी ज्यांना आदिवासी म्हणून ओळखले जाते तो आदिवासी समाज विकासाच्या पडद्याआड जीवन जगत असून अन्न, वस्त्र व निवारा या मुलभूत गरजांसाठीच दिवसरात्र संघर्षरत असल्याचे दिसत आहे.
विजय मानकर।
लोकमत न्यूज नेटवर्क
सालेकसा : एकीकडे सरकार डिजीटल इंडियाचा नारा लावत अत्याधुनिक सोयी सुविधा देशातील नागरिकांना देण्याचा गवगवा करीत आहे. असे असताना मात्र भारत देशात राहणारे मूळ निवासी ज्यांना आदिवासी म्हणून ओळखले जाते तो आदिवासी समाज विकासाच्या पडद्याआड जीवन जगत असून अन्न, वस्त्र व निवारा या मुलभूत गरजांसाठीच दिवसरात्र संघर्षरत असल्याचे दिसत आहे. या आदिवासींचे वास्तव जगासमोर आणून भारतातील आदिवासी समाज आज २१ व्या शतकात सुध्दा कोणत्या दशेत आहे, हे जगापुढे आणण्याचा वसा शताली शेडमाके या युवतीने घेतला आहे.
आदिवासी लोकांच्या मधात जाऊन त्यांचे वास्तविक दैनंदिन जीवन, खानपान, वेशभूषा, आरोग्य व राहणीमान इत्यादी जाणून घेण्यासाठी शतालीने दुर्गम ते अतिदुर्गम भागात जाण्याचा धाडस केला.
मागील तीन वर्षात तिने मध्यभारतातील पाच-सहा राज्यांचा खडतर प्रवास केला. यात दंडकारण्य प्रदेशासाठी संबंधीत महाराष्ट्र, मध्यप्रदेश, छत्तीसगड, ओरीसा, तेलगंणा, आंधप्रदेश या राज्यातील आदिवासी बहुल दुर्गम क्षेत्राचा खडतर व कठीण प्रवास केला या दरम्यान तिने अनेक दिवस व रात्र आदिवासी लोक वस्तीत घालविले.
या दरम्यान तिने आपल्या सुख, सोयी व वैभवाला बाजूला ठेवून त्यांच्या सोबत कंद, मूळ, फळ, पानाफुलांचा आहार व गवताच्या झोपडीत निवास केला. दगड व लाकडावर तासनतास बसून राहणे, तहान व भूक सहन करणे, इत्यादी अनेक प्रकारचे कष्ट सहन करीत आदिवासींच्या जीवनशैलीची प्रत्येक बाजू जाणून घेत.
यासोबतच आवश्यक सोयी सुविधांपासून आदिवासी समाज किती दूर राहून जगत आहे. आरोग्य, पिण्याचे शुध्द पाणी, निवासासाठी पक्के घर शिक्षण या सोयींसोबतच वीज व रस्ते या सुविधा त्यांना केव्हा मिळणार असे प्रश्न या चित्र प्रदर्शनीतून निर्माण होताना दिसतात. आपल्या तन, मन व धनाचा वापर करीत शताली छायाचित्रांची प्रदर्शनी लावण्यासाठी सतत धडपड करीत असते.
या मागे कसलेही अर्थार्जन करण्याचा भाव नसून आदिवासी मागासलेल्या समाजाला आधुनिक प्रवाहात आणण्यासाठी आपण किती योगदान देऊ शकतो यासाठी शताली सतत संघर्षरत आहे.
शताली धनेगाव येथे वास्तव्यास असली तरी आपला जास्तीतजास्त वेळ ती आदिवासींच्या प्रगतीच्या दिशेने घालविते.
सोश मीडियाचाही वापर
आदिवासींसोबत राहून शतालीने त्यांचे दैनंदिन जीवन कॅमेरात टिपले असून या छायाचित्रांचे संग्रहन व संकलन करीत त्यांचे मोेठे छायाचित्र तयार केले आणि आदिवासी आजही कोणत्या दयनीय अवस्थेत जगत आहे हे जगासमोर आणण्यासाठी देशातील लहानमोठ्या शहरात चित्र प्रदर्शनी लावत आहे. आपल्या सहकाऱ्यांच्या मदतीने हैदराबाद, बंगलोर, मुंबई, दिल्ली व भोपाळ इत्यादी शहरांसह मोठे धार्मिक उत्सव व संमेलन आदि ठिकाणी छायाचित्र प्रदर्शनी लावली. एवढेच नाही तर काही छायाचित्र निवडून त्यांचे कॅलेडर सुद्धा तयार केले आणि या माध्यमातून आदिवासी जीवनशैलीचे वास्तव जगासमोर प्रकट करण्याचा प्रयत्न केला. याशिवाय शतालीने फेसबुक, व्हॉट्सअॅप, युट्यूब, इंटरनेट इत्यादी सोशल मिडीयाद्वारे आदिवासींचे वास्तव सामान्य ते खास आणि शासन ते प्रशासन तसेच जनतेपासून सरकार दरबारी पोहोचविण्याचा प्रयत्न केला.