वृद्ध कलावंतांची मानधनासाठी धडपड
By admin | Published: October 20, 2016 12:23 AM2016-10-20T00:23:49+5:302016-10-20T00:23:49+5:30
देशाने विज्ञान-तंत्रज्ञानात विशेष प्रगती केली असली तरी विशेषत: ग्रामीण भागात अंधश्रद्धा व अशिक्षितपणा मोठ्या प्रमाणात आढळते.
तीन वर्षे लोटली : गैरलाभार्थ्यांना मिळतोय लाभ, खरे गरजवंत वाऱ्यावर
काचेवानी : देशाने विज्ञान-तंत्रज्ञानात विशेष प्रगती केली असली तरी विशेषत: ग्रामीण भागात अंधश्रद्धा व अशिक्षितपणा मोठ्या प्रमाणात आढळते. त्यासाठी समाजप्रबोधन व जनजागृती केली जाते. या चळवळीत वृद्ध कलावंत मोलाची भूमिका बजावत आहेत. या वृद्धांना जडपणात मदत करता यावी याकरिता शासनाने कलाकार परिषदेच्या माध्यमाने मानधन देण्याची योजना आखली आहे. मात्र शेकडो कलावंतांचे आवेदने असतानाही त्यांना मानधनापासून वंचित ठेवण्यात आले आहे.
वृद्ध कलाकार व साहित्यीक यांना मानधन देण्याची योजना आखल्याने या योजनेचा लाभ जिल्ह्यासह संपूर्ण राज्यात दिला जात आहे. गोंदिया जिल्ह्यात या योजनेचा लाभ घेण्याकरिता तालुक्यातून शेकडो आवेदने देण्यात आली आहेत. मात्र आजही जे खरच लाभार्थी आहेत ते वाऱ्यावर असून गैरलाभार्थ्यांना लाभ दिला जात असल्याची विश्वस्त माहिती आहे.
या योजनेचा लाभ मिळावा याकरिता तिरोडा तालुक्याचे तीन कलावंत, यात चैतराम धोंडू बिसेन (६४), निमगाव खुर्द येथील गणेशनाथ हरिनाथ नागोसे (राजपूत) व गवराबाई गणेशनारायण नागोशे यांनी १० एप्रिल २०१३ रोजी तिरोडा पंचायत समिती येथे प्रस्ताव ठेवला. हा प्रस्ताव एक वर्ष जि.प. समाजकल्याण गोंदियामध्ये धूळखात राहिला. त्रुटी दुरुस्तीकरिता पाठविल्यानंतर पुन्हा सादर करण्यात आले. मात्र आज तीन वर्ष पूर्ण झाले असून कोणतीही कार्यवाही झाल्याचे दिसून येत नाही.
बरबसपुरा येथील चैतराम बिसेन हे भजन, कीर्तनामधून जनजागृती करणारे राष्ट्रीय प्रचारक आहेत. तर गणेशनाथ हरिनाथ नागोसे (राजपूत) आणि पत्नी गवराबाई हे दोघेही भजन, कीर्तन, ग्रामसफाई, जनजागृती, वृक्षारोपण यासारख्या कार्यातून व प्रबोधनातून राष्ट्रीय कार्य करीत आहेत. विदर्भ शाहीर कलाकार परिषद पुणेद्वारे ही योजना राबवित असताना संबंधित जिल्हा परिषद समाजकल्याण लाभार्थ्यांना योजनेचा लाभ देण्यास अपयशी ठरत आहे. जि.प. गोंदियामध्ये हजारो लाभार्थ्यांचे आवेदन धूळ खात आहेत. गरीब परिस्थिीतून हजारो रुपये खर्च करुन आवेदन केले असताना त्यांचा कवडीचाही लाभ होताना दिसून येत नाही.
विज्ञानाने प्रगती केली असताना आज अंधश्रद्धा, अशिक्षितपणा, अस्वच्छता आणि समाज विघटनाच्या समस्या दिसून येत आहेत. त्यांना दूर करण्याचा प्रयत्न हे कलावंत करीत आहेत. त्यांच्या कार्यातून समाजजागृती घडून येत आहे. प्रबोधनातून अनेकांमध्ये सुधार होत आहे.
आपली शाहिरी व कलाकौशल्ये सादर करुन देशाच्या दुर्बलतेला दूर करण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्यांच्या देशसेवेचा लाभ वृद्धापकाळात मिळावा, यासाठी ही योजना सुरु करण्यात आली. मात्र शासन यंत्रणेमधील अधिकारी व कर्मचारी शासनाला बदनाम करीत आहेत. (वार्ताहर)
कलेचा गंध नसलेले लाभार्थी कलाकार
जिल्हा परिषद समाजकल्याण विभागाद्वारे कलावंताना मानधनासाठी लाभार्थ्यांची निवड करताना राजकीय हस्तक्षेप होत असल्याने आपले प्रस्ताव निकाली काढण्यात आले नाही, असे अनेक अर्जदारांनी लोकमतला सांगितले. आजघडीला शेकडो लाभार्थ्यांना लाभ देण्यात येत आहे. त्यात सर्वाधिक अधिकारी, कर्मचारी आणि राजकीय लोकांच्या जवळचे आहेत. ज्यांनी कधी कुठेही कला प्रदर्शित केली नाही, राष्ट्रीय व समाजप्रबोधनाच्या कार्यात सहभाग घेतला नाही, अशा अनेकांना या योजनेचा लाभ दिला जात आहे. जे वास्तविक गरजू आहेत ते आजही या योजनेचा लाभापासून वंचित आहेत.