अंगणवाडी सेविकांच्या हक्क सन्मानासाठी संघर्ष सुरुच राहणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2019 12:00 AM2019-07-26T00:00:25+5:302019-07-26T00:00:45+5:30
अंगणवाडी सेविकांच्या समस्या मार्गी लावण्यासाठी शासनाकडे सातत्याने पाठपुरावा सुरू आहे. विधानमंडळाच्या पावसाळी अधिवेशनादरम्यान अंगणवाडी सेविकांच्या प्रश्नांकडे शासनाचा लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. चार तालुक्यातील बंद पडलेली अंगणवाडी सेविकांची भरती प्रक्रिया पुन्हा सुरु करावी आणि त्यांच्या मानधनात वाढ करण्याची मागणी लावून धरली.
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : अंगणवाडी सेविकांच्या समस्या मार्गी लावण्यासाठी शासनाकडे सातत्याने पाठपुरावा सुरू आहे. विधानमंडळाच्या पावसाळी अधिवेशनादरम्यान अंगणवाडी सेविकांच्या प्रश्नांकडे शासनाचा लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. चार तालुक्यातील बंद पडलेली अंगणवाडी सेविकांची भरती प्रक्रिया पुन्हा सुरु करावी आणि त्यांच्या मानधनात वाढ करण्याची मागणी लावून धरली. अंगणवाडी सेविकांच्या हक्क सन्मानासाठी आपला संघर्ष सुरूच राहणार असल्याचे आ.गोपालदास अग्रवाल यांनी सांगितले.
विधानसभेच्या पावसाळी अधिवेशना दरम्यान आ. अग्रवाल यांनी अंगणवाडी सेविकांच्या अनेक प्रश्नांकडे शासनाचे लक्ष वेधले. मात्र अंगणवाडी सेविका संदर्भात आपण चुकीचे वक्तव्य केल्याचा समज निर्माण झाल्याने अंगणवाडी सेविकांमध्ये नाराजीचे वातावरण होते. मात्र वास्तविकता काही वेगळीच आहे. अंगणवाडी सेविकांच्या समस्या मार्गी लावण्याचा आ.अग्रवाल यांचा सदैव प्रयत्न राहिला आहे. भाजप सरकारने सत्तेवर येण्यापूर्वी अंगणवाडी सेविकांच्या मानधनात वाढ करण्याचे आश्वासन दिले होते, ते त्यांनी पूर्ण करावे, अंगणवाडी सेविकांना सेवानिवृत्तीचा लाभ देण्याची मागणी केली होती.
विधानसभेतील चर्चेदरम्यान काही सदस्यांनी अंगणवाडीतील पोषण आहाराच्या अनियमिततेचा मुद्दा उपस्थित केला होता. त्यावर उपाय योजना म्हणून आपण सीसीटीव्ही लावण्याची मागणी केली होती. मात्र आपल्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ लावण्यात आला.
अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांचे कार्य फार महत्त्वपूर्ण असून त्यांच्या कार्याचा आपण सदैव सन्मान करतो. मात्र काही विघ्न संतोषी लोकांनी विधानसभेतील व्हिडिओ वायरल करुन अंगणवाडी सेविकां संदर्भात चुकीचे वक्तव्य केल्याचा आरोप करुन अंगणवाडी सेविकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. सभागृहात आणि सभागृहाबाहेर सुध्दा आपली अंगणवाडी सेविकांना न्याय मिळवून देण्याचा सदैव भुमिका राहिली. यापुढे देखील आपण अंगणवाडी सेविकांच्या पाठीशी सक्षमपणे उभे राहून त्यांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करु. अंगणवाडी सेविकांच्या आपल्यावरील विश्वासाला कधीही तडा जाऊ देणार नाही.