तेंदूपत्ता संकलनावरून मजूर व वन्यजीव विभागात संघर्ष; परसोडी रैयत, पांढरवानीत तणावपूर्ण स्थिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 5, 2022 02:35 PM2022-05-05T14:35:02+5:302022-05-05T14:56:32+5:30

येथील परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाऊ नये यासाठी अतिरिक्त पोलीस अधीक्षक अशोक बनकर, देवरीचे उपविभागीय पोलीस अधिकारी संकेत देवळेकर, नवेगावबांध पोलीस ठाण्याचे ठाणेदार जनार्दन हेगडकर हे परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत.

Struggle in labor and wildlife department over tendu leaf collection | तेंदूपत्ता संकलनावरून मजूर व वन्यजीव विभागात संघर्ष; परसोडी रैयत, पांढरवानीत तणावपूर्ण स्थिती

तेंदूपत्ता संकलनावरून मजूर व वन्यजीव विभागात संघर्ष; परसोडी रैयत, पांढरवानीत तणावपूर्ण स्थिती

googlenewsNext
ठळक मुद्देचोख पोलीस बंदोबस्त

रामदास बोरकर

नवेगावबांध (गोंदिया) : अर्जुनी मोरगाव व सडक अर्जुनी तालुक्यांच्या सीमेवर असलेल्या परसोडी रैयत, पांढरवानी येथील गावकरी बुधवारी तेंदूपत्ता संकलनासाठी नवेगावबांध नागझिरा व्याघ्र संरक्षण प्रकल्पात गेले असता, वन्यजीव संरक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांनी व कर्मचाऱ्यांनी गावकऱ्यांना संरक्षित वनातून तेंदूपत्ता संकलनास मनाई केली. यामुळे वन्यजीव संरक्षण विभागाचे अधिकारी, कर्मचारी व ग्रामस्थांमध्ये संघर्ष पेटला आहे. ही घटना बुधवारी (दि. ४) सकाळी घडली.

तेंदूपत्ता संकलनासाठी राखीव जंगलात गेलेल्या महिलांचे वन कर्मचाऱ्यांनी कपडे फाडले, त्यांना धक्काबुक्की करून अर्वाच्च शिवीगाळ करत वन कर्मचारी अंगावर कुऱ्हाड घेऊन धावल्याचा आरोप परसोडी, पांढरवानी येथील तेंदूपत्ता संकलनासाठी गेलेल्या ग्रामस्थ महिला व पुरुषांनी केला आहे. तर आम्ही सकाळपासूनच चर्चा करून त्यांना शांततेने समजावत आहोत. गावकऱ्यांनी केलेले आरोप तथ्यहीन असल्याचे वनक्षेत्र अधिकारी सचिन डोंगरवार यांनी सांगितले. दरम्यान, परिस्थिती बिघडू नये म्हणून पोलिसांना घटनास्थळी पाचारण करण्यात आले होते. जोपर्यंत तेंदूपत्ता राखीव जंगलातून संकलन करू देणार नाही, तोपर्यंत आम्ही येथून हटणार नाही, अशी भूमिका परसोडी, पांढरवानी या गावांतील ग्रामस्थांनी घेतल्यामुळे वन्यजीव विभाग व गावकरी यांच्यात संघर्ष निर्माण झाला आहे. येथील परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाऊ नये यासाठी अतिरिक्त पोलीस अधीक्षक अशोक बनकर, देवरीचे उपविभागीय पोलीस अधिकारी संकेत देवळेकर, नवेगावबांध पोलीस ठाण्याचे ठाणेदार जनार्दन हेगडकर हे परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत.

गावकरी आपल्या भूमिकेवर ठाम

वन्यजीव संरक्षण विभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी सचिन डोंगरवार व त्यांचे अधिकारी-कर्मचारी घटनास्थळावर तळ ठोकून आहेत. आमदार मनोहर चंद्रिकापुरे यांनी आंदोलनकर्त्यांची भेट घेऊन हा प्रश्न केंद्र सरकारशी संबंधित असून, यावर लवकरात लवकर तोडगा काढण्यासाठी आपण प्रयत्न करू, असे आश्वासन दिले. त्यांनी आंदोलनकर्ते व अधिकाऱ्यांचे म्हणणे ऐकून घेत समन्वय घडवून आणण्याचा प्रयत्न केला. व्याघ्र प्रकल्पाचे मुख्य संचालक गवळा व जिल्हाधिकारी नयना गुंडे यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा करून यावर त्वरित तोडगा काढण्यास सांगितले.

गावकऱ्यांनी ठेवले नियमावर बोट

वन हक्क ग्रामसभा परसोडी, परसोडी रैयतच्या सरपंच रंजना वाडगुरे, वनहक्क समितीचे अध्यक्ष दिगंबर मडावी यांनी अनुसूचित जमाती व इतर पारंपरिक वननिवासी वनहक्काचे मान्यता अधिनियम २००६ व नियम २००८ सुधारित नियम २०१२ अन्वये वन हक्क व्यवस्थापन समितींतर्गत ग्रामसभा अस्तित्वात आली आहे. तेंदूपत्ता संकलनाचे काम यंदा ग्रामसभा परसोडीला देण्यात आले आहे. वन हक्क अधिनियम २००६मधील नियम २ (घ) नुसार वनभूमी म्हणजे कोणत्याही प्रकारच्या वनक्षेत्रात कोणत्याही वनाची जमीन, ज्यात वर्गीकरण न केलेली वने, सीमांकीत न केलेली वने, मानवी वने, संरक्षित वने, राखीव वने, अभयारण्य व राष्ट्रीय उद्यान या सर्वांचा समावेश होतो. सर्वप्रकारच्या वनांत आमचा वावर होतो. हे अधिकार ग्रामसभेला आहेत.

राखीव क्षेत्रात तेंदूपत्ता तोडता येत नाही

व्याघ्र संरक्षण प्रकल्पाच्या राखीव वनात तेंदूपत्ता संकलन नियमाप्रमाणे करता येत नाही किंवा जिल्हाधिकाऱ्यांनी या क्षेत्रातून तेंदूपत्ता संकलनाची परवानगी गावकऱ्यांना दिलेली नाही. त्यामुळे व्याघ्र संरक्षण प्रकल्पाच्या सीमेत नियमानुसार गावकऱ्यांना तेंदूपत्ता संकलन करण्याची मुभा नाही, अशी भूमिका सचिन डोंगरवार (वनपरिक्षेत्र अधिकारी, वन्यजीव संरक्षण विभाग (राष्ट्रीय उद्यान) नवेगावबांध) व वन्यजीव संरक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांनी घेतली आहे.

गावकरी म्हणतात आदेश दाखवा

वन हक्क व्यवस्थापन ग्रामसभेचे सदस्य असलेले सर्व परसोडी रैयत, पांढरवानी येथील ग्रामस्थ वन हक्क अधिनियम २००६मधील तरतुदी पुढे करून आम्हाला व्याघ्र प्रकल्पाच्या राखीव जंगलातून तेंदूपत्ता गोळा करू द्यावा. नियमाप्रमाणे गोळा करता येत नाही, असे म्हणता तर तसा आदेश दाखविण्याची मागणी गावकऱ्यांनी केली.

Web Title: Struggle in labor and wildlife department over tendu leaf collection

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.