कर्मचाऱ्यांच्या पगारासाठी महामंडळाची वसुलीसाठी धडपड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2021 04:27 AM2021-05-22T04:27:11+5:302021-05-22T04:27:11+5:30
गोंदिया : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने चांगलाच कहर केल्याने दुसऱ्यांदा राज्यात लॉकडाऊन लावावा लागला आहे. कोरोनाची धास्ती घेत आता नागरिकांनी ...
गोंदिया : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने चांगलाच कहर केल्याने दुसऱ्यांदा राज्यात लॉकडाऊन लावावा लागला आहे. कोरोनाची धास्ती घेत आता नागरिकांनी प्रवास टाळला असून, त्याचा फटका राज्य रस्ते परिवहन महामंडळाला बसत आहे. प्रवासी वाहतूक पूर्णपणे ठप्प पडली असून, आगारांचे उत्पन्न शून्यावर आले आहे. अशात आता कर्मचाऱ्यांचा पगार व अन्य खर्च भागविण्यासाठी महामंडळाने थकबाकीदारांकडे वसुलीसाठी धडपड सुरू केली आहे. महामंडळाची ज्यांच्याकडे थकबाकी आहे त्यांच्याकडून पैसा काढणे आता महामंडळाला गरजेचे झाले असून, असे न झाल्यास त्याचा प्रभाव येणाऱ्या काळात कर्मचाऱ्यांच्या पगारावर पडणार यात शंका वाटत नाही. यामुळेच आता आगारांनीही त्यांच्याकडील थकबाकीच्या वसुलीसाठी थकबाकीदारांना पत्र पाठविण्यास सुरूवात केली आहे. जिल्ह्यात गोंदिया व तिरोडा असे दोन आगार असून, त्यांनीही थकबाकीच्या वसुलीवर आता जोर दिला आहे.
--------------------------
जिल्ह्यातील एकूण आगार - २
एकूण कर्मचारी - ४९३
सध्याचे रोजचे उत्पन्न - ००
महिन्याला पगारावर होणारा खर्च - १,१३,६१,२५६
----------------------
कुणाकडे किती थकबाकी ?
तहसील कार्यालय - १०,६९,३०२
---------------------------
...तर पगार होणे अवघड
प्रवासी वाहतूक पूर्णपणे बंद असल्याने आगाराला काहीच उत्पन्न नाही. सर्वत्र हीच परिस्थिती असल्याने त्याचा फटका महामंडळाला बसत आहे. हीच स्थिती राहिल्यास येणाऱ्या काळात कर्मचाऱ्यांचे पगार निघणेही अवघडच दिसत आहे.
- संजना पटले, गोंदिया आगारप्रमुख
--------------------------------
कर्मचारी आर्थिक अडचणीत
प्रवासी वाहतूक ठप्प पडल्याने एस. टी. महामंडळाला उत्पन्नच नाही. मागील वर्षी हीच परिस्थिती निर्माण झाली होती. त्याचा परिणाम पगारावर झाला होता. आता यंदा तेच दिवस परतून आल्यासारखे वाटते. हीच परिस्थिती राहिल्यास येणाऱ्या काळात त्याचा परिणाम कर्मचाऱ्यांच्या पगारावर पडणार.
- सईद शेख, अध्यक्ष, कामगार संघटना
------------
कोरोनामुळे नागरिकांनी प्रवास बंदच केला आहे. त्यामुळे आता प्रवासी वाहतूक बंद पडली आहे. परिणामी आगाराचे उत्पन्नाचे दारच बंद पडले आहे. याचा परिणाम महामंडळावर पडतो. पुढे ही अशीच स्थिती राहिल्यास कर्मचाऱ्यांचा पगार कसा निघणार, असा प्रश्न आहे.
- अशोक चौरसिया, सचिव, कामगार संघटना
----
कोरोनाचा धसका घेत नागरिकांनी प्रवास बंद केल्याने प्रवासी वाहतूक पूर्णपणे बंद आहे. सर्वत्र हीच स्थिती असून, महामंडळाला जबर फटका बसत आहे. यापुढे ही अशीच स्थिती राहिल्यास महामंडळाला कर्मचाऱ्यांचा पगार काढणेही कठीण जाणार, यंत शंका नाही.
- दिलीप बंसोड (वाहक, तिरोडा)