तंटामुक्त अध्यक्ष पदासाठी मारहाण
By admin | Published: September 26, 2016 01:45 AM2016-09-26T01:45:55+5:302016-09-26T01:45:55+5:30
गावाला शांततेतून समृद्धीकडे नेण्यासाठी शासनाने महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहिम सुरु केली.
१२ जणांवर गुन्हा दाखल : गोरेगाव तालुक्याच्या चिल्हाटी येथील घटना
गोंदिया : गावाला शांततेतून समृद्धीकडे नेण्यासाठी शासनाने महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहिम सुरु केली. या मोहिमेच्या समितीवर असलेल्या अध्यक्षाला गावात सम्मानाचे स्थान मिळत असल्याने अध्यक्ष पदासाठी वाद होऊ लागले. परिणामी एकमेकांना मारहाण करुन प्रकरण पोलिस ठाण्यांपर्यंत पोहोचत असल्याचे आणखी एक उदाहरण समोर आले आहे. गोरेगाव तालुक्याच्या चिल्हाटी येथे तंटामुक्त अध्यक्ष पदासाठी झालेल्या वादात एकमेकांना मारहाण करण्यात आली. परिणामी दोन्ही गटातील १२ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गोरेगाव तालुक्याच्या चिल्हाटी येथे शनिवारी दुपारी २ वाजता तंटामुक्त समितीच्या अध्यक्षाची निवड होती. तंटामुक्त अध्यक्षपदासाठी फिर्यादी माणिकचंद इसूलाल पारधी (५५) यांनी रमेश सिलेवार यांचे नाव सुचविले. त्यावरुन झालेल्या वादात आरोपी विनोद पुरण रंगारी, लालचंद चैतराम चव्हाण, नरेश चैतराम चव्हाण, मनोज लोकचंद चव्हाण, उमराव आडकण ठाकूर व विजय दशरथ पारधी या सहा जणांनी माणिकचंदला अश्लिल शिवीगाळ करुन ठार करण्याची धमकी दिली. त्या सहा जणांवर भादंविच्या कलम १४३,२९४, ५०४, ५०६ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.
रमेश सिलेवार यांचे नाव सुचविताच गोंधळ घालून सभा तहकूब केली असता आरोपी रविंद्र टालीकराम पटले, रमेश लक्ष्मण सिलेवार, भुषण बुधराम ठाकूर, मोरेश्वर चव्हाण, माणिकचंद पारधी व प्रकाश गुलाब पटले या सहा जणांनी शिवीगाळ करुन ठार करण्याची धमकी दिली.
प्रेमकला भरतलाल कटरे यांच्या तक्रारीवरुन सदर आरोपी विरुद्ध भादंविच्या कलम १४३,२९४, ५०४,५०६ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. (तालुका प्रतिनिधी)