तब्बल १४ तास बिबट्याचा घरात ठिय्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2018 09:55 PM2018-09-16T21:55:26+5:302018-09-16T21:56:33+5:30
अर्जुनी मोरगाव तालुक्यातील येरंडी येथील एका गावकºयाच्या घरात बिबट्याने तब्बल चौदा तास ठिय्या मांडला होता. दरम्यान वन आणि वन्यजीव विभागाच्या कर्मचाºयांच्या मदतीने घरात ठाण मांडून बसलेल्या बिबट्याला गुंगीचे इंजेक्शन देऊन पकडण्यात यश आले.
लोकमत न्यूज नेटवर्क
बोंडगावदेवी : अर्जुनी मोरगाव तालुक्यातील येरंडी येथील एका गावकºयाच्या घरात बिबट्याने तब्बल चौदा तास ठिय्या मांडला होता. दरम्यान वन आणि वन्यजीव विभागाच्या कर्मचाºयांच्या मदतीने घरात ठाण मांडून बसलेल्या बिबट्याला गुंगीचे इंजेक्शन देऊन पकडण्यात यश आले. यानंतर गावकºयांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. ही घटना शनिवारी (दि.१५) रात्री १०.३० वाजताच्या सुमारास घडली.
प्राप्त माहितीनुसार येरंडी येथील शालीकराम दोनोडे यांच्या घरातील सर्व मंडळी रात्री जेवण करुन झोपले होते. रात्री १०.३० वाजताच्या दरम्यान अचानक एका बिबट्याने त्यांच्या घरातच प्रवेश केला. घरात बिबट आल्याची चाहुल लागताच घरातील सर्व लोक जागी झाले. त्यांनी घराशेजारच्यांचा आसरा घेतला. इकडे बिबट्याने घराच्या धाब्यावर आपले बस्तान मांडले.
घरात बिबट्या शिरल्याची माहिती वन विभागाला देण्यात आली. रात्रीच वनविभागाचे कर्मचारी गावात दाखल झाले. त्यांनी वेळीच उपाययोजना सुरू केली. रात्रभर बिबट्यानी धाब्यावर दबा धरुन आपला मुक्काम ठोकला. रविवारी (दि.१६) दुसऱ्या दिवशी सकाळपासूनच येरंडी गावाला जत्रेचे स्वरुप आले.
वरिष्ठांना माहिती कळताच उपवनसंरक्षक नरेंद्र शेंडे, परिविक्षाधिन सहायक वनसंरक्षक नवा किशोर रेड्डी, वनपरिक्षेत्राधिकारी छगनलाल रहांगडाले, ए.एम. खान, नवेगावबांध नागझिरा व्याघ्र प्रकल्पाचे वन्यजीव विभागाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. नंदकिशोर खोडसकर, अर्जुनी मोरगाव पोलीस स्टेशनचा ताफा येरंडी गावात पोहचला. रविवारी सकाळी १० वाजतापासून बिबट्याला घराबाहेर काढण्याची मोहीम सुरू करण्यात आली. धाब्यावर दबा धरुन बसलेल्या बिबट्याला बेशुद्ध करण्यासाठी डॉ. खोडसकर यांनी इंजेक्शन बंदुकीत भरले. मिथून चव्हाण यांनी घरावरील कवेलू काढून बिबट्याला सकाळी ११ वाजताच्या सुमारास पहिले इंजेक्शन दिले. वेळेच्या आत त्याला गुंगी आलीच नाही. नंतर १२.०४ वाजता अमोल चौबे यांनी दुसरे इंजेक्शन लावले. त्याला गुंगी आली तो बेशुद्ध पडला. दुपारी १२.१५ वाजता त्याला धाब्यावरुन बेशुद्धावस्थेत घराबाहेर काढण्यात आले. १२.२० वाजता वनविभागाच्या गाडीने बिबट्याला नवेगावबांधला हलविले. तब्बल १४ तास बिबट्याने घरात वास्तव्य करुन गावकऱ्यांची झोप उडविली होती. गावात कोणतीही हानी न होता बिबट्याला यशस्वीपणे जेरबंद करण्याची कामगिरी वन विभागाने केली. बिबट्या ३ वर्षाचा असून ३० किलो त्याचा वजनाचा होता. बिबट्या जेरबंद झाल्याने वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी सुटकेचा श्वास सोडला. बिबट्याला पाहण्यासाठी परिसरातील गावकऱ्यांनी गर्दी केली होती.