अंगावर झाड कोसळून विद्यार्थ्याचा मृत्यू; दुचाकीवरून जाताना घडली घटना
By अंकुश गुंडावार | Published: September 7, 2024 05:44 PM2024-09-07T17:44:00+5:302024-09-07T17:44:57+5:30
Gondia : हलबीटोला ते सुरजाटोला मार्गावरील घटना
सालेकसा : मित्राच्या दुचाकीवरून वसतिगृहात जात असलेल्या विद्यार्थ्याच्या अंगावर अचानक झाड कोसळल्याने त्याचा घटनास्थळीच मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी (दि.६) तालुक्यातील हलबीटोला ते सूरजाटोला मार्गावर घडली. दानेश्वर मयालाल अडमे (२३), रा. मानागड असे अंगावर झाड कोसळून मृत्यू झालेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे.
प्राप्त माहितीनुसार तालुक्यातील मानागड येथील दानेश्वर हा सालेकसा येथे वसतिगृहात राहून शिक्षण घेत होता. सुटी असल्याने तो गावकडे आई-वडिलांना भेटण्यासाठी गेला होता. शुक्रवारी (दि.६) आई-वडिलांची भेट घेऊन मित्रासह त्याच्या दुचाकीने तो सालेकसा येथे वसतिगृहात जात होता. दुचाकीवरून जात असताना अचानक हलबीटोला ते सूरजाटोला जवळ रस्त्यालगतचे एक झाड त्यांच्या दुचाकीवर कोसळले. यात मागे बसलेल्या दानेश्वरचा घटनास्थळी मृत्यू झाला, तर त्याचा मित्र इश्वर प्रेमलाल उईके (१९) हा थोडक्यात बचावला. या घटनेची माहिती मिळताच सालेकसाचे तहसीलदार नरसय्या कोंडागुर्ले हे घटनास्थळी पोहचले. या घटनेची माहिती सालेकसा पोलिस स्टेशनला दिली. माहिती मिळताच पोलिस निरीक्षक भूषण बुराडे ताफ्यासह घटनास्थळी पोहचले. घटनास्थळी पंचनामा करून या घटनेची नोंद सालेकसा पोलिस स्टेशनला केली.
दानेश्वरची ती भेट ठरली अखेरची
दानेश्वर हा वसतिगृहातच राहून शिक्षण घेत होता. तो अभ्यासातसुद्धा हुशार होता. दरम्यान, सुटी असल्याने तो मानागड येथे आई-वडिलांना भेटण्यासाठी आला होता. मात्र आई-वडिलांची भेट घेऊन सालेकसा येथे परताना त्याच्या अंगावर झाड कोसळून मृत्यू झाला. त्यामुळे दानेश्वरची आई-वडिलांसह ती अखेरची भेट ठरली. या घटनेनमुळे दानेश्वरच्या कुटुंबीयांवर मोठा आघात झाला आहे. तर परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.