तिसरीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना पुन्हा बेरीज-वजाबाकीचे धडे; कोरोनाकाळात शाळा बंदचा परिणाम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 24, 2021 04:48 PM2021-11-24T16:48:18+5:302021-11-24T16:55:30+5:30
२२ नोव्हेंबरपासून शाळा सुरू झाल्या आहेत. ८ वी ते १२ वी पर्यंतचे ऑफलाइन वर्ग सुरू आहेत. ऑनलाइन शाळा सुरू असल्या तरी त्या अभ्यासाला विद्यार्थी गांभीर्याने घेत नाहीत. इयत्ता पहिली ते चौथीपर्यंतचे विद्यार्थी शिक्षणापासून काेसो दूर आहेत.
गोंदिया : कोरोनाच्या काळात दीड वर्षापासून शाळा बंद होत्या. त्यामुळे युनोस्कोच्या अहवालानुसार शालेय शिक्षणाचा जवळपास ६० टक्के वेळ वाया गेला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या पायाभूत शिक्षणावर भर देण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाने घेतला आहे. याअंतर्गत तिसरीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना भाषेसह बेरीज, वजाबाकी शिकविण्यावर भर दिला जाणार आहे. विद्यार्थ्यांना पुन्हा अ, ब, क, ड चे धडे गिरवावे लागणार आहेत.
गोंदिया जिल्ह्यात २२ नोव्हेंबरपासून शाळा सुरू झाल्या आहेत. ८ वी ते १२ वी पर्यंतचे ऑफलाइन वर्ग सुरू आहेत. ऑनलाइन शाळा सुरू असल्या तरी त्या अभ्यासाला विद्यार्थी गांभीर्याने घेत नाहीत. इयत्ता पहिली ते चौथीपर्यंतचे विद्यार्थी शिक्षणापासून काेसो दूर आहेत. या विद्यार्थ्यांना पुन्हा मूळ शिक्षण देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. आता या विद्यार्थ्यांना अ, ब, क, ड चे व १ ते १०० पर्यंतचे धडे गिरवावे लागणार आहेत.
पुन्हा नव्याने सुरुवात
आपला पाल्य पहिलीत गेल्यावर त्याला आद्याक्षरे, आकडेमोड, शिकविली जाते. शाळेत प्रवेश घेतला अन् शाळा बंद झाली. अशी परिस्थिती अनेक विद्यार्थ्यांची आहे. आता विद्यार्थ्यांना पुन्हा नव्याने मूळ शिक्षण द्यावे लागणार आहे.
अ, ब, क, ड येईना, विद्यार्थी-पालक कंटाळले
कोरोनामुळे शाळा बंद झाल्या आणि आमची मुले घरातच राहिली. त्यांचा अभ्यासाशी असलेला घनिष्ट संबंध कमी झाला. त्यामुळे त्यांना पुन्हा पूर्ववत होण्यासाठी वेळ लागेल.
-शंकर मेश्राम पालक, पदमपूर
आधी शाळा सुरू होती तर आमची मुले हुशार होती. कोरोनाने शाळा बंद पडल्या आणि आमची मुले अभ्यास विसरली. त्यांनी पुन्हा कामाला लागणे गरजेचे आहे.
- वैशाली अरविंद भुते, पालक, शिवणी
चौथी-पाचवीच्या विद्यार्थ्यांना मूलभूत कौशल्ये
इयत्ता पहिली ते सहावीपर्यंतच्या शाळा सुरू करण्याचा अद्याप कोणताही प्रस्ताव नाही. सूचना प्राप्त होताच मुलांच्या शिक्षणाकडे लक्ष दिले जाईल. गुणवत्तावाढीसाठी विशेष प्रयत्नही केले जाणार आहेत. यासाठी शिक्षकांना आवश्यक त्या सूचना दिल्या असल्याचे शिक्षणाधिकारी के. वाय. सर्याम यांचे म्हणणे आहे.
विद्यार्थी म्हणतात...
शाळा बंद असल्याने अभ्यासच केेला नाही. आता शाळेत शिकविले तर शिक्षणाचा कंटाळा येऊ लागला आहे. आता शाळेत जाणेही जड वाटत आहे. शिक्षकांनी समजाविले तर मी विसरतो.
- यश दिवाळे, विद्यार्थी, किडंगीपार
जिल्ह्यातील एकूण शाळा- १६६३
शासकीय शाळा-१०३९
खासगी शाळा- ६२४