पहिली ते आठवीचे विद्यार्थी पूर्ण पुस्तकांपासून वंचित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2018 04:53 PM2018-08-22T16:53:39+5:302018-08-22T16:55:03+5:30
सर्व शिक्षा अभियानातंर्गत इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके वाटप केले जाते. मात्र यंदा शाळा सुरू होवून तीन महिन्यांचा कालावधी पूर्ण होत असताना गणित व इंग्रजी विषयाच्या पुस्तकांचा पुरवठा न झाल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : सर्व शिक्षा अभियानातंर्गत इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके वाटप केले जाते. मात्र यंदा शाळा सुरू होवून तीन महिन्यांचा कालावधी पूर्ण होत असताना गणित व इंग्रजी विषयाच्या पुस्तकांचा पुरवठा न झाल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. मात्र शिक्षण विभागाने सर्व विद्यार्थ्यांना पाठपुस्तकांचे वाटप झाल्याचे सांगत हातवर केल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. ही स्थिती केवळ गोंदिया जिल्ह्यात नव्हे तर संपूर्ण राज्यभरात असल्याची माहिती आहे.
कोणताही बालक शिक्षणापासून वंचित राहू नये, यासाठी शासनाने सक्तीचे शिक्षणाचा कायदा लागू केला. तसेच इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना सर्व शिक्षा अभियानाच्या माध्यमातून नि:शुल्क पाठ्यपुस्तकांचे वाटप सुरू केले. मात्र याचे योग्य नियोजन न केल्याने दरवर्षी याचा फटका विद्यार्थ्यांना बसत आहे. शिक्षण विभागाने युडायस या संकेतस्थळावर प्रत्येक जिल्ह्यातील इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांची संख्या मागवून शाळा सुरू होण्यापूर्वीच पाठ्यपुस्तकांचा पुरवठा केला. त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांना शाळेच्या पहिल्याच दिवशी पाठ्यपुस्तके मिळण्याची शक्यता होती. जिल्हा शिक्षण विभागाने सुध्दा प्रसिध्द पत्रक काढून प्रत्येक शाळेत प्रवेशोत्सव साजरा करुन पाठ्यपुस्तकांचे वाटप केल्याचा मोठा गाजावाजा केला. मात्र अद्यापही राज्यातील काही जिल्ह्यातील आठवीच्या विद्यार्थ्यांना गणित व इंग्रजी विषयांच्या पुस्तकांचा पुरवठा करण्यात आला नाही. तर पहिल्या वर्गाची सुध्दा पुस्तके मिळाली नसल्याची ओरड विद्यार्थी व त्यांच्या पालकांची आहे. गोंदिया जिल्ह्यातील चोपा,बिजेपार, गोरेगाव, आमगाव, सालेकसा येथील इयत्ता आठवीच्या विद्यार्थ्यांना अद्यापही इंग्रजी व गणित विषयांची पुस्तके मिळाली नाही. त्यामुळे या विषयाचे शिक्षक जेव्हा वर्गात शिकवित असतात तेव्हा विद्यार्थ्यांना शिक्षकांच्या चेहऱ्याकडे पाहत राहावे लागत असल्याचे चित्र आहे. दरम्यान ही स्थिती केवळ जिल्ह्यात नसून राज्यातील इतरही जिल्ह्यात असल्याची माहिती आहे. विशेष म्हणजे शाळा सुरू होवून आता तीन महिन्याचा कालावधी लोटला. मात्र अद्यापही विद्यार्थ्यांना पूर्ण पुस्तके न मिळाल्याने शैक्षणिक नुकसान होत आहे.
बाजारपेठेत पुस्तके मिळेना
इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना सर्व शिक्षा अभियानातंर्गत मोफत पाठ्यपुस्तकांचा पुरवठा केला जातो. त्यामुळे विद्यार्थ्यांना बाहेरुन पुस्तके घेण्याची गरज पडत नाही. त्यामुळे बाजारपेठेतील पुस्तक विक्रेत्यांनी सुध्दा या वर्गाची पुस्तके ठेवणे बंद केले आहे. विद्यार्थी बाजारपेठेत सदर विषयाची पुस्तके घेण्यासाठी गेल्यावर त्यांना रिकाम्या हाताने परतावे लागत आहे.
दरवर्षी पुस्तकांमध्ये १५ ते २० टक्के कपात
शालेय शिक्षण विभागातर्फे शाळांना पाठ्यपुस्तकांचा पुरवठा करण्यापूर्वी युडायस या संकेतस्थळावर पुस्तकांची मागणी मागविते. बरेचदा मागील वर्षीची विद्यार्थी संख्या गृहीत धरुन पुस्तकांचा पुरवठा केला जातो. त्यामुळे विद्यार्थी वाढल्यास त्यांना पाठपुस्तकांपासून वंचित राहावे लागते. तर मागील दोन तीन वर्षांपासून शासन पाठपुस्तकाच्या पुरवठ्यात १५ ते २० टक्के कपात करीत आहे. याचा फटका विद्यार्थ्यांना बसत आहे.
जिल्ह्यातील सर्व विद्यार्थ्यांना शाळेच्या पहिल्याच दिवशी पाठ्यपुस्तकांचा पुरवठा करण्यात आला. जर काही ठिकाणी पुस्तके मिळाले नसल्याची तक्रारी असल्यास माहिती घेवून त्यांना पाठ्यपुस्तकांचा पुरवठा केला जाईल.
-उल्हास नरड, शिक्षणाधिकारी, प्राथमिक गोंदिया.