विद्यार्थ्यांनो, आवडीचे क्षेत्र निवडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2021 04:20 AM2021-07-21T04:20:42+5:302021-07-21T04:20:42+5:30
अर्जुनी-मोरगाव : विद्यार्थी जीवन हा एक सुंदर प्रवास आहे. या प्रवासात अनेक खाचखळगे येतात. त्या अडचणींवर मात करून आपली ...
अर्जुनी-मोरगाव : विद्यार्थी जीवन हा एक सुंदर प्रवास आहे. या प्रवासात अनेक खाचखळगे येतात. त्या अडचणींवर मात करून आपली प्रगती करीत राहिले पाहिजे. दहावीची परीक्षा हा त्या प्रवासातील टर्निंग पॉइंट आहे. आई-वडील व शिक्षक या त्रिसूत्रीमुळे तुमचा जीवन प्रवास सोपा बनला आहे. अशात विद्यार्थ्यांनो तुम्हाला ज्या क्षेत्रात रुची आहे ते क्षेत्र निवडा, असे प्रतिपादन श्रीमती किशोर बाई शिक्षण संस्थेचे सचिव अनिल मंत्री यांनी केले.
जीएमबी विद्यालयात दहावीतील गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार सोहळ्यात अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. प्रमुख पाहुणे म्हणून जीएमबी कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्राचार्य वीणा नानोटी, शाळेचे पर्यवेक्षक मुकेश शेंडे, सरस्वती विद्यालयाच्या पर्यवेक्षिका छाया घाटे, प्रा. यादव बुरडे, संजय बंगळे, राजेंद्र काकडे आदी प्रामुख्याने उपस्थित होते. सर्वप्रथम पाहुण्यांच्या हस्ते देवी सरस्वतीच्या छायाचित्राचे पूजन करून माल्यार्पण करण्यात आले.
जीएमबी विद्यालयाचा निकाल १०० टक्के लागला असून, यामध्ये १५ विद्यार्थ्यांनी ९० टक्केपेक्षा जास्त गुण संपादन केले आहेत. प्रावीण्य श्रेणीत ३६ तर प्रथम श्रेणीत ३१ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. ९० टक्के गुण संपादन करणाऱ्यांमध्ये सेजल बारापात्रे (९६.८०), मुस्कान माखिजा (९६.२०), उन्नती लांजेवार (९५.४०), पूर्वा बुरडे (९५), हितेश्वरी शहारे (९४.२०), भूषण पाऊलझगडे (९४.२०), सृष्टी जनबंधू (९४), कावेरी कापगते (९२.६०), श्रेयस बोरकर (९२.२०), काजल उपरीकर (९१.८०), दीपक शहारे (९१.४०), विवेक बोरकर (९०.८०), दीपिका भेंडारकर (९०.४०), सानिया कुरेशी (९०.२०), आयुष निखारे (९१.४०) यांचा समावेश आहे. शाळेचा निकाल वास्तव असून अशा पद्धतीने लावलेल्या निकालामुळे पालक व विद्यार्थी समाधानी असून समाधान हाच माणसाच्या अंगी असलेला फार मोठा गुण आहे, असे प्रतिपादन प्राचार्य नानोटी यांनी केले. गुणवंत विद्यार्थ्यांचा संस्थेचे सचिव मंत्री व प्राचार्य नानोटी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. संचालन करून आभार विष्णू चाचेरे यांनी मानले. कार्यक्रमासाठी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.