विद्यार्थ्यांनो स्पर्धा स्वत:शी करा
By admin | Published: February 5, 2017 12:13 AM2017-02-05T00:13:20+5:302017-02-05T00:13:20+5:30
आजचे युुग स्पर्धेचे युग आहे. त्यामुळे या युगात सर्वच एकमेकांच्या पुढे जाण्यासाठी स्पर्धा करीत आहेत;
जगदीश अग्रवाल : ‘अभ्यास कसा करावा’ कार्यशाळेचे यशस्वी आयोजन
गोंदिया : आजचे युुग स्पर्धेचे युग आहे. त्यामुळे या युगात सर्वच एकमेकांच्या पुढे जाण्यासाठी स्पर्धा करीत आहेत; मात्र या स्पर्धेतील यशा सोबतच आपण स्वत: काय आहोत हे जाणून घेण्यासाठी स्वत:शी स्पर्धा करा असे प्रतिपादन नागपूर येथून आलेले वक्ते जगदीश अग्रवाल यांनी केले.
‘लोकमत’ बाल विकास मंच व देवाजी बुद्धे शिक्षण संस्था संचालीत गोंदिया पब्लिक स्कूलच्या संयुक्तवतीने शनिवारी (दि.४) येथील गोंदिया पब्लिक स्कूलच्या सभागृहात आयोजीत ‘अभ्यास कसा करावा’ या विषयावरील कार्यशाळेत ते बोलत होते. यावेळी अविनाश मेश्राम (नागपूर), शाळेच्या मुख्याध्यापीका इरा शर्मा, लोकमत बाल विकास मंचचे जिल्हा संयोजक श्रीकांत पिल्लेवार, लघू जाहिरात विभाग प्रमुख आशीक महिलावार प्रामुख्याने उपस्थित होते.
या कार्यशाळेची सुरुवात विद्येची देवी शारदा व लोकमतचे संस्थापक स्वातंत्र्य सेनानी जवाहरलाल दर्डा यांच्या तैलचित्रावर माल्यार्पण व दिप प्रज्वलन करुन करण्यात आली. पुढे बोलताना अग्रवाल यांनी, अभ्यासात विविध अडचणी येतात, मात्र त्यांना न घाबरता नियोजनपूर्वक त्यांचे निराकरण करून त्यातूनच यश मिळविता येते असे सांगीतले. तसेच यशाच्या शिखरावर पोहोचलेल्या वैज्ञानिक, खेळाडू, राजकारणीचे उदाहरण देऊन आपल्यातील कमीपणा कसादूर करायचा यावर प्रकाश टाकला.
दरम्यान, कार्यशाळेला उपस्थित विद्यार्थी व त्यांच्या पालकांकडून विचारण्यात आलेल्या प्रश्नांना उत्तरे देत त्यांनी विद्यार्थ्यांना अभ्यासासोबत त्यांची आवड असलेल्या क्षेत्रात सहभागी होण्यास सांगितले. यातून अभ्यासाप्रती आवड व नियमितपणा आणण्यास मदत होणार असे सांगीतले. तर दिवसभर पुस्तकात शिरून राहणे गरजेचे नाही. मात्र पुस्तक हातात घेतले असताना फक्त अभ्यासातच मन लावून त्याचा आनंद घ्यावा असा मंत्रही त्यांनी विद्यार्थ्यांना दिला. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शिक्षकवृंद व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी प्रयत्न केले. (शहर प्रतिनिधी)
सोशल साईट्स हे एक व्यसन
आज प्रत्येकच विद्यार्थ्याच्या हातात मोबाईल व लॅपटॉप आले आहेत. यामुळे ते सोशल नेटवर्कच्या आहारी जात आहेत. मित्रांसोबत त्यांचा वेळ जात असून ते जवळ नसताना या साईट्सच्या माध्यमातून ते सतत संपर्कात असतात. मात्र सोशल साईट्सचा हा वापर नसून त्याचे एक व्यसनच या विद्यार्थ्यांना लागत आहे. अशात विद्यार्थ्यांचे लक्ष अभ्यासातून परावृत्त होत आहे. त्यामुळे शिक्षणाच्या या काळात विद्यार्थ्यांनी सोशल साईट्सच्या या व्यसनापासून स्वत:ला दूर ठेवण्याची गरज आहे. यासाठी पालकांचीही याप्रती तेवढीच जबाबदारी असल्याचा संदेश व तसे आवाहनही अग्रवाल यांनी केले.