विद्यार्थ्यांना धड जेवणही मिळेना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2017 09:53 PM2017-09-27T21:53:48+5:302017-09-27T21:54:04+5:30
वसतिगृहात राहून चांगले शिक्षण घेता यावे, आई वडिलांचे स्वप्न पूर्ण करता यावे, यासाठी आदिवासी दुर्गम भागातील विद्यार्थी घरापासून दूर राहात आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : वसतिगृहात राहून चांगले शिक्षण घेता यावे, आई वडिलांचे स्वप्न पूर्ण करता यावे, यासाठी आदिवासी दुर्गम भागातील विद्यार्थी घरापासून दूर राहात आहेत. मात्र या विद्यार्थ्यांना वसतिगृहात दोन वेळचे धड जेवणही मिळत नसल्याने अर्धपोटी झोपावे लागत असल्याची धक्कादायक बाब पुढे आली आहे.
गोंदियापासून २ कि.मी.अंतरावर असलेल्या मुर्री येथील अनुसूचित जाती नवबौद्ध मुलांची शासकीय निवासी शाळा व वसतिगृह आहे. या वसतिगृहात गोंदिया, भंडारा, गडचिरोली, चंद्रपूर जिल्ह्यातील दुर्गम आदिवासी भागातील १५० वर विद्यार्थी शिक्षण घेत आहे. वसतिगृहातील विद्यार्थ्यांना दोन वेळेचे जेवण, नाश्ता, दूध दिले जाते. यासाठी सामाजिक न्याय विभागाने एका कंत्राटदाराची नियुक्ती केली आहे. वसतिगृहातील विद्यार्थ्यांना दर्जेदार जेवण मिळावे यासाठी शासनाकडून कंत्राटदाराला पैसे देखील मोजले जातात. मात्र मागील दोन तीन महिन्यांपासून विद्यार्थ्यांना निकृष्ट दर्जाचे जेवण मिळत असल्याची विद्यार्थ्यांची तक्रार आहे. काही विद्यार्थ्यांनी याची तक्रार केल्यानंतर जेवणाच्या दर्जात सुधारणा करण्याऐवजी उलट विद्यार्थ्यांना दमदाटी करुन गप्प बसण्यास सांगत असल्याचे येथील विद्यार्थ्यांनी सांगितले. सकाळचा नास्ता देखील निकृष्ट दर्जाचा असतो. विद्यार्थ्यांना दोन वेळेचे पोटभर जेवण देण्याची तरतूद आहे. मात्र विद्यार्थ्यांना मोजकेच जेवण दिले जात असल्याची माहिती आहे. एखाद्या विद्यार्थ्यांने पोळी किंवा वरणाची मागणी केल्यास त्याला ते देता दमदाटी करुन परत पाठविले जाते. त्यामुळे कित्येकदा आम्हाला उपाशीपोटी झोपावे लागत असल्याचे येथील विद्यार्थ्यांनी सांगितले. दरम्यान या प्रकरणाची तक्रार विद्यार्थ्यांनी आतापर्यंत अनेकदा गृहपाल आणि समाजकल्याण विभागाकडे केली. पण त्याची दखल घेतली नाही.
विद्यार्थ्यांनाच दमदाटी
वसतिगृहातील विद्यार्थ्यांना दोन वेळेच जेवण देण्यासाठी कंत्राटदाराने स्वंयपाकी कर्मचाºयांची नेमणूक केली आहे. मात्र या कर्मचाºयांकडून विद्यार्थ्यांना नेहमीच दमदाटी केली जाते. जेवण आणि नास्ता देखील देण्यास टाळटाळ केली जात असल्याचा आरोप विद्यार्थ्यांचा आहे.
आतापर्यंत अनेकदा तक्रार
वसतिगृहातील विद्यार्थ्यांना कंत्राटदाराकडून दिल्या जाणाºया जेवणाचा दर्जा योग्य नाही. कर्मचाºयांकडून दमदाटी केली जात असल्याची तक्रार येथील विद्यार्थ्यांनी किमान सहा ते सात वेळा गृहपाल आणि समाजकल्याण अधिकारी यांच्याकडे केली. मात्र त्यांच्या तक्रारीची अद्यापही दखल घेण्यात आली नाही
समाज कल्याण विभागाचे दुर्लक्ष
वसतिगृहातील विद्यार्थ्यांच्या जेवणासंबंधी असलेल्या तक्रारी गृहपालाने लेखीपत्र देऊन समाज कल्याण विभागाच्या अधिकाºयांना वांरवार कळविल्या. मात्र अधिकाºयांनी याची अद्यापही दखल घेतलेली. त्यामुळे या विभागाचे अधिकारी कंत्राटदाराला अभय देत असल्याचा आरोप आहे.