विद्यार्थ्यांना मराठी अंकज्ञान नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2019 09:48 PM2019-06-24T21:48:21+5:302019-06-24T21:48:50+5:30
प्रत्येक शाळेत मराठी विषय शिकविणे अनिवार्य व्हावे अशी मागणी होत असून मुख्यमंत्रीही त्या बाजूने आहेत. यावरून महाराष्ट्रात मराठीला धोक्याची घंटा आहे असे म्हणायला हरकत नाही. कारण, मराठी भागात मराठीला अंक ज्ञानाची काही विद्यार्थ्यांची तपासणी करण्यात आली.
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : प्रत्येक शाळेत मराठी विषय शिकविणे अनिवार्य व्हावे अशी मागणी होत असून मुख्यमंत्रीही त्या बाजूने आहेत. यावरून महाराष्ट्रात मराठीला धोक्याची घंटा आहे असे म्हणायला हरकत नाही. कारण, मराठी भागात मराठीला अंक ज्ञानाची काही विद्यार्थ्यांची तपासणी करण्यात आली. यात एखाद्या अंकाला मराठीत आणि इंग्रजीत कसे वाचतात यावर विचारले असता, अनेक विद्यार्थ्यांनी बरोबर उत्तरे दिलीत परंतु अनेक विद्यार्थ्यांना ते अंक मराठीत सांगताच आले नाही. त्यामुळे मराठीवर इंग्रजी भाषा वरचढ होत असल्याचे जाणवते.
गोंदिया जिल्ह्यात एक हजार ६८१ शाळा आहेत. त्यापैकी मराठी माध्यमाच्या एक हजार २९१ शाळा आहेत. हिंदी माध्यमाच्या २०५ शाळा, इंग्रजी माध्यमाच्या १७६ शाळा, तर उर्दूच्या दोन शाळा आहेत. आमगाव तालुक्यात हिंदीच्या १४ शाळा, मराठीच्या १३२, इंग्रजीच्या १३ अशा १५९ शाळा आहेत. अर्जुनी-मोरगाव तालुक्यात बंगालीच्या सात शाळा, हिंदीच्या सात शाळा, मराठीच्या १८८, इंग्रजीच्या १६ अशा २१५ शाळा आहेत. देवरी तालुक्यात मराठीच्या १९८, इंग्रजीच्या नऊ अशा २०७ शाळा आहेत. गोंदिया तालुक्यात हिंदीच्या ११० शाळा, मराठीच्या २१६, उर्दू दोन, इंग्रजीच्या ८७ अशा ४१५ शाळा आहेत. गोरेगाव तालुक्यात मराठीच्या १४३, इंग्रजीच्या १६ अशा १५९ शाळा आहेत. सडक-अर्जुनी तालुक्यात मराठीच्या १६० तर इंग्रजीच्या ११ अशा १७१ शाळा आहेत.
सालेकसा तालुक्यात हिंदीच्या ७७ शाळा, मराठीच्या ६६, इंग्रजीच्या १२ अशा १५५ शाळा आहेत. तिरोडा तालुक्यात मराठीच्या १८८, इंग्रजीच्या १२ अशा २०० शाळा आहेत. गोंदिया जिल्ह्यातील सालेकसा, आमगाव व गोंदिया हे तीन तालुके मध्यप्रदेश राज्याला लागून असल्यामुळे या तीन पैकी आमगाव तालुका वगळता दोन तालुक्यातील बहुतांश शाळा हिंदीच्या आहेत. परंतु सालेकसा आणि गोंदिया हे दोन तालुके वगळता हिंदीचा प्रभाव जिल्ह्यात दिसून येत नाही. परंतु इंग्रजी माध्यमाच्या शाळांची संख्या प्रत्येक तालुक्यात सतत वाढत आहे. त्यामुळे मराठीकडे दुर्लक्ष करून इंग्रजी माध्यमाकडे पालकांचाही कल आहे. परंतु भाषेवर प्रभूत्व मिळविण्यासाठी मायबोली जपण्याचा खटाटोप दिसून येत आहे.
मराठी शिकविणाऱ्या शाळांची भौतिक सुविधा अपुरी
मराठीत शिक्षण देणाऱ्या शाळा फक्त जिल्हा परिषदेच्या आहेत. या शाळांमधील विद्यार्थ्यांसाठी पाहिजे तशी भौतिक सुविधा नाही. शासनही मराठी शाळांकडे सपशेल दुर्लक्ष करीत आहे. त्यामुळे आजही जिल्हा परिषद शाळांच्या ६७८ वर्गखोल्या जिर्णावस्थेत आहेत. यातून कधी अप्रिय घटना घडणार याचा नेम नाही. अशात अपघात होऊ नये म्हणून वर्ग ग्रामपंचायत इमारत किंवा खुल्या जागेत घेतले जातात.