युक्रेनमध्ये अडकलेल्या गोंदिया जिल्ह्यातील विद्यार्थ्यांची मायदेशी परतण्यासाठी धडपड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2022 07:10 AM2022-02-25T07:10:00+5:302022-02-25T07:10:02+5:30

Gondia News युक्रेनमधील हवाई वाहतूकसुद्धा पूर्णपणे बंद करण्यात आली आहे. त्यामुळे तेथे अडकलेल्या गोंदिया जिल्ह्यातील तीन विद्यार्थ्यांची आपल्या मायदेशी परतण्यासाठी मागील दोन-तीन दिवसांपासून धडपड सुरू आहे.

Students from Gondia district stranded in Ukraine struggle to return home | युक्रेनमध्ये अडकलेल्या गोंदिया जिल्ह्यातील विद्यार्थ्यांची मायदेशी परतण्यासाठी धडपड

युक्रेनमध्ये अडकलेल्या गोंदिया जिल्ह्यातील विद्यार्थ्यांची मायदेशी परतण्यासाठी धडपड

Next
ठळक मुद्देएअर लिफ्ट करण्याची केली मागणीकुटुंबीयांची होतेय घालमेल

अंकुश गुंडावार

गोंदिया : रशियाने युक्रेनवर हल्ला केल्यानंतर युद्धाचे ढग अधिक गडद झाले आहेत. त्यातच गुरुवारपासूनच युक्रेनमधील हवाई वाहतूकसुद्धा पूर्णपणे बंद करण्यात आली आहे. त्यामुळे तेथे अडकलेल्या गोंदिया जिल्ह्यातील तीन विद्यार्थ्यांची आपल्या मायदेशी परतण्यासाठी मागील दोन-तीन दिवसांपासून धडपड सुरू आहे. यासाठी राज्य सरकार तसेच जिल्ह्यातील खासदार, आमदारांशी संपर्क साधून त्यांनी मदतीची मागणी केली; पण त्यांना अद्याप कुठूनच मदत न मिळाल्याने त्यांची आणि त्यांच्या कुटुंबीयांची चिंता वाढली आहे.

गोंदिया जिल्ह्यातील तिरोडा येथील पवन मेश्राम, गोरेगाव तालुक्यातील उमेंद्र अशोक भोयर, मयूर मुनालाल नागोसे हे तिन्ही विद्यार्थी एमबीबीएस करण्यासाठी शिष्यवृत्तीवर युक्रेन येथे शिकायला गेले आहेत. तिघेही एमबीबीएसच्या द्वितीय वर्षाला शिकत आहेत. मागील दोन वर्षांपासून सर्व सुरळीत सुरू असतानाच रशिया आणि युक्रेन यांच्यात युद्धाचे ढग गडद झाले. रशियाने युक्रेनवर हल्ला करीत युद्धाला प्रारंभ करण्याचाच इशारा दिला आहे. यामुळे संपूर्ण जगसुध्दा चिंतेत आहे. तेथे अडकलेल्या भारतीय नागरिकांना परत आणण्यासाठी प्रयत्नदेखील सुरू करण्यात आले होते. मात्र, एअरपोर्ट बंद झाल्याने तेथे अडकलेले भारतीय नागरिक आणि विद्यार्थ्यांची मोठी अडचण झाली आहे. जिल्ह्यातील तीन विद्यार्थी युक्रेनमध्ये अडकले असून, मायदेशी परतण्यासाठी त्यांची केविलवाणी धडपड सुरू आहे. त्यांनी आपले कुटुंबीय आणि मित्र परिवाराशी सुध्दा संपर्क साधून मदतीची मागणी केली. त्यांच्या कुटुंबीयांनी खा. प्रफुल्ल पटेल, आ. विनोद अग्रवाल आणि अन्य लोकप्रतिनिधींशी संपर्क साधूृन आपल्याला येथून एअर लिफ्ट करा, अशी विनंती केली. मात्र, अद्यापही त्यांना कुठलीच मदत मिळालेली नाही, त्यातच आता तेथील विमानसेवा सुद्धा बंद झाल्याने त्यांच्यासमोर मोठे संकट निर्माण झाले आहे.

पैसेही संपले, राहण्याचा प्रश्न

युक्रेनमध्ये युद्ध सुरू होण्याच्या भीतीने तेथील नागरिकसुद्धा शहर सोडून जात आहेत. कुटुंबीयांनी पाठविलेले पैसेसुद्धा ट्रान्सफर होत नसून जवळचे खाण्या-पिण्याचे साहित्यसुद्धा संपत आले आहे. येथील वीज आणि पाणी पुरवठासुद्धा बंद करण्याचा इशारा दिला आहे. अशा स्थितीत आम्ही येथे राहायचे कसे, असा बिकट प्रश्न निर्माण झाला असल्याचे पवन मेश्राम याने ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.

काहीही करा; पण आमच्या मुलांना सुखरूप आणा

युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांना मायदेशी परत आणण्यासाठी भारत सरकारने प्रयत्न करावे, अशी मागणी कुटुंबीयांनी केली आहे. कधी एकदा आपली मुले सुखरूप घरी परततात, याची चिंता कुटुंबीयांना सतावत आहे.

Web Title: Students from Gondia district stranded in Ukraine struggle to return home

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :warयुद्ध