वेळापत्रकासाठी विद्यार्थ्यांची एसडीओ कार्यालयावर धडक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2016 12:02 AM2016-08-24T00:02:09+5:302016-08-24T00:02:09+5:30
स्थानिक एस.एस.जे. महाविद्यालयातील विद्यार्थी-विद्यार्थिनींनी कला शाखेचे वेळापत्रक बदलून देण्यात यावे यासाठी उपविभागीय कार्यालयावर धडक देत निवेदन दिले.
अर्जुनी-मोरगाव : स्थानिक एस.एस.जे. महाविद्यालयातील विद्यार्थी-विद्यार्थिनींनी कला शाखेचे वेळापत्रक बदलून देण्यात यावे यासाठी उपविभागीय कार्यालयावर धडक देत निवेदन दिले. महाविद्यालय प्रशासन व विद्यार्थी यांच्यात झालेल्या चर्चेनुसार अखेर वेळेत बदल करण्यात आला.
प्राप्त माहितीनुसार, स्थानिक महाविद्यालयात कला, वाणिज्य व विज्ञान शाखा आहेत. यापूर्वी कला शाखेचे वर्ग सकाळी ११ ते ३.४५ वाजतापर्यंत असायचे. यावर्षी विज्ञान व वाणिज्य शाखेच्या तासिका सकाळी तर कला शाखेची वेळ दुपारी १२ वाजतापासून करण्यात आली. दीड महिना महाविद्यालय सुरळीत चालले. शिवाय महाविद्यालयाने सत्र २०१६-१७ साठी काढलेल्या संस्थेच्या अपिल माहितीपत्रकात वेळेच्या बदलाची सूचना प्रकाशित केली नाही. गतवर्षीपेक्षा यंदा महाविद्यालयीन विद्यार्थ्यात वाढ झाली, त्यामुळे महाविद्यालय प्रशासनाने वेळेत बदल केला.
बाहेरगावावरून येणाऱ्या विद्यार्थ्यांची गैरसोय होत असल्याने विद्यार्थ्यांनी प्राचार्य व संचालक मंडळाकडे तक्रार केली. मात्र त्याची दखल घेण्यात आली नाही. शेवटी विद्यार्थ्यांनी आक्रमक पवित्रा घेतला व सोमवारी दुपारी उपविभागीय कार्यालय गाठले. विद्यार्थ्यांचे शिष्टमंडळ परिविक्षाधीन उपविभागीय अधिकारी सिध्दार्थ भंडारे यांना जावून भेटले व त्यांना निवेदन दिले. महाविद्यालयाचे प्राचार्य, उपविभागीय अधिकारी व ठाणेदार यांच्यात चर्चा झाली. शेवटी महाविद्यालयीन वेळ ११ वाजता करण्याचे ठरले. यामुळे विद्यार्थ्यांचे समाधान झाले. (तालुका प्रतिनिधी)