विद्यार्थ्यांना संसर्गजन्य आजाराची लागण
By admin | Published: February 22, 2017 12:25 AM2017-02-22T00:25:46+5:302017-02-22T00:25:46+5:30
तालुक्याच्या गणखैरा येथील किरसान इंटरनॅशनल पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांना गेल्या दोन आठवड्यांपासून त्वचारोगाच्या संसर्गजन्य आजाराची लागण झाली आहे.
कर्मचारीही झाले ग्रस्त : शाळा बंद ठेवून विद्यार्थ्यांना पाठविले स्वगावी
गोरेगाव : तालुक्याच्या गणखैरा येथील किरसान इंटरनॅशनल पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांना गेल्या दोन आठवड्यांपासून त्वचारोगाच्या संसर्गजन्य आजाराची लागण झाली आहे. रोग निवारण्यासाठी गोरेगावपासून तर गोंदियापर्यंत औषधोपचार करण्यात आले. मात्र इतर विद्यार्थ्यांना व काही कर्मचाऱ्यांनाही या आजारातून संसर्ग होऊ लागल्यामुळे डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्या विद्यार्थ्यांना औषधोपचारानंतर स्वगावी पाठविण्यात आले.
गणखैरा येथील किरसान इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये वर्ग पहिली ते दहावीपर्यंत आदिवासी प्रकल्प विभाग देवरीद्वारे निवासी शाळा कार्यरत आहे. या निवासी शाळेत एकूण २८५ विद्यार्थी विद्यार्थिनी शिकत आहेत. दोन आठवड्यापूर्वी जवळपास २०० विद्यार्थ्यांना डोळ्याची जळजळ होऊन डोळे व चेहऱ्यावर सूज तसेच चेहऱ्यावर काळे डाग आले. त्वचा खाजवायला सुरूवात झाली. विद्यार्थ्यांनी खाजवताच चेहरा व डोळ्यावरची कातडी निघून जात असल्याने विद्यार्थ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले.
या आजाराची तपासणी ग्रामीण रुग्णालय गोरेगाव येथील डॉ. राहुल बिसेन यांनी केली असता संसर्गजन्य रोगाची लागण होवून इतरांनाही होण्याची भीती त्यांनी व्यक्त केली. तसेच विद्यार्थ्यांना योग्य उपचारासाठी गोंदियाला दाखविण्याचा सल्ला दिला. त्यामुळे या विद्यार्थ्यांना केटीएस जिल्हा सामान्य रुग्णालयात नेण्यात आले. केटीएसमधील त्वचारोग तज्ज्ञांनी विद्यार्थ्यांवर औषधोपचार केले, मात्र इतरांना आजाराची लागण होऊ नये म्हणून इतर विद्यार्थ्यांपासून दूर त्यांच्या स्वगावी ठेवून आराम करण्याचा सल्ला दिला.
विशेष म्हणजे ही शाळा नदीच्या काठाजवळ असून उष्णा मिलचे दुर्गंधीयुक्त पाणी व राख या शाळेच्या परिसराजवळ आहे. विद्यार्थ्यांना पिण्यासाठी, आंघोळ व स्वयंपाक करण्यासाठी स्थानिक विहिरीचे पाणी वापरले जाते. राईस मिलच्या पाण्याच्या निचऱ्याने विहिरीचे पाणी दूषित झाल्याची चर्चा तालुक्यात आहे. पण ग्रामपंचायतने किंवा आरोग्य विभागाने पाण्याचे नमुने घेतले नसल्यामुळे दूषित पाण्याची माहिती मिळाली नाही. (शहर प्रतिनिधी)