विद्यार्थ्यांना तंत्रज्ञानावर आधारित शिक्षणाची गरज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 2, 2019 12:50 AM2019-02-02T00:50:55+5:302019-02-02T00:52:08+5:30
जिल्हा परिषद प्राथमिक व माध्यमिक शाळेत शिकणारे विद्यार्थी वर्षभर अभ्यास करतात. त्याची चाचणी परीक्षेच्या माध्यमातून होते. पण शारीरिक व बौद्धिक चाचणी ही खेळाच्या व सांस्कृतिक महोत्सवाच्या माध्यमातून होत असते.
लोकमत न्यूज नेटवर्क
देवरी : जिल्हा परिषद प्राथमिक व माध्यमिक शाळेत शिकणारे विद्यार्थी वर्षभर अभ्यास करतात. त्याची चाचणी परीक्षेच्या माध्यमातून होते. पण शारीरिक व बौद्धिक चाचणी ही खेळाच्या व सांस्कृतिक महोत्सवाच्या माध्यमातून होत असते. लहान लहान विद्यार्थ्यांमधील सुप्त गुण अशा प्रकारच्या क्रीडा संमेलनातून बघायला मिळतात. आजचे युग हे आधुनिक तंत्रज्ञानाचे आहे. त्यामुळे डिजिटल शाळेच्या माध्यमातून शाळेतील विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञानावर आधारीत शिक्षण मिळणे काळाची गरज असल्याचे प्रतिपादन महाराष्टÑ प्रदेश काँग्रेसचे प्रतिनिधी सहषराम कोरोटे यांनी केले.
तालुक्यातील सावली येथील जि.प. वरिष्ठ प्राथमिक शाळेत स्वदेशी खेळोत्तेजक मंडळ जिल्हा गोंदियाच्या वतीने मंगळवारी (दि.२९) आयोजित माध्यमिक विभागाच्या सांस्कृतिक कार्यक्रमाच्या उद्घाटनाप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाचे उद्घाटन देवरी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती रमेश ताराम यांच्या हस्त करण्यात आले.
या वेळी सावलीचे सरपंच प्रभुदयाल पवार, उपसरपंच निलेश शेंडे, माजी सभापती वसंत पुराम, हितेश डोंगरे, संजय गांधी निराधार योजना समितीचे अध्यक्ष श्रीकृष्ण हुकरे, माजी जि.प.सदस्य राजेश चांदेवार, माजी पं.स. सदस्य रामेश्वर बहेकार, सामाजिक कार्यकर्ता केशव भुते, डॉ.अजय उमाटे, आदिवासी सहकारी संस्था पुराडाचे अध्यक्ष माणिकबापू आचले, लोजपाचे अध्यक्ष समीर कुरेशी, तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष संजय मेहर, पोलीस पाटील चंद्रसेन रहांगडाले, माजी सरपंच चैतराम धुर्वे यांच्यासह सर्व शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेत्तर कर्मचारी, पालक वर्ग, गावकरी व विद्यार्थी उपस्थित होते. कोरोटे म्हणाले, शिक्षक हे देशाचे चांगले नागरिक घडविण्याचे काम करतात त्यामुळे अनेक क्षेत्रामध्ये लोक पुढे जाऊन देशाच्या विकासात हातभार लावतात. काळाची गरज ओळख विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित शिक्षण देण्याची गरज असल्याचे मत व्यक्त केले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा सचिव यशवंत भगत यांनी मांडले. संचालन विषय शिक्षक दीपक कापसे यांनी केले तर आभार मुख्याध्यापक संदीप तिडके यांनी मानले.